पालिका उपायुक्तांसह शिक्षणाधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करा

पालिका उपायुक्तांसह शिक्षणाधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करा
Published on

पालिका उपायुक्तांसह शिक्षणाधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करा
मनसेच्या गजानन काळे यांची मागणी; सहलीदरम्यान विद्यार्थी मृत्यू प्रकरण
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २६ : नवी मुंबई महापालिकेच्‍या शाळेतील जवळपास २,२०० विद्यार्थ्यांना खालापूर येथील इमॅजिका पार्क या ॲडव्हेंचर सहलीसाठी नेण्यात आले होते. या वेळी घणसोली शाळा क्र. ७६ मधील आठवीत शिकणारा विद्यार्थी आयुष सिंग याचा सहलीदरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी मनसेकडून निष्काळजीपणाचा ठपका ठेवत शिक्षण विभाग पालिका उपायुक्त व शिक्षणाधिकारी यांचे तत्काळ निलंबन करण्यात यावे, अशी मागणी पत्रकार परिषद घेऊन मनसेचे गजानन काळे यांनी केली आहे.
पालिका अधिकारी, कंत्राटदार यांच्या चुकीच्या कारभारासंदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन नवी मुंबई मनसे मध्यवर्ती कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी मनसेचे नवी मुंबईतील प्रमुख नेते गजानन काळे यांनी पालिकेवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला आहे. मुळात शैक्षणिक सहल ही ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक व शैक्षणिक माहिती देणाऱ्या ठिकाणी नेण्यात याव्या, असा राज्य सरकारचा शासन निर्णय आहे. असे असताना शासन निर्णयाला केराची टोपली दाखवून हजारो मुलांना कडक उन्हात ॲडव्हेंचर पार्कमध्ये नेण्याचा अट्टाहास पालिका शिक्षण विभाग उपायुक्त, शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी का केला, असा सवाल काळे यांनी या वेळी उपस्‍थित केला. दहा विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असावा, असे परिपत्रक असताना या सूचनेचे पालन या वेळी करण्यात आले होते का? उन्हापासून वाचण्यासाठी मुलांना पुरेशी साधने देण्यात आली होती का? इमॅजिकामधील राईड अतिभव्य आणि धोकादायक असतानादेखील पालिका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ का केला? आतापर्यंत जवळपास १० हजारांहून जास्त विद्यार्थ्यांना इमॅजिका पार्कमध्ये नेण्यात आले आहे. यासाठी शिक्षण विभाग उपसंचालक यांच्याकडे प्रस्ताव सादर केला का, असे अनेक प्रश्न उपस्थित राहतात, असे या वेळी गजानन काळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com