तुर्भे स्टोअर बनतोय अपघातांचे केंद्र

तुर्भे स्टोअर बनतोय अपघातांचे केंद्र

Published on

तुर्भे स्टोअर बनतोय अपघातांचे केंद्र
निष्काळजीपणामुळे नागरिकांचा जीव धोक्यात
वाशी, ता. २५ (वार्ताहर) : नवी मुंबईतील तुर्भे स्टोअर परिसर सध्या अपघातांचे केंद्र बनले आहे. या भागात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तुर्भे रेल्वे स्थानकासमोर नेहमीच नागरिकांची मोठी गर्दी असते आणि याच ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वी याच परिसरात दहावीत शिकणाऱ्या दीपांश बौद्ध या विद्यार्थ्याचा सायकलवरून घरी जात असताना दुर्दैवी अपघात झाला, ज्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
तुर्भे परिसरातून कल्याण-डोंबिवली, बदलापूर आणि एमआयडीसीच्या दिशेने जाणारी वाहने मोठ्या प्रमाणात धावत असतात. विशेषत: तुर्भे रेल्वे स्टेशन, वाशी, सानपाडा आणि तुर्भे स्टेशनकडे जाण्यासाठी विद्यार्थी आणि नोकरदारांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागते. वाहनांची सततची वर्दळ आणि त्यातच रस्त्यावर होणारे अपघात यामुळे नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मोठ्या गाड्यांमुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्‍यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनांना तसेच पादचाऱ्यांना जागा अपुरी पडत आहे. तसेच तुर्भे रेल्वे स्टेशनसमोर रखडलेले उड्डाणपुलाचे कामदेखील डोकेदुखी ठरत आहे. या उड्डाणपुलाचे काम अर्धवट अवस्थेत असल्यामुळे परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होते. त्‍यामुळे नागरिकांना रस्ता ओलांडायला सुरक्षित जागा मिळत नाही. त्‍यातच फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांसाठी फुटपाथ शिल्लक राहिलेला नाही. परिणामी, नागरिकांना नाइलाजाने रस्त्यावरून चालावे लागते. ज्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. नागरिकांना तुर्भे स्टोअर येथील रस्ता ओलांडण्यासाठी एक फूट ओव्हर ब्रिज असला तरी त्यावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण असल्याने ब्रिजचा रस्तादेखील चालण्यासाठी अपुरा पडत आहे. यामुळे इच्छा नसतानाही रस्त्यावरून पलीकडे जाण्यासाठी रस्त्याचा वापर करून दुभाजक ओलांडून जावे लागत असल्याचे परिसरातील नागरिक सांगत आहेत.
......................
या परिसरात मोठ्या प्रमाणात अपघात झाले असून तुर्भे पोलिसांनी दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार गेल्यावर्षी २०२३-२४ मध्ये तुर्भे स्टोअर परिसरात तीन अपघाती मृत्यू आणि दोन अपघात झाले आहेत. तर २०२५ मध्ये आतापर्यंत एक अपघाती मृत्यू झाला आहे; मात्र स्थानिकांच्या म्हणण्यानुसार तुर्भे स्टोअर परिसरात आपघातांचे आणि त्यातून होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण यापेक्षा जास्त आहे. या गंभीर समस्येकडे पोलिस आणि महापालिका प्रशासन गंभीरपणे लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो आहे.
.....................
रस्त्यावर अपघात होऊ नयेत, यासाठी तुर्भे पोलिसांकडून संपूर्ण दक्षता घेतली जात आहे. अनधिकृतपणे रस्ता अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांना फुटपाथवरून हटवून दुसरीकडे स्थलांतरित करण्यात यावे, याबाबत तुर्भे पोलिसांकडून महापालिकेबरोबर पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. तसेच वाहतूक पोलिसांनाही तुर्भे स्टोअर परिसरात बंदोबस्त वाढवावा, याबाबत विनंती करण्यात येणार आहे.
- आबासाहेब पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, तुर्भे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com