शिवकालीन शस्त्रास्त्र, मोडी लिपीतील पत्राचे प्रदर्शन
शिवकालीन शस्त्रास्त्र, मोडी लिपीतील पत्र, नाणी संग्रहाचे प्रदर्शन
अंबरनाथ, ता. १९ (वार्ताहर) : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५व्या जयंतीनिमित्त शिवकालीन शस्त्रास्त्र, मोडी लिपीतील पत्र आणि नाणी संग्रह प्रदर्शन भरवण्यात आले आहे. आमदार डॉ. बालाजी किणीकर, किसन कथोरे, तहसीलदार अमित पुरी यांनी भेट देऊन प्रदर्शनाची पाहणी केली.
अंबरनाथ पूर्व साई विभागातील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर प्रांगणात शिवकालीन शस्त्रास्त्र, मोडी लिपीतील पत्र आणि नाणी यांचा भव्य संग्रह प्रदर्शन भरवले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. यामध्ये शिवकालीन नाणी, ब्रिटिश-फ्रेंच तलवार, भाला, ढाल, कोयता, कुऱ्हाड, क्षेपणी/गोफण, कर्नाटकी धोप, विविध प्रकारच्या कट्ट्यारी असे सुमारे २५० ते ३०० प्रकारची शस्त्रास्त्रे प्रदर्शनात नागरिकांना पाहण्यासाठी ठेवली आहेत. हे प्रदर्शन १९ व २० फेब्रुवारी असे दोन दिवसांचे आहे. इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळावा, यासाठी तहसीलदारांकडून शाळांना आवाहन करण्यात आले आहे. विशेषकरून विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळावा, यासाठी शुक्रवारी (ता. २१) हे प्रदर्शन सुरू राहावे, अशी सूचना तहसीलदार अमित पुरी यांनी भेटीदरम्यान वेध इतिहासाचे राहुल मुरलीधर यांना केली.
श्री विठ्ठल रखुमाई मंदिर समिती व शर्मा कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने भरवलेल्या शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शनात शिवकालीन नाणी, स्टॅम्प तसेच महाराजांची पत्रे असे प्रदर्शन बदलापूरचे ‘वेध इतिहासाचे’ टीमने भरवले आहे. हे पाहण्यासाठी अंबरनाथकरांनी जास्तीत जास्त उपस्थिती लावावी, असे आवाहन आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी केले.
नागरिकांना आणि विशेषकरून विद्यार्थ्यांना महाराजांच्या शस्त्रांची माहिती व्हावी. विद्यार्थ्यांच्या भविष्यातही हे प्रदर्शन लक्षात राहील असा हा उपक्रम असून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा उपक्रम ठेवल्यामुळे नागरिकांना ही उत्तम संधी दिल्याचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले. दरम्यान, शिवजयंती साजरी करताना भावी पिढीच्या मनात महाराजांचे स्थान अढळ राहावे तसेच यातून चांगला विचार त्यांच्या मनात राहावा, या उद्देशाने हे प्रदर्शन भरवल्याचे आमदारांनी सांगितले.
विविध प्रकारचे तोफगोळे
साधारण साडेतीनशे वर्षांपासूनची शस्त्रे प्रदर्शनात ठेवली आहेत. या शस्त्रांमध्ये विविध प्रकारच्या तलवारी, लहान कट्यारी, जंभिये, पेस्टब्स, तोफगोळे, ढाली तसेच त्या काळी वापरात असलेले विशेष आकाराचे बुरूज, शिवकालीन नाणी आणि मोडी लिपीतील पत्र, महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याप्रसंगी पाडलेली नाणी (सुवर्ण होन व शिवराई) प्रदर्शनात नागरिकांना पाहायला मिळतील. दरम्यान, जास्तीत जास्त नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘वेध इतिहासाचे’ राहुल मुरलीधर यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

