१९ हजार ५१८ जणांना सिडकोच्या घरांचा लाभ

१९ हजार ५१८ जणांना सिडकोच्या घरांचा लाभ

Published on

२० हजार जणांना गृहलाभ
एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘सिडको’ची सोडत

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : ‘माझे पसंतीचे सिडको घर’ या शीर्षकाखाली सिडको महामंडळाने राबवलेली २५ हजार गृहप्रकल्पांची आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सोडत जाहीर झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एका क्लिकद्वारे लॉटरी पद्धतीने ही सोडत काढण्यात आली. या सोडतीद्वारे १९ हजार ५१८ भाग्यवान विजेत्यांना घराचा लाभ मिळाला.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिडकोच्या ‘माझे पसंतीचे सिडको घर’ या लॉटरीची ऑनलाइन सोडत काढण्यात आली. या कार्यक्रमप्रसंगी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. राजा दयानिधी, सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांसह सिडकोतील विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओद्वारे दिलेला संदेश प्रसारित करण्यात आला. सिडकोची गृहनिर्माण योजना ही प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकारणारे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे फडणवीस यांनी संदेशात सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन करण्यात आले. सर्वसामान्यांना परवडणारी, हक्काची आणि दर्जेदार घरे मिळाली पाहिजेत, त्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे, सर्वांचे घरांचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे. यासाठी सिडको, म्हाडा यासारख्या संस्था पारदर्शकपणे काम करीत आहेत. या संस्थांमुळे सर्वसामान्यांना घरे मिळत असल्याचे प्रतिपादन एकनाथ शिंदे यांनी केले. सिडकोची ही घरे टाटा, एल अण्ड टी, शापूरची यांच्या सहभागाने बांधली असल्याने ती अतिशय दर्जेदार असून, घरे रेल्वे स्थानके, विमानतळाच्या जवळ असल्याने सामान्यांना त्याचा फायदा होणार आहे. नवी मुंबईचे अतिशय वेगाने शहरीकरण होत असल्याने घरांची मागणी वाढली असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
...
नवीन तंत्रज्ञानामुळे पर्यावरण अबाधित
काही एनजीओ, पर्यावरणवाद्यांनी अटल सेतूच्या प्रकल्पाला विरोध दर्शवून या प्रकल्पामुळे फ्लेमिंगो पक्षी नवी मुंबईतून कमी होतील, असे सांगितले होते. मात्र रिमुव्हर्स सर्क्युलेशन ड्रेन, नॉइस बॅरिअर या तंत्रज्ञानांचा वापर केल्यामुळे एमटीएचएल प्रकल्पामुळे फ्लेमिंगोची संख्या कमी न होता आणखी वाढली. यावरून हे सरकार पर्यावरणपूरक प्रकल्प करते आहे हे दिसून आले, असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
...
नवे धोरण आणणार!
राज्य सरकारतर्फे आता नवीन गृहनिर्माण धोरण आणले जात असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. यात सर्वांसाठी परवडणारी घरे, परवडणारी भाड्याची घरे, विद्यार्थी वसतिगृहे, काम करणाऱ्या महिलांसाठी घरे, ज्येष्ठ नागरिकांना घरे, गिरणी कामगार, डबेवाले आदींचा यात अंतर्भाव असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com