आपत्कालीन बटणाला अखेर मिळाला मुहूर्त

आपत्कालीन बटणाला अखेर मिळाला मुहूर्त

Published on

आपत्कालीन बटणाला अखेर मिळाला  मुहूर्त
बस, टॅक्सी प्रवाशांना मिळणार तत्काळ मदत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : खासगी तसेच शालेय बस किंवा टॅक्सीचालक प्रवाशांसोबत गैरवर्तन करीत असेल किंवा प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय मदत हवी असेल तर ती आता एका क्लिकवर मिळणार आहे. तुम्ही प्रवास करीत असलेल्या वाहनातील पॅनिक बटण दाबल्यानंतर ही मदत मिळेल. याचा नियंत्रण कक्ष अंधेरीत तयार असून, शनिवारी (ता. १) याचे उद्‌घाटन होणार आहे.
विशेषतः महिला आणि लहान मुलांसोबत होणाऱ्या गैरवर्तनाला लगाम लागण्यास यामुळे मदत होणार आहे. टूरिस्ट टॅक्सी आणि खासगी बस गाडीतून प्रवास करताना महिला प्रवाशांवर झालेल्या बलात्काराच्या घटना, त्याचप्रमाणे रात्रीच्या प्रवासात प्रवाशांना इच्छितस्थळी न पोहोचवता मध्येच उतरवणे यासह अनेक प्रकारच्या घटना सार्वजनिक सेवा असलेल्या वाहनांमध्ये घडल्या आहेत. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांशी किंवा संबंधित यंत्रणेशी संपर्क साधता यावा, यासाठी पॅनिक बटण आणि वाहनाच्या सद्य:स्थितीची माहिती देणारी व्हेइकल ट्रॅकिंग यंत्रणा बसवण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार सर्व सार्वजनिक सेवा वाहनांना व्हेइकल ट्रॅकिंग यंत्रणा प्रणाली आणि पॅनिक बटण बसवण्याचे १ जानेवारी २०१९ पासून अनिवार्य केले होते. यामधून दुचाकी वाहने, ई-रिक्षा, तीनचाकी वाहने आणि ज्या वाहनांना परवाना लागू नाही, अशी वाहने वगळण्यात आली आहेत.

पॅनिक बटण म्हणजे काय?
गैरवर्तणूक झाल्यास किंवा असुरक्षितता वाटल्यास प्रवासी पॅनिक बटण दाबू शकतो. ही माहिती नियंत्रण कक्षाला जाते. व्हेइकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइसद्वरे लोकेशन समजते.

कसे काम करणार?
पॅनिक बटण दाबल्यानंतर व्हेइकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइसद्वारे याची माहिती अंधेरीतील नियंत्रण कक्षाला मिळेल. या कक्षात दोन पोलिस आणि दोन आरटीओ अधिकारी असणार आहेत. नियंत्रण कशाला आलेला कॉल घटनेनुसार त्या ठिकाणच्या पोलिस, रुग्णवाहिका किंवा आरटीओ यांना वर्ग करणार आहे. प्रवाशांना चालकाकडून त्रास होत असेल तर पोलिस आणि आरटीओ अधिकारी जातील. तसेच एखादा अपघात घडला असेल तर पोलिस आणि रुग्णवाहिका पाठवली जाणार आहे.

प्रवाशांच्या मदतीसाठी व्यावसायिक वाहनांमध्ये पॅनिक बटण बसविण्यात आलेले आहे. व्हेइकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइसद्वारे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अंधेरी येथे नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. येत्या १ मार्च रोजी त्याचे उद्घाटन होणार आहे.
- विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com