मराठी माध्यमांच्या मुख्याध्यापकांची बांधली मोट
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : मागील काही वर्षांपासून सर्वच क्षेत्रांत चढाओढ आणि स्पर्धा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच शिक्षण विभागातदेखील यात मागे नाही. भविष्यातील ‘इंग्रजी’ची भासणारी गरज लक्षात घेत पालकांनीदेखील आपल्या पाल्यांना ‘मराठी’ऐवजी इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेण्याकडे कल वळविला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम थेट मराठी शाळांच्या पटसंख्येवर झाला आहे. मराठी माध्यमातील शिक्षक पटसंख्येअभावी अतिरिक्त ठरू लागले आहेत. जिल्ह्यातील मराठी शाळांचे अस्तित्व टिकून राहावे, यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचा माध्यमिक विभाग सरसावला असून, मराठी माध्यमाच्या शाळांतील मुख्याध्यापकांची मोट बांधण्यात येत आहे.
ठाणे जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून इंग्रजी शाळांचे प्रमाण वाढत आहे. त्या तुलनेत मराठी शाळांच्या होणाऱ्या पिछेहाटमुळे मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. दुसरीकडे पटसंख्येअभावी शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरू लागेल आहेत. त्यांच्या समायोजनाचा प्रश्नदेखील उभा ठाकला जात आहे. तसेच या शिक्षकांचे जिल्ह्यातील ज्या शाळांमध्ये रिक्त पदे असतील त्या जागेवर त्यांचे समायोजन होते अन्यथा त्यांचे इतर जिल्ह्यांमध्ये समायोजन करावे लागते. त्यामुळे शिक्षकांसह त्यांच्या कुटुंबीयांची फरपट होते. यामुळे मराठी शाळा बंद झाल्यास परिणामांची जाणीव मुख्याध्यापकांना करून देण्यात येत आहे.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील मराठी शाळांचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी ललिता दहितुले या दोन वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. मराठी शाळांतील मुख्याध्यापकांच्या ऑफलाइन आणि ऑनलाइन या दोन्ही पद्धतीने जवळपास सात बैठका घेतल्या. या वेळी मुख्याध्यापकांकडूनदेखील उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दहितुले यांनी सांगितले. नेक शाळांनी सीएसआर निधीतून कायापालट केला असून, परिणामी पटसंख्या वाढली आहे. त्यामुळे स्पर्धेत मराठी शाळादेखील टिकून राहतील, अशी माहिती दहितुले यांनी दिली.
संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांचे परिवर्तन होऊन मराठी शाळा स्पर्धात्मक युगात टिकून राहण्याबरोबरच व दर्जेदार शिक्षण कसे देता येईल, त्याचे नियोजन कसे करावे, याबाबत चर्चा करण्यात आली आहे. त्यानुसार अनेक शाळांचा सीएसआरच्या निधीतून कायापालट करण्यात आला आहे. डिजिटल व स्मार्ट शाळा तयार करण्यावरदेखील भर देण्यात येत आहे.
- ललिता दहितुले, शिक्षणाधिकारी (माध्यमिक विभाग), ठाणे जिल्हा परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

