महिलांची वणवण थांबली
महिलांची वणवण थांबली
‘सकाळ’च्या बातमीचा परिणाम; पाण्याचे टँकर धावू लागले
मोखाडा, ता. २५ (बातमीदार) : मोखाडा तालुक्यात जल जीवन मिशन योजनेची कामे अपूर्णावस्थेत आहेत, तर विहिरी कोरड्या पडल्या आहेत. टॅंकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी करूनही टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा न करता टॅंकरमुक्त मोखाडा तालुका दाखवण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला होता. या घटनेचे वास्तव उघड करणारी ‘सकाळ’ने रविवारी (ता. २३) ‘मोखाडा तालुक्यात पाणीटंचाईचे विघ्न’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. त्याची तातडीने दखल घेत प्रशासनाने टंचाईग्रस्त गावपाड्यांना सोमवार (ता. २४) पासून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना दिलासा देऊन महिलांची वणवण थांबवली आहे.
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने जल जीवन मिशन योजनेंतर्गत ‘हर घर नल से जल’ ही महत्त्वाकांक्षी योजना आणली आहे. मात्र मोखाडा तालुक्यात या योजनेचे पाणी पोहोचलेले नाही. त्यातच मोखाड्यात विहिरींनी तळ गाठल्याने गोमघर, सायदे, पाथर्डी आणि सूर्यमाळ या ग्रामपंचायतींनी आपल्या क्षेत्रातील टंचाईग्रस्त गावपाड्यांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी पंचायत समिती प्रशासनाकडे केली होती.
---------------------------
हंडाभर पाण्यासाठी वणवण
सरकारी धोरण धाब्यावर बसवून या ग्रामस्थांच्या मागणीकडे प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केले होते. टंचाईग्रस्त गावपाड्यांना टँकरने पाणीपुरवठ्याची मंजुरी असून तेथे कोणतीही पाण्याची सुविधा नसताना तालुका टॅंकरमुक्त दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता. त्यामुळे टंचाईग्रस्त गावपाड्यांतील आदिवासी महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते.
---------------------------------
महिलांकडून आभार
या भीषण स्थितीचे वास्तव ‘सकाळ’ने रविवारी ‘मोखाडा तालुक्यात पाणीटंचाईचे विघ्न’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करून चव्हाट्यावर आणले होते. ‘सकाळ’च्या या बातमीमुळे गोमघर, वाघवाडी, दूधगाव, सायदे जांभूळवाडी, पाथर्डी, हेदवाडी आणि सूर्यमाळमधील केवनाळे येथे दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे येथील महिलांना दिलासा मिळाला असून त्यांनी ‘सकाळ’चे आभार मानले आहेत.
---------------------------
‘त्या’ अधिकाऱ्यांवर कारवाई करा
मोखाडा तहसीलदार मयूर खेंगले यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार टॅंकरद्वारे पाणीपुरवठा मागणीचे प्रस्ताव येताच त्यांना तातडीने उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून मंजुरी देण्यात येते. तालुक्यातील टंचाईग्रस्त गावपाड्यांचे सर्व प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. टॅंकर मंजुरीनंतर सुमारे १५ ते २० दिवसांनी पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, नागरिकांना पाण्यासाठी तडफडत ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.
--------------------------------------
आमच्या ग्रामपंचायतीमधील गोमघर, दूधगाव आणि वाघवाडी येथे पाणीटंचाई निर्माण झाल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी केली होती. मात्र १० दिवस उलटूनही त्याची प्रशासनाने दखल घेतली नाही. ‘सकाळ’ने प्रसिद्ध केलेल्या बातमीमुळे दुसऱ्या दिवसापासून टंचाईग्रस्त गावपाड्यांत टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे.
- सुलोचना गारे,
सरपंच, गोमघर-वाशिंद ग्रामपंचायत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

