नवी मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्पात ७८४.४५ कोटीची वाढ
नावीन्यपूर्ण प्रकल्पांची भेट
नवी मुंबई महापालिकेचे पाच हजार कोटींचे उड्डाण
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २५ : १९ नवे उड्डाणपूल, अटल अत्याधुनिक प्रयोगशाळा, पुनर्बांधणीकरिता एक खिडकी योजना, वैद्यकीय महाविद्यालय, आयुष रुग्णालय, महाप्रस्थान वैकुंठधाम आदी नावीन्यपूर्ण प्रकल्पांची भेट यंदाच्या अर्थसंकल्पातून मिळणार आहे. नवी मुंबई महापालिकेचा २०२५-२६ करिता आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांनी १,३०१.०४ कोटी आरंभीच्या शिलकेसह पाच हजार ७०९ कोटी ९५ लाख जमा व पाच हजार ६८४ कोटी ९५ लाख खर्चाचा आणि २५ कोटी शिलकेचा अर्थसंकल्प प्रशासनाने सादर केल्यानंतर त्याला पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मंजुरी दिली.
गतवर्षी ४,९२५.५० कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. यंदा त्यात ७८४.४५ कोटींची वाढ झाली आहे. मात्र यंदा सर्वसामान्यांवर कोणताही आर्थिक करवाढीचा बोजा लादलेला नाही. मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे यांनी अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे, शहर अभियंता शिरीष आरदवाड तसेच इतर विभागप्रमुख यांच्या उपस्थितीत हा अर्थसंकल्प सादर केला. पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी उत्तम राहणीमान व आनंददायी राहण्याजोगे शहर निर्माण करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन अर्थसंकल्प तयार केल्याचे स्पष्ट केले. मालमत्ता करातून मार्च २०२५ पर्यंत ९०० कोटींचे उद्दिष्ट साध्य होणार असल्याचे सांगत २०२५-२६ मध्ये यात ३०० कोटींची वाढ होईल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. त्याकरिता करवसुलीसाठी कडक कारवाईचे धोरण आखण्यात आले आहे. प्रभावी वसुलीकरिता प्रथम महापालिकेने एका संस्थेची निवड केली आहे.
नवीन जलस्त्रोत
नवी मुंबई शहराचा झपाट्याने होणारा विकास पाहता, नवी मुंबई शहरानजीक नव्याने उभारण्यात येणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ, ट्रान्स हार्बर लिंक रोड, सिडकोमार्फत राबविण्यात येणारी सामूहिक गृहनिर्माण योजना व शासनाच्या नवीन यूडीसीपीआरमधील तरतुदीप्रमाणे वाढीव चटई क्षेत्रानुसार नव्याने उभारण्यात येणाऱ्या बहुमजली इमारतीची मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. विद्यमान १८.५ लाख अंदाजित लोकसंख्या विचारात घेता, मोरबे धरण स्त्रोतातून ४५० एमएलडी पाणी पुरविण्यात येत आहे. मात्र भविष्यात वाढणारी लोकसंख्या व त्याकरिता २०४७ पर्यंत शाश्वत व पुरेसा स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यादृष्टीने साधारणत: १,२०० द.ल.लि. प्रतिदिन इतक्या पाण्याची आवश्यकता भासणार आहे. नवी मुंबई शहरातील अतिरिक्त पाण्याची गरज भागविण्याकरिता नवी मुंबई महापालिकेमार्फत नवीन जलस्त्रोत निर्मितीबाबत पातळगंगा नदीतून वाहून जाणारे पाणी उचलण्याबाबत अभ्यास करून ते पाणी शहरांत पुरविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. भिरा जलविद्युत केंद्रामधून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर आरक्षण मिळण्याकरिता नवी महापालिकेमार्फत कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे तसेच प्रस्तावित पोशीर, शिलार प्रकल्प यांचा अभ्यास करण्यात येत आहे. त्यासाठी नवी मुंबई महापालिकेमार्फत प्रकल्पाच्या तांत्रिक/ आर्थिक व्यवहार्यतेकरिता मे. टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स लिमिटेडची नेमणूक करण्यात आली आहे.
