रखडलेले झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प म्हाडाला देण्यास एसआरएची टाळाटाळ
रखडलेले प्रकल्प म्हाडाकडे देण्यास एसआरएची टाळाटाळ
१,२५० रहिवाशांना फटका बसण्याची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : म्हाडाच्या जागेवरील रखडलेले झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प (एसआरए) म्हाडाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार सुरुवातीला १७ प्रकल्प म्हाडाला देण्याबाबत एसआरए प्राधिकरणाने तयारी दर्शवली होती, मात्र त्यापैकी आतापर्यंत केवळ दोन प्रकल्प म्हाडाला देण्यासंदर्भात एलओआय दिले आहे. गोरेगाव प्रेमनगर येथील नऊ प्रकल्प देण्याबाबत एसआरएकडून टाळाटाळ केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा फटका १,२५० झोपडीधारक रहिवाशांना बसण्याची शक्यता आहे.
मुंबईत जवळपास ५१७ झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प वर्षानुवर्षे रखडले असल्याने तेथील झोपडीधारक रहिवासी पुरते बेहाल झाले आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्देशानुसार एसआरए प्राधिकरण जवळपास २२४ प्रकल्प म्हाडा, एमएमआरडीए, एसआरए सरकारी संस्थांना दिले जाणार होते. त्यानुसार म्हाडाला सुरुवातीला २१ प्रकल्प दिले जाणार होते. मात्र कायदेशीर अडचणी आणि आर्थिक व्यवहार्यता तपासल्यानंतर १७ प्रकल्प देण्याचे निश्चित झाले होते. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून एसआरएकडून गोरेगाव प्रेनगर येथील सुमारे ११ हजार ६५६ चौरस मीटरच्या भूखंडावरील १,२५० झोपड्यांचा समावेश असलेले नऊ रखडलेले एसआरए प्रकल्प देण्यास टाळाटाळ केली जात असल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, प्रकल्प रखडलेले संबंधित विकसक पुढे आल्याने प्रकल्प म्हाडाला देण्याबाबत वेळकाढूपणा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या रहिवाशांना आणखी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.
म्हाडाचे म्हणणे काय?
रखडलेले झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प म्हाडाला देण्यास विलंब होत असल्याप्रकरणी एसआरएकडे विचारणा केली असता, आम्ही हे प्रकल्प म्हाडाला देणार आहोत. सध्या प्रकल्पाचे नकाशे बनवण्याचे, पायाभूत सोयीसुविधांबाबतचे नियोजन सुरू आहे. ते पूर्ण होताचा म्हाडाला प्रकल्प दिले जातील, असे एसआरएचे उपमुख्य अभियंता आर. बी. मिटकर यांनी सांगितले.
- गोरेगाव प्रेमनगर झोपडपट्टीतील नऊ प्रकल्प
- ११ हजार ६५६ चौरस मीटरचा भूखंड
- १,२५० झोपड्या
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

