रासायनिक खतांमुळे आरोग्य धोक्यात

रासायनिक खतांमुळे आरोग्य धोक्यात

Published on

रासायनिक खतांमुळे आरोग्य धोक्यात
अनिल नरगुलवार यांचे प्रतिपादन; आत्मा योजनेअंतर्गत डहाणूमध्ये शेतकऱ्यांना प्रशिक्षण
वाणगाव, ता. २६ (बातमीदार) : सध्या रासायनिक खतांचा अतिवापर, पिकांचे अवशेष जाळणे, पिकांचे योग्य फेरपालट न करणे, मशागतीच्या अयोग्य पद्धती, गाई-म्हशींचे घटते प्रमाण त्यामुळे शेणखताच्या कमी वापरामुळे जमिनीचा पोत बिघडून सुपीकता कमी झाली आहे. शेतीत अति रासायनिक खत, औषध वापरलेल्या जमिनीतून उत्पादित होणाऱ्या कृषी मालाचे पोषणमूल्य खालावलेले आहे. यामुळे अशा पिकवलेल्या अन्नामध्ये उर्वरित कीटकनाशकांचे प्रमाण कमाल मर्यादेपेक्षा अधिक असल्याने त्याचा मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचे डहाणू तालुका कृषी अधिकारी अनिल नरगुलवार यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणा डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन राज्य पुरस्कृत आत्मा योजनेअंतर्गत तालुक्यातील गावात सेंद्रिय शेतीअंतर्गत डहाणू तालुक्यातील गोवणे, उर्सेसह गावपातळीवर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी ते बोलत होते.
----------------------------
सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती प्रशिक्षणामध्ये जमिनीचे आरोग्य सुधारणे, नैसर्गिक शेतीखालील क्षेत्रात वाढ करणे, समूह संकल्पनेद्वारे सेंद्रिय शेतमाल उत्पादित गट तयार करून शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणे आणि त्या माध्यमातून जैविक निविष्ठा स्थानिक पातळीवर उपलब्ध करणे या दृष्टिकोनातून सेंद्रिय शेतीची संकल्पना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम गावपातळीवर सुरू करून प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- नामदेव वाडिले, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणा, डहाणू
-------------------------------------
साधारणतः जमिनीमध्ये १ टक्क्यापेक्षा जास्त सेंद्रिय कर्बाचे प्रमाण असणे आवश्यक आहे. त्यासाठी जमिनीतील जीवसृष्टीच्या वाढीसाठी पोषक वातावरण ठेवावे लागते. जमिनीचे आरोग्य सुधारण्यास शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.
- अनिल नरगुलवार, तालुका कृषी अधिकारी, डहाणू
--------------------------------------
प्रशिक्षणामुळे सेंद्रिय शेतीबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. पर्यावरणपूरक शेतीच्या दिशेने ठोस पावले उचलणार आहोत व इतर शेतकऱ्यांना यासाठी प्रोत्साहित करू.
- दिलीप निकोले, अध्यक्ष, डहाणू कृषिजीवनी सेंद्रिय उत्पादक कंपनी, उर्से
----------------------------------------------
नैसर्गिक शेतीचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना शेतीवर, नैसर्गिक आणि घरगुती संसाधनांचा वापर करून आवश्यक जैविक निविष्ठा तयार करण्यास प्रोत्साहित करून उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात कपात करणे आहे. तसेच नैसर्गिक शेतीचा सर्वात तत्काळ परिणाम मातीच्या जीवशास्त्रावर होतो. सूक्ष्म जीव आणि गांडुळासारख्या इतर सजीवांवर मातीचे आरोग्य पूर्णपणे अवलंबून असते. त्यामुळे नैसर्गिक शेतीचा अवलंब केल्याने मातीचे आरोग्य सुधारते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com