साखळी ओढल्‍याने रेल्‍वेला लेटमार्क

साखळी ओढल्‍याने रेल्‍वेला लेटमार्क

Published on

साखळी ओढल्‍याने रेल्‍वेला लेट मार्क
दर महिन्याला  २५८  प्रवाशांकडून गैरवापर; १०.४१  लाखांचा दंड वसूल
 सकाळ वृत्तसेवा   
मुंबई, ता. २५  : मध्य रेल्वेवर जानेवारी  ते डिसेंबर २०२४  या कालावधीत तीन हजार ९६ जणांनी विनाकारण रेल्‍वेमधील आपत्‍कालीन साखळी खेचली असून, त्यांच्याकडून १० लाख ४१ हजार ५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. साखळी खेचण्याच्या घटनांमुळे मेल/एक्स्प्रेस गाड्यांना उशीर झाला. त्यामुळे सरासरी १० मिनिटांचा वक्तशीरपणा कमी झालेला आहे.
मुंबई विभागात कल्याण, दादर, ठाणे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कसारा, पनवेल, लोकमान्य टिळक टर्मिनस आंबिवली, टिटवाळा येथे साखळी खेचण्याच्या घटना वारंवार घडतात.
जानेवारी  ते डिसेंबर २०२४  या कालावधीत मध्य रेल्वेवर विनाकारण संकटकालीन साखळी खेचण्याच्या घटनांमुळे लांब पल्ल्याच्या  गाड्या उशिराने धावल्या. यामध्ये २ हजार ४२६ व्यक्तींविरुद्ध विनाकारण आपत्‍कालीन साखळी खेचण्याच्या गैरवापराचे गुन्हे नोंदविण्यात आले. साखळी खेचण्याच्या घटनांमुळे मध्य रेल्वेवर मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या वक्तशीरपणावर परिणाम होतो.

कधी ओढता येते साखळी ?
  रेल्वेने प्रत्येक उपनगरीय आणि मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये आपत्‍कालीन साखळी खेचण्याचा  पर्याय उपलब्ध करून दिला आहे. उशिरा पोहोचणे, मध्यवर्ती स्थानकांवर चढ-उतार करणे इत्यादी अनावश्यक कारणांसाठी प्रवासी संकटकालीन साखळी खेचत असल्याचे दिसून आले आहे.

लोकललाही  बसतो फटका 
ट्रेनमधील साखळी खेचण्याच्या कृतीचा केवळ त्या विशिष्ट ट्रेनच्या धावण्यावरच परिणाम होत नाही, तर पाठीमागून येणाऱ्या गाड्यांवरही मोठा परिणाम होतो. मुंबई विभागासारख्या उपनगरीय चलन प्रणालीमध्ये अशा घटनांमुळे मेल/एक्स्प्रेस व उपनगरीय गाड्या उशिराने धावतात आणि त्यांच्या वक्तशीरपणाला बाधा येते. पुढे एक किंवा काही प्रवाशांच्या सोयीसाठी साखळी खेचण्याने इतर सर्व प्रवाशांची गैरसोय होते.

अनावश्‍यक परिस्थितीत साखळी खेचणे हा रेल्वे कायद्याच्या कलम १४१ नुसार दंडनीय अपराध आहे. यासाठी एक वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा ठोठावल्‍या जातील. गैरसोय टाळण्यासाठी आपली गाडी सुटण्याच्या किमान ३० मिनिटे आधी टर्मिनस/स्टेशनवर पोहोचण्याचा सल्ला दिला जातो , असे आवाहन मध्य रेल्वेने प्रवाशांना केले आहे. 

कोणत्या गाड्यांना सर्वाधिक फटका

- पनवेल - गोरखपूर एक्स्प्रेस
- लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर एक्स्प्रेस
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
- हावडा मेल (मार्गे-अलाहाबाद)
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - हावडा मेल (नागपूरमार्गे)
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - लखनऊ पुष्पक एक्स्प्रेस
- लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर एक्स्प्रेस

गेल्या वर्षाची आकडेवारी 
महिना - घटना -  दंडवसुली - अटक केलेल्या व्यक्ती 
जानेवारी - २४१ - १,००,३५० - २००
फेब्रुवारी - २५० - ८२,४०० - १९२ 
मार्च - २४७ - ७७,६०० - १७९
एप्रिल -  २७६ - ९७,१०० - २१४
मे  - २७६ - ८७,७०० - २१७
जून - २७० - १,०३,२०० - २००
जुलै - २५३ - ९१,१०० - २००
ऑगस्ट - २४० - ८०,६०० - १९६
सप्टेंबर -  २५६ - ७८,७०० - २०३
ऑक्टोबर - २४९ - ६८,५०० - २०७
नोव्हेंबर - २७३ - ७८,१०० - २०३
डिसेंबर - २६५ - ९५,७०० - २१५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com