

घणसोलीत लोककला केंद्राची उभारणी
नवी मुंबई महापालिकेकडून कार्यवाही सुरू; तीन माळ्याच्या इमारतीची बांधणी
तुर्भे, ता. ३ (बातमीवर) ः घणसोली येथे लवकरच लोककला केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी नवी मुुंबई महापालिकेकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना लोककला संगीताची पर्वणी मिळणार आहे. तर महापालिकेच्या ताफ्यात आता तीन करमणुकीची केंद्रे उपलब्ध होणार आहेत.
घणसोली गावाशेजारी लोककला केंद्रासाठी असलेल्या भूखंडावर तीन मजली इमारतीची लवकरच उभारणी होणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून कार्यवाही सुरू झाली आहे. पालिकेचे हक्काचे वाशी येथे विष्णुदास भावे नाट्यगृह मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात आले आहे. त्यानंतर ऐरोलीमध्ये दुसऱ्या एका नाट्यगृहाचे काम प्रगतिपथावर आहे. मागील साधारणतः आठ ते दहा वर्षे अडखळत सुरू असलेल्या ऐरोली येथील नाट्यगृहात लवकरच तिसरी घंटा वाजणार आहे. त्यामुळे हे नाट्यगृहदेखील लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्याच्या जोडीला आता घणसोली येथील लोककला केंद्राची बांधणी केली जाणार असल्याने लोककलेची आवड असणाऱ्या प्रेक्षकांना संगीताची पर्वणी प्राप्त होणार आहे. घणसोली गावालगत असलेल्या सेक्टर आठ येथील भूखंड क्रमांक २२ हा लोककला केंद्रासाठी (नाट्यगृह) राखीव असलेला भूखंड आहे. ३५४२.२८ चौ.मी. क्षेत्रफळावर हे केंद्र उभारण्यात येणार आहे. हा भूखंड सिडकोकडून महापालिकेकडे अनेक वर्षांपूर्वी हस्तांतरित झाला आहे; परंतु या लोककला केंद्राबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याने याचा फायदा भूमाफियांनी उचलला होता. या भूखंडावर अनेक अवैध बांधकामातून निघालेला राडारोडा टाकण्यात आला होता. यामुळे भूखंडावर डेब्रिजचे डोंगर निर्माण झाले आहेत. त्यामुळे लोककला केंद्राची उभारणी करताना डेब्रिजचे डोंगर साफ करण्याचे आव्हान आता पालिकेसमोर उभे राहिले आहे. आजच्याघडीला या भूखंडावरील डेब्रिज हटवून सुरक्षा भिंत बांधण्याचे काम निविदा मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. यामुळे लवकरच या भूखंडावर सुरक्षा भिंती बांधण्याच्या कामास सुरुवात होईल व त्यानंतर लोककला केंद्र बांधण्यास प्रारंभ होईल, असा आशावाद पालिका सूत्रांकडून व्यक्त केला जात आहे.
.....................
असे असेल केंद्र
तळमजला - प्रवेश लॉबी, ६८ कार पार्किंग
पहिला मजला - ५९ कार पार्किंग
दुसरा मजला - ३५० आसनाचे खुले मिनी थिएटर
प्रोजेक्टर रूम, ३५० आसनांचे ऑर्केस्ट्रा पीट व खुले ॲम्पीथिएटर,
दोन ग्रीन रूम, एक रंगीत तालीम कक्ष, पाच गेस्ट रूम
तिसरा मजला - दोन मल्टीपर्पज कल्चरल हॉल प्रस्तावित करण्यात आलेले आहेत. तसेच या इमारतीस दोन जिने व तीन पॅसेंजर लिफ्ट प्रस्तावित केल्या आहेत.
.............................
घणसोली येथील लोककला केंद्राच्या भूखंडावर सुरक्षा भिंतीचे काम लवकरच सुरू होईल. त्या अनुषंगाने लोककला केंद्रासंबंधी पुढील कार्यवाही होईल.
- डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.