वित्तीय स्थैर्याकरिता आग्रही
उत्पन्न वाढीसाठी ठोस उपाययोजना करता याव्यात, यासाठी विशेष कार्यबलाच्या नियुक्तीसह करवसुलीकरिता कडक कार्यवाहीच्या धोरणाचा महापालिकेने अवलंब केला. प्रलंबित मालमत्ता कराची वसुली प्रभावीपणे होण्याच्या दृष्टीने विभाग कार्यालय स्तरावर विशेष पथके तयार करण्यात आलेली आहेत. थकबाकीदारांना भेटी देऊन त्यांची मालमत्ता जप्त करणे, बँक खाती गोठवणे, मालमत्तेचा लिलाव करणे इत्यादी कारवाई करण्यात येत आहे. तसेच ज्या मालमत्ताधारकांनी भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त केलेले नाही, परंतू वापर सुरू केलेला आहे अशा मालमत्तांचे सर्वेक्षण करून नियमानुसार शास्तीसह करआकारणी करण्यात येत आहे. व्यावसायिक मालमत्तेचे सर्वेक्षण, जाहिरात गॅन्ट्री व डिजिटल होर्डिंगच्या माध्यमातून उत्पन्न वाढ, कार्यालय, व्यावसायिक दुकान गाळे भाडे आदी नियोजन करण्यात आले आहे.
अत्याधुनिक शिक्षण
वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, याकरिता विज्ञानाविषयी ज्ञान मिळविणे व विज्ञानाची आवड निर्माण होण्यासाठी शासनाच्या अटल लॅब योजनेप्रमाणे महापालिकेच्या शाळांमध्ये अटल लॅब उभारण्यात येणार आहे. भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक विषयाचे ज्ञान मिळण्यासाठी ग्रंथालय निर्माण करण्याचे प्रस्तावित असून, त्यासाठी तरतूद करण्यात येत आहे. कॉम्प्युटर लॅब, सायन्स पार्क, अध्ययन निष्पत्ती आधारित शिक्षण, ‘मिशन इनोव्हेशन’ या उपक्रमांस सुरुवात करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातील सेंटर फॉर इनोव्हेशन ॲन्ड इन्क्युबेशन येथे प्रशिक्षण पुरविण्याचे योजिले आहे. जीवनात शिस्त व देशप्रेम विकसित करण्यासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व शाळांमध्ये एनसीसीचे प्रशिक्षण मिळावे, यासाठी महापालिका व एनसीसी विभाग यांच्या समन्वयातून ही योजना लागू करण्यात येणार आहे. यासाठी एनसीसी विभागास आवश्यक ती मदत महापालिकेकडून करण्यात येईल.
आरोग्य व्यवस्थेला बळकटीकरण
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील कॅन्सरग्रस्त रुग्णांना केमोथेरपी उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता महापालिकेचे सार्वजनिक रुग्णालय, नेरूळ या ठिकाणी १० बेडचे ‘डे केअर केमोथेरपी युनिट’ सुरू करण्यात आलेले आहे. कॅन्सरग्रस्त रुग्णांना या डे केअर केमोथेरपी युनिटचा मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे. नवी मुंबई महापालिका रुग्णालयामध्ये हृदयविकाराचे रुग्ण उपचारार्थ येतात. अशा रुग्णांवरील उपचाराकरिता सार्वजनिक रुग्णालय, ऐरोली येथे बाहययंत्रणेद्वारे कॅथलॅब व आयसीयू विभाग कार्यान्वित करण्याचे प्रस्तावित आहे. ही कॅथलॅब आयसीयू सुरू केल्यास हृदयविकार आलेल्या रुग्णांची ॲन्जिओग्राफी करून त्यांना पुढील उपचार सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होईल. शहरातील रुग्णांसह निरोगी नागरिकांचे आरोग्य स्वास्थ्य उत्तम राहावे याकरिता आयुर्वेदिक रुग्णालयांची स्थापना करण्याचे प्रस्तावित आहे. याकरिता महापालिका कार्यक्षेत्रामध्ये जागा उपलब्ध झाल्यानंतर नमूद केल्याप्रमाणे किमान दोन आयुर्वेदिक रुग्णालये सुरू करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.
पशू रुग्णालय सुरू होणार
शहरामध्ये स्वच्छ आणि सुंदरतेमुळे अनेक परदेशी पशुपक्षी येतात. त्यांच्यासाठीदेखील पशुवैद्यकीय दवाखाना पीपीपी तत्त्वावर चालवण्यासाठी नियोजन केले आहे. त्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून पशू रुग्णालय कार्यान्वित करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
अग्रिशमन केंद्रांचे सक्षमीकरण
नवी मुंबई महापालिकेची वाशी, कोपरखैरणे व सीबीडी बेलापूर येथील अग्निशमन केंद्रे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून वॉटर ब्राऊझर विथ २० मीटर उंचीचे टॉवर मॉनिटर, ॲडव्हान्स फायर इंजिन, मिनी फायर इंजिन वाहने खरेदी करण्यात येणार आहेत. सध्या वापरात असलेली श्वसन उपकरणे २००९ या वर्षी खरेदी करण्यात आली असून, या श्वसन उपकरणांची क्षमता कमी झाली आहे. यामुळे अग्निशमन विभागासाठी नवीन खरेदी करणे प्रस्तावित आहे. या सहाय्याने श्वसन उपकरणे रिफिलिंग करण्याकरिता आवश्यक असून, बी. ए. सिलिंडर रिफिलिंग करतेवेळी दुर्घटना टाळणे शक्य होईल.
