गावकरी तहानलेलेच!
वसई, ता. २५ (बातमीदार) : नागरिकांना मुबलक पाणी मिळावे, यासाठी ६९ गावांसाठी पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे. यातील वसई-विरार महापालिकेत ५२ गावांचा समावेश आहे; मात्र अद्यापही यातील २३ गावे ही तहानलेलीच आहेत. प्रत्यक्ष अमृत पाणी योजनेच्या टप्पा दोनमधून पाणी केव्हा येणार, याची प्रतीक्षा नागरिक करू लागले आहेत. उन्हाळ्यात येथील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
गावांना पाणी मिळावे, यासाठी १७ वर्षांपूर्वी योजना सुरू करण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून काम हाती घेण्यात आले; परंतु २००९ मध्ये महापालिकेची स्थापना झाली. यात काही गावे महापालिका हद्दीत आली. त्यामुळे पूर्वी उभारण्यात आलेले जलकुंभ, जलवाहिनी नादुरुस्त झाल्या. एकीकडे पश्चिम भागात असणाऱ्या गावांना पाणी मिळत नव्हते. त्यातच योजना राबवली जाणार म्हणून नागरिक सुखावले होते; परंतु अद्यापही घशाची कोरड कायम आहे. महापालिका हद्दीत समाविष्ट असणाऱ्या ५२ गावांतील जलकुंभाचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करण्यात आले आहे. त्यात असलेल्या त्रुटी, तांत्रिक बाबी तपासण्यात आल्या आहेत. त्यामुळे अहवालाप्रमाणे जलकुंभ दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. याकरिता प्रशासनाकडून पाच कोटींचा खर्च केला जाणार आहे.
६९ गावांपैकी महापालिकेत समाविष्ट गावांच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महापालिकेने यापूर्वी जलकुंभ भरण्याकरिता मुख्य जलवाहिन्या अंथरल्या. सुमारे २९ गावांचा पाणीपुरवठा यापूर्वीच सुरू केला; मात्र अद्यापही अनेक गावे तहानलेलीच आहे. याबाबत डिसेंबरमध्ये मुख्यमंत्र्यांकडे दाददेखील मागण्यात आली होती. शिवसेनेचे पालघर जिल्हा सहसचिव हरिश्चंद्र पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वसई पश्चिम पट्ट्यातील पाणीसमस्येबाबत तक्रार दाखल करून ही समस्या सोडवा, असे साकडे घातले होते.
एकीकडे शहरात लोकसंख्या वाढत आहे. त्यात पाणीटंचाईचा सामना हा शहरी आणि गावातील भागाला निर्माण होत असतो. विशेष म्हणजे, उन्हाळ्यात ही समस्या अधिक निर्माण होते. पुढील मार्च ते मेदरम्यान धरणातील साठा कमी झाल्यास त्याचा परिणाम हा वितरणावर होणार आहे. अशातच गावांपर्यंत पाणी पोहोचले नसल्याने अधिक झळ सोसावी लागणार आहे.
पाच गावांना जलदिलासा मिळणार
३३ गावांपैकी वसई पश्चिम पट्ट्यातील नाळा, निर्मळ, मर्देस, उमराळे आणि भुईगाव या गावांत पाण्याची टंचाई आहे. याठिकाणी मुख्य जलवाहिनी ही जलकुंभापर्यंत आली असून त्यानुसार चाचणीदेखील महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून नुकतीच करण्यात आली आहे. त्यामुळे या भागाला लवकरच जलदिलासा मिळणार आहे.
वसई-विरारमध्ये अमृत पाणी योजनेच्या टप्पा दोनचे काम सुरू आहे. महापालिकेत समाविष्ट असणाऱ्या पाच गावांत मुख्य जलवाहिनी जलकुंभापर्यंत अंथरण्यात आली आहे, तर १८ गावांमध्ये मुख्य व वितरण जलवाहिन्या अंथरण्याचे काम केले जात आहे. त्यासाठी कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आला आहे.
- अनिलकुमार पवार, आयुक्त, वसई-विरार महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

