ठाणे पालिकेला मराठीचे वावडे ?
ठाणे पालिकेला मराठीचे वावडे?
मराठीतून ‘एमए’ करणाऱ्याला अतिरिक्त वेतनवाढ नाही; पालिकेचे परिपत्रक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासनाकडून हालचाली सुरू असून मुख्यमंत्र्यांनीदेखील मराठी भाषेचा शासकीय कार्यालयात वापर करण्याच्या सूचना केल्या आहेत. असे असताना, दुसरीकडे ठाणे महापालिकेत यापुढे मराठी भाषेतून ‘एमए’ करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ न देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ राबविणाऱ्या ठाणे पालिकेला मराठी भाषेचे वावडे का, असा सवाल ठाणेकरांकडून विचारला जात आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासनाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील शासकीय कार्यालयात मराठी भाषेचा वापर करण्याचे स्पष्ट केले. त्यातच काही दिवसांपूर्वी ठाणे पालिकेनेदेखील जानेवारीमध्ये ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ अभियान राबविले; मात्र दुसरीकडे मराठीतून ‘एमए’ करू पाहणाऱ्यांच्या अपेक्षा ठाणे महापालिकेने भंग केल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या आस्थापनेवरील जे अधिकारी, कर्मचारी महापालिकेची पूर्व परवानगी घेऊन डीएमजीएफएम, एलएसजीडी, एमए (मराठी) व तत्सम अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करतात, त्यांच्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून अतिरिक्त वेतनवाढ दिली जात होती; विद्यमान खासदार नरेश म्हस्के हे ठाणे महापालिकेत सभागृह नेते होते, त्यावेळेस तशा आशयाचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला; परंतु हा ठराव रद्द करायचा झाल्यास त्यासाठी पुन्हा महासभेपुढे जाणे अपेक्षित असताना महापालिकेने परिपत्रक काढून यापुढे जे अशा प्रकारचे शिक्षण घेणार असतील त्यांना अतिरिक्त वेतनवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
..
सातव्या वेतन आयोगाचा दाखला
महापालिकेने काढलेल्या परिपत्रकात महापालिकेत सातवा वेतन आयोग लागू झाला आहे, सातव्या वेतन आयोगामध्ये शिक्षणावर आधारित अतिरिक्त वेतनवाढी देय असण्याबाबत शासन निर्देश अद्याप प्राप्त झालेले नाही; यामुळे डीएमजीएफएम, एलएसजीडी, एमए (मराठी) व तत्सम अभ्यासक्रमासाठी देण्यात येणाऱ्या अतिरिक्त वेतनवाढीबाबत प्रशासनाने अंतिम निर्णय आवश्यक असल्याचे निरीक्षण मुख्य लेखापरीक्षक यांनी नोंदविले होते. या निरीक्षणाच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आल्याने आता यापुढे अशा प्रकारचे शिक्षण घेणाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ देता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे जे अशा पद्धतीने शिक्षण घेणार असतील त्यांना अतिरिक्त वेतनवाढ देता येणार नसल्याचे परिपत्रकार नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ठाणे पालिका प्रशासनाला मराठीचा विसर पडला का, असा प्रश्न उभा ठाकला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