नावीन्यपूर्ण उपक्रम
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असून, यामुळे विमानतळाशी संलग्न असलेले इतर उद्योग/व्यवसाय यांना भविष्यात मोठी चालना मिळणार आहे. नागरिकांच्या दरडोई उत्पनात वाढ होईल तसेच ऐरोली विभागालगतच्या परिसरामध्ये डेटा सेंटरकरिता मोठ्या प्रमाणात मागणी असून, भविष्यात डेटा सेंटरमुळे आर्थिक उलाढाल होऊन शहरामध्ये आर्थिक गुंतवणूक होणार असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्याचा लाभ होणार आहे. विकासाची ही संधी शोधण्याकरिता या कक्षाची स्थापना करण्यात येत असून, यामध्ये सर्व कामामध्ये निपुण असणाऱ्या एका चांगल्या संस्थेची नियुक्ती करण्यात येणार आहे. भारतीय प्रशासकीय सेवा प्रशिक्षण केंद्र सुरू करणे आणि पालिका आणि केंद्रीय वस्त्र मंत्रालयाची वस्त्र समिती यांच्यामधील हा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प असून, घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ अन्वये टेक्सटाइल वेस्ट जागेवर विलगीकरण करून या प्रकल्पाद्वारे टेक्सटाइल वेस्टचे अप-स्केलिंग व रिसायकलिंग करून वापरण्यात येणार आहे
११ होल्डिंग पॉण्डचा विकास
शहराला मोठा खाडीकिनारा लाभला आहे. त्याअनुषंगाने शहरामधील ११ होल्डिंग पॉण्ड विकसित करून त्या ठिकाणचा नागरी वापरांबरोबर पर्यावरणाच्या अनुषंगाने प्रकल्प उभारणार असल्याचे आयुक्तांनी घोषित केले.
कागदपत्रे होणार डिजिटल
ई-ऑॅफिस प्रणाली, अद्ययावत संकेतस्थळ, ऑनलाइन सेवेची सुविधा, ऑनलाइन भरणा करण्याकरिता सर्व सुविधा उपलब्ध करणे, व्हॉट्सॲप चॅटबॉट, डिजिटल हजेरी, स्कूल डॅशबोर्ड, हॉस्पिटल डॅशबोर्ड, अभिलेख डिजिटलायझेशन आदी ऑनलाइन सुविधांद्वारे महापालिकेचा कारभार पेपरलेस होणार आहे.
महाप्रस्थान स्मशनभूमी
अंतिम संस्कारासाठी नागरिकांना धावपळ करावी लागते. त्याअनुषंगाने हैदराबाद येथील महाप्रस्थान स्मशानभूमीच्या धर्तीवर नवी मुंबईतही अंत्यविधी साहित्य, अस्थी ठेवण्यासाठी लॉकर्स, स्नानगृह, चेजिंग रूम या सुविधा महाप्रस्थान उपक्रमांतून दिल्या जाणार आहेत.
स्लम फ्री सिटी
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामध्ये गावठाण व गावठाणांच्या भोवताली गरजेपोटी झालेली बांधकामे व एमआयडीसी क्षेत्रात झालेल्या अनधिकृत झोपडपट्ट्या पाहता या क्षेत्राचा सुनियोजित विकास करणे आवश्यक आहे. नवी मुंबई महापालिकेस स्लम फ्री सिटी दर्जा प्राप्त होण्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेतर्फे अशा क्षेत्रांचा क्लस्टरच्या माध्यमातून विकास व्हावा, याकरिता सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत सर्वेक्षण करून पुढील काम प्रगतिपथावर आहे.
महापालिका एक शाश्वत संस्था म्हणून काम करते. नवीन विकास केंद्र म्हणून उदयास आलेल्या नवी मुंबईला गतिमान करण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. लोकप्रतिनिधी, राज्य सरकार, मंत्रिमंडळाकडून सातत्यपूर्ण असणारे मार्गदर्शन आणि सूचनांमुळे शहराने समतोल विकास साधला आहे. यापुढेदेखील सर्वांच्या सहकार्यातून नवी झेप घेण्यावर भर असणार आहे.
- डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

