थोडक्‍यात बातम्या रायगड

थोडक्‍यात बातम्या रायगड
Published on

रोटरी क्लबकडून उपजिल्हा रुग्णालयाला लेन्सचे वाटप
माणगाव (बातमीदार) ः रोटरी क्लब ऑफ मुंबई सेंट्रलच्या सहकार्याने क्लब अध्यक्ष सुरंगी मेहता, डॉ. सुनील वसानी, संचालक सोनल गुप्ता आणि दत्ताराम पांडुरंग शिंदे यांच्या माध्यमातून माणगाव उपजिल्हा रुग्णालयाकरिता डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी १०० अक्रिफोल्ड, १०० सर्जिकल ब्लेड, १०० आय ड्रॉप भेट देण्यात आले. तसेच या आधी २०२२ मध्ये अत्याधुनिक डोळ्याचे ऑपरेशनमशीन व सियाम मशीन रोटरी क्लब ऑफ मुंबईच्या मार्फत भेट करण्यात आली. यामुळे तालुक्यातील अनेक नेत्ररुग्णांना याचा मोठा फायदा होत असल्याचे डॉ. शंतानु डोईफोडे यांनी सांगितले. यावेळी रोटरी क्लब मुंबई सेंट्रलचे संचालक दत्ताराम शिंदे, डॉ. शंतनू डोईफोडे, सहायक अधीसेविका लता राठोड, इन्चार्ज सिस्टर शिवकांती गवळी, वैभव सत्वे आदी रुग्णालय कर्मचारी उपस्थित होते. रोटरी क्लबचे पदाधिकारी दत्ताराम शिंदे यांनी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्‍या सुविधाकरिता आढावा घेतला होता. त्‍यानुसार त्‍यांनी वैद्यकीय साहित्‍यांचे वाटप केले. या आधी २०० लेन्स उपजिल्हा रुग्णालयाला देण्यात आल्या असून लवकरच ४०० लेन्स वर्षभरात देण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. रोटरी क्लब ही संस्था महानगरी मुंबई शहरात कार्यरत आहे. क्लबचे प्रोजेक्ट चेअरमन दत्ताराम पांडुरंग शिंदे हे माणगाव तालुक्यातील रहिवाशी आहेत. त्‍यामुळे आपल्या मातृभूमी असलेल्या तालुक्यातील सर्वसामान्य रुग्णांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम राबवित असतात.
..........
एम. बी. मोरे विद्यालयात शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण
रोहा, ता. २६ (बातमीदार) ः धाटाव येथील एम. बी. मोरे विद्यालयात शिक्षकांसाठी दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी मेघना धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या प्रशिक्षणात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या वर्षात महाराष्ट्र शासनाने केलेले अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय रचनेत होणारे विविध बदल याविषयी माहिती देण्यात येत आहे. तज्ज्ञ‍ मार्गदर्शक व तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षणसेवक असे एकूण २९५ प्रशिक्षणार्थींना मौखिक तसेच विस्तारित व प्रात्यक्षिक स्वरूपात प्रशिक्षण देत आहेत. तसेच हे प्रशिक्षण साधनव्यक्ती श्रद्धा पाटील यांच्या नियोजनाखाली पार पडत आहे. प्रशिक्षणातून राष्ट्रीय शैक्षणिक २०२० ची अंमलबजावणी व कार्यपद्धती समजावून सांगणे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे समग्र प्रगती पत्रक, शाळा मूल्यांकन आराखडा इत्यादी विषयांची विस्तृत माहिती प्रशिक्षणार्थींना मिळणार आहे. संबंध महाराष्ट्रात येणारे शैक्षणिक वर्ष हे केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड अर्थात (सिबीएसइ) प्रमाणे सुरू होणार आहे. त्या दृष्टिकोनातून हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. त्‍यामुळे प्रत्येक शिक्षकाने हे प्रशिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांप्रती तळमळीने अध्यापन करून आपली शाळा राज्यस्तरावरील अ मूल्यांकनात कशी येईल, यासाठी प्रयत्न करावेत, अशी माहिती रोहा पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी मेघना धायगुडे यांनी दिली आहे.
.........
शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदलीबाबत कार्यवाही करण्याची मागणी
माणगाव (वार्ताहर) ः राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांची प्रक्रिया कालबद्ध पध्दतीने एप्रिल, मेमध्ये राबवली जाते. मात्र लोकसभा व विधानसभा निवडणूक आचारसंहिता असल्याने ती राबवली गेली नाही. ही प्रलंबित बदली प्रक्रिया पवित्र पोर्टल शिक्षक भरती पूर्वी राबवावी, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघाच्या वतीने ग्रामविकास विभागाकडे करण्यात आली आहे. यामध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ ची सेवाज्येष्ठता ग्राह्य धरावी, प्रचलित बदलीचे ऑनलाईन पद्धतीचे बदली धोरण कायम ठेवावे, यापूर्वी फॉर्म भरलेल्या शिक्षकांना ऑनलाइन बदली प्रक्रियेत प्राधान्यक्रम बदलण्यास संधी द्यावी, तसेच जून २०२५ पात्र निकष लावून नव्याने पात्र होणाऱ्या शिक्षकांना ही आवेदन पत्र भरण्यास संधी उपलब्ध करून द्यावी. तसेच वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या पती-पत्‍नी शिक्षकांना कौटुंबिक न्याय द्यावा अन्यथा आपल्या न्याय हक्कांसाठी व संविधानिक मागणीसाठी कुटुंबासह बदली प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांना घेऊन आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक महासंघाच्या वतीने देण्यात आलेला आहे.
.........
लोकमान्य टिळक वाचनालयाचा सत्‍कार
खालापूर (बातमीदार)ः ग्रंथालय चळवळीतील विशेष कार्य व रायगड जिल्हाच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वाचे स्थान असलेल्या खालापूर तालुक्यातील चौक येथील लोकमान्य टिळक मोफत वाचनालयाने १०५ वर्षे पूर्ण केले आहे. त्‍यामुळे नुकताच वाचनालयाला शतकोत्तरी ग्रंथालयाचा सन्मान सहाय्यक ग्रंथालय संचालक प्रशांत पाटील यांच्या हस्ते देण्यात आला आहे. रायगड जिल्हामध्ये एकूण ६२ सार्वजनिक शासनमान्य ग्रंथालये आहेत. त्यातील ११ ग्रंथालयांनी शताब्दी पूर्ण केली आहे. यामध्ये ऐतिहासिक वारसा असलेल्या चौक गावातील वाचनालयाचा समावेश आहे. रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे ५९ वे वार्षिक अधिवेशनात चौक लोकमान्य टिळक मोफत वाचनालयचे सचिव सतिष आंबवणे व ग्रंथपाल अभिजीत चौधरी यांनी सन्मान चिन्हाचा स्विकार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com