पनवेल महाशिवरात्री
‘ओम नमः शिवाय’चा गजर
नवी मुंबईतील शिवमंदिरांत भक्तांच्या रांगा; धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन
तुर्भे, ता. २६ (बातमीदार) : शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे, शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे, शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे म्हणत नवी मुंबईतील महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील सर्वच शिवमंदिरात दर्शनासाठी सकाळपासूनच शिवभक्तांनी रीघ लावली होती. या दिवशी अनेक जण उपवास करीत असल्याने मंदिरात विश्वस्त तसेच अनेक सामाजिक संस्था, मित्र मंडळाकडून तीर्थप्रसाद व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.
सकाळपासूनच शिव भजनांनी मंदिर परिसर दुमदुमला होता. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या पावणे गावातील जागृत देवस्थान असलेल्या शिवमंदिरात भक्तांनी मध्यरात्रीपासूनच रांगा लावल्या होत्या. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिर समितीकडून हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या पावणेश्वर मंदिरात भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
दिवाळे कोळीवाड्यातील स्वयंभू श्री देवासूर महादेव मंदिर, श्री जगन्नाथेश्वर मंदिर, आग्रोळी गावातील प्राचीन अमृतेश्वर, पावणेश्वर, वाशीतील जागृतेश्वर मंदिर, कोपरखैरणेतील चिकनेश्वर तसेच सानपाडा, घणसोली, सारसोले गावातील मंदिरात दिवसभर ‘ओम नमः शिवाय’चा गजर सुरू होता.
शिवमंत्राचा जप
शास्त्रानुसार महाशिवरात्रीची पूजा चार प्रहरमध्ये करतात. या चार प्रहरात पूजा केल्यामुळे धर्म, धन, काम आणि मोक्ष प्राप्त होतो. भगवान शंकराला दूध अर्पण करून त्यांना पाण्याच्या प्रवाहाने अभिषेक करण्यात येतो. या वेळच्या पूजेमध्ये शिवमंत्राचा जप किंवा शिवाची स्तुती करणे विशेष फलदायी मानली जाते.
उत्सवाला धार्मिक, वैज्ञानिक कारण
महाशिवरात्री अतिशय पवित्र आणि अद्भुत शक्तीचा सण मानला जातो. यादिवशी महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. या दिवसाला धार्मिकसोबत वैज्ञानिक कारण आहे. या रात्री अनेक जण जागरण करतात. त्यासोबत या दिवशी शुभ मुहूर्तावर महादेवाची पूजा केल्याने शिवलोकाची प्राप्ती, शिवाशी तादात्म्य, मोक्ष प्राप्त होते, असा विश्वास शिवभक्तांना आहे.
..................
पुरातन शिवमंदिरांत रांगा
खारघर, ता. २६ (बातमीदार) : खारघरमधील पुरातन मंदिर म्हणून ओळखले जाणारे सेक्टर १२ मधील शिवमंदिर, तळोजा मध्यवर्ती कारागृहाजवळ डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या स्वयंभू शिवमंदिर आणि कोपरा गावातील महादेव शिवमंदिरात भक्तांच्या रांगा लागल्या होत्या.
खारघरवासीयांचे श्रद्धेचे स्थान असलेले खारघर सेक्टर १२ मधील देवाळेश्वर हे पुरातनकालीन मंदिर म्हणून ओळखले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मंदिर उभारल्याचे तर महंमद गझनी याने मंदिराची तोडफोड केल्याचे आणि मंदिरातील महादेवाची पिंड स्वयंभू असल्याचे गावातील जाणकार सांगतात. पूर्वी मंदिर विटा आणि कौलारू होते. कालांतराने खारघर गावाचे रूपांतर शहरात झाले.
पुरातन शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त जत्रा भरत असल्यामुळे खारघर वसाहत आणि पंचक्रोशीतील भक्तांनी बुधवारी पहाटेपासून गर्दी केली होती. उन्हामुळे भक्ताची गैरसोय होऊ नये म्हणून मंडप उभारण्यात आले होते. पहाटे अभिषेक, त्यानंतर दिवसभर भजन, कीर्तनाचे कार्यक्रम सुरू होते. खारघर पोलिस आणि वाहतूक शाखेकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आले होते. नवरंग सर्कल ते चेरेबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला भरलेल्या यात्रेत संसारोपयोगी वस्तू, खेळणी, सौंदर्य प्रसाधनांच्या वस्तूची खरेदीसाठी गर्दी झाली होती. महाशिवरात्री उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शिवमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आत्माराम पाटील, पदाधिकारी भगवान भगत, नामदेव भगत, रमेश खडकर, सदस्य बाबूराव पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली. तळोजा मध्यवर्ती कारागृहालगत असलेल्या टेकडीवरील मंदिरात भाविकांनी रात्रीपासून गर्दी केली होती. याठिकाणी स्वयंभू पिंड आहे. याठिकाणी खारघर वसाहतीसह रोहिंजन, ओवेपेठ, इनामपुरी, तळोजा, खारघर आदी परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती. मंदिरात सकाळपासून भजन, कीर्तन, हरिपाठ सुरू होते. येणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर ट्रस्टकडून प्रसाद, अल्पोपाहाराची व्यवस्था केली होती.
................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

