स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथीनिमित्त अवयवदान
स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथीनिमित्त अवयवदान
पोलादपूर, ता. २५ (बातमीदार) ः शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ, महाड संचालित पोलादपूर येथील सुंदरराव मोरे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी रक्तदान, नेत्रदान आणि अवयवदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. राम बरकुले यांनी आपल्या पीपीटी सादरीकरणाद्वारे विद्यार्थ्यांना मानवी जीवनातील रक्तदान, नेत्रदान आणि अवयवदान यांचे महत्त्व आणि त्याबाबतची कार्यपद्धतीबाबत माहिती दिली. या वेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. बरकुले यांनी भारतात आजारपण, शस्त्रक्रिया आणि विविध अपघातांमुळे सातत्याने रक्ताची मागणी वाढत असल्याचे अधोरेखित करून रक्ताची मागणी व पुरवठा यात मोठी तफावत असल्याचे नमूद केले. रक्त आणि रक्तदात्याच्या अनुपलब्धततेमुळे मौल्यवान मानवी जीवन वाचविणे शक्य होत नाही, असे मत व्यक्त करून विद्यार्थ्यांनी रक्तदानाबद्दल असलेले समाजातील विविध गैरसमज दूर करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. रक्तदानाप्रमाणेच मरणोत्तर नेत्रदान करणेसुद्धा महत्त्वाचे कार्य असल्याचे सांगितले. अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सुनील बलखंडे यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या स्मृतीला अभिवादन करून सावरकरांचे जाज्वल्य देशप्रेम, सामाजिक सुधारणांचे कार्य, प्रखर विज्ञाननिष्ठा यामधून आजच्या तरुण पिढीला खूप काही शिकण्यासारखे असल्याचे मत व्यक्त केले. रासेयो विभागाचे डॉ. शैलेश जाधव यांनी कार्यक्रमाच्या अखेरीस आभार प्रदर्शन केले. जनजागृती कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. महेश वल्ले यांच्यासह विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

