रायगड महाशिवरात्री

रायगड महाशिवरात्री

Published on

मंदिरांत घुमला ‘हर हर महादेव’चा गजर
अभिषेक, पूजा-अर्चेसह धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

अलिबाग, ता. २६ (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. २६) महाशिवरात्रीनिमित्ताने ‘हर हर महादेव’चा गजर घुमला. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शिवमंदिरात गर्दी पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
अलिबाग शहरातील प्रती काशी म्हणून ओळखले जाणारे काशी विश्वेश्वर मंदिर, गोकुळेश्वर येथील शिवमंदिर, तालुक्यातील चौल रामेश्‍वर, मापगाव येथील कनकेश्‍वर, नारंगी भुवनेश्‍वर आदी ठिकाणी भक्तांनी महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. हर हर महादेवचा गजर करीत अनेक ठिकाणी धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
अलिबाग तालुक्यातील श्रीक्षेत्र कनकेश्‍वर येथे महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, तसेच सायंकाळी पालखी सोहळा साजरा झाला. तसेच रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी लक्षणीय होती.
श्रीवर्धन तालुक्यातील श्रीक्षेत्र हरिहरेश्‍वर येथील महाशिवरात्रीनिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत तालुक्यातील उल्हास, चिल्लार, पेज या तीन नद्यांच्या संगमावर असलेल्या कोल्हारे येथील श्री क्षेत्र संगमेश्‍वर येथे दर्शनासाठी हजारो शिवभक्त उपस्थित होते. मंदिरात दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. दिवसभर भजन, कीर्तन, प्रवचन तसेच विविध सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पुरातन तमनाथ तसेच पोसरी येथील तलावात असलेले शिवमंदिर येथे अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत.

...............
भाविकांकडून जल, दुग्‍धाभिषेक
पोयनाड, ता. २६ (बातमीदार) : महाशिवरात्रीचे औचित्य साधून जिल्‍ह्यातील विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. हर हर महादेव, ॐ नमः शिवाय अशा गजराने मंदिर परिसर दुमदुमला होता. जलाअभिषेक, दुग्‍धाभिषेक, पूजा-अर्चा, भजन, कीर्तन, हरिपाठ, पालखी यांसारखे कार्यक्रम आयोजित केले होते. पोयनाड परिसरात प्रामुख्याने कमळपाडा येथील शंकराचे मंदिर, बांधण येथील लिंगेश्वर, बोपोली येथील चंद्रमोळेश्वर, कातळपाडा येथील महादेव मंदिर, श्रीगाव येथील श्री शिवबा मंदिर आदी मंदिरांमध्ये भाविकांनी रांगा लावल्‍या होत्‍या. दुपारच्या वेळी उन्हाचा तडाख्यामुळे काही काळ गर्दी ओसरली होती. मंदिर परिसरात ठिकठिकाणी यात्रा भरल्‍या होत्‍या. भाविकांसाठी महाप्रसाद, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, उपवासासाठी फराळ, मंडप यांसारख्या सोयी-सुविधांची तरतूद करण्यात आली होती.

पोयनाड : महाशिवरात्रीनिमित्त महादेवाच्या मंदिरात फळांची आरास केली होती.

............

सरसगडावरील केदारेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी

पाली, ता. २६ (वार्ताहर) ः पालीत सरसगड किल्ल्यावरील केदारेश्वर मंदिरामध्ये बुधवारी (ता. २६) भाविकांनी गर्दी केली होती. सरसगडाचा इतिहास जाणून घेत शिवभक्‍तांनी परिसर भ्रमंतीचा आनंद घेतल्‍याचे शिक्षक कैलास सांगळे यांनी सांगितले. या वेळी बच्चे कंपनीचा सहभाग मोठा होता. महाशिवरात्रीनिमित्त केदारेश्वर मंदिर सजवण्यात आले होते. आजूबाजूचा परिसर साफ व स्वच्छ करण्यात आला होता. भगव्या पताकांसह दिमाखात झेंडा फडकवण्यात आला. किल्ल्याच्या महादरवाजावर तोरण लावण्यात आले होते.

पाली ः सरसगड किल्ल्यावरील केदारेश्वराचा मंदिर परिसर सजवण्यात आला होता.
...............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com