

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : फोर्ट, नरिमन पाॅइंट, मरीन ड्राइव्ह परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ‘एमएमआरडीए’कडून उभारण्यात येणाऱ्या ऑरेंज गेट-मरीन ड्राइव्ह या भुयारी मार्गाच्या कामाला आता खऱ्या अर्थाने वेग येणार आहे. ९.२ किमी लांबीच्या या मार्गामध्ये ६.५२ किमी दुहेरी-बोगदा असणार आहे. या महत्त्वाकांक्षी भुयारी मार्ग प्रकल्पाच्या उभारणीसाठी ‘एमएमआरडीए’ला तब्बल सात हजार ३२६ कोटींचे कर्ज सरकारी बँकेकडून मिळाले असून, त्याबाबत करार करण्यात आला आहे. त्यामुळे आता या कामाला चालना मिळणार आहे.
मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील वाहतूक सुविधा बळकट करण्यासाठी ‘एमएमआरडीए’ सातत्याने प्रयत्नशील आहे. अटल सेतूच्या उभारणीनंतर एमएमआरडीएकडून शिवडी-वरळी कनेक्टर उभारला जात असून, आता ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भूमिगत भुयारी मार्गाचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी सात हजार ७६५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमीवर आर्थिक निधीसाठी योग्य नियोजन करत युनियन बँक ऑफ इंडियाच्या मुंबईतील लार्ज कॉर्पोरेट शाखेकडून सात हजार ३२६ कोटींचे कर्ज मंजूर केले आहे. एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी बँकेसोबत झालेल्या करारावर स्वाक्षरी केली. या वेळी एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त, विक्रम कुमार, अश्विन मुद्गल, सह महानगर आयुक्त, राधाबिनोद शर्मा आदी उपस्थित होते.
वेळ आणि इंधनाची बचत
सध्या मंत्रालय अथवा नरिमन पाॅइंटला जाण्यासाठी चेंबूरहून इस्टर्न फ्रीवेने अथवा अटल सेतूवरून आलेल्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, मात्र ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह हा भुयारी मार्ग होईल, तेव्हा ऑरेंज गेटसह फोर्ट परिसरात होणारी कोंडी फुटणार आहे. त्यामुळे वाहनधारकांची वेळेची आणि इंधनाची मोठी बचत होऊ शकणार आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
- ९.२ किमीचा भूमिगत भुयारी मार्ग ऑरेंज गेट (ईस्टर्न फ्रीवे) ते मरीन ड्राइव्ह कोस्टल रोडला जोडला जाईल.
- ६.५२ किमीचा दुहेरी-बोगदा असणार असून, त्यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने आधुनिक सुविधा असणार आहेत.
- या भुयारी मार्गामुळे पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी मजबूत करणे, दक्षिण मुंबईसाठी रिंग रूट तयार करणे शक्य होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.