थोडक्यात रायगड बातम्या
कॅप्टन निर्मलसिंग रंधावा उत्कृष्ट सामाजिक कार्य पुरस्काराने सन्मानीत
माणगाव, ता. ४ (बातमीदार) ः माणगाव येथील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या चॅरिझेन फाउंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन निर्मलसिंग रंधावा यांना रायगड कोकण रत्न वर्ष २०२५ चा उत्कृष्ट सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार दोन मार्च रोजी टी. एस. के. मंगल भवन, नागोठणे या ठिकाणी पार पडला. कॅप्टन निर्मलसिंग रंधावा हे माणगाव तालुक्यासह रायगड जिल्ह्यात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात गेली अनेक वर्षे काम करीत आहेत. सामाजिक क्षेत्रात काम करताना त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी माणगाव तालुक्यात अनेक ठिकाणी शिवण क्लासेस सुरू केले आहेत, शिवाय बहुजन समाजातील नागरिकांना ब्लँकेट, चादर, छत्र्या यांचे वाटप केले आहे. याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रात काम करताना त्यांनी विविध शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप वेळोवेळी केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल उपरोक्त संस्थेने घेऊन त्यांना यावर्षीच्या रायगड कोकण रत्न उत्कृष्ट सामाजिक कार्य पुरस्काराने सन्मानित केले आहे.
..................
नेने महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहाने साजरा
पेण (बातमीदार) ः भाऊसाहेब नेने महाविद्यालयातील मराठी विभाग आणि मराठी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त बदलापूर येथील श्याम जोशी यांच्या अभिजात मराठी या विषयावरील विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. सदानंद धारप, ग्रंथ सखा ग्रंथालयाचे ग्रंथपाल अर्चना कर्णीक, कला विभाग व राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हेमलता सावंत, ग्रंथपाल जी. जी. जोशी, हिंदी विभागप्रमुख डॉ. देविदास बामणे, विनायक गोखले विविध शाखांचे प्राध्यापक व विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून व कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. आपल्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. सदानंद धारप यांनी मराठी भाषेच्या गौरव दिनाच्या शुभेच्छा देत मराठी साहित्यातील कुसुमाग्रजांच्या अमूल्य योगदानाबद्दल ऋण व्यक्त केले. मराठी भाषेची महानता उदृत करताना मराठी भाषा समृद्ध असून, तिचा गौरव वाढीस लावण्याची जबाबदारी मराठी भाषिकांची असल्याचे सांगितले. यानंतर प्रमुख वक्ते शाम जोशी यांनी अभिजात मराठी या विषयावर बोलताना अभिजात या शब्दाचा अर्थ समजावून सांगितला. मराठीची समृद्धी तिची प्राचीनता विविध उदाहरणातून श्रोत्यांना उलगडून दाखविली. या वेळी त्यांनी मराठी भाषेसोबत मैत्री करण्यासाठी तिचे भरणपोषण करण्यासाठी शब्दांची आराधना करण्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.
..................
पेणमध्ये श्री सदस्यांकडून स्वच्छता मोहीम
पेण (वार्ताहर) : महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त पेण येथील प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी शहरात स्वच्छता अभियान राबविले. स्वच्छता अभियानामधून पेण शहरातील जवळपास २१.९९ टन कचरा गोळा केला. या वेळी पेण तालुक्यातील १६ बैठकांतील एक हजार ८१ श्री सदस्य उपस्थित होते. यादरम्यान श्री सदस्यांनी पेण शहरातील २१ किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करून एक आदर्श समाजापुढे ठेवला आहे. यामध्ये पेण तहसील, वन विभाग, पोलिस ठाणे, तालुका दिवाणी न्यायालय, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय, नगरपालिका कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, पेण रेल्वे स्थानक परिसर, पेण स्मशानभूमी, रामवाडी बस स्थानक, रामवाडी विभागीय कार्यालय, आरटीओ कार्यालय आदींसह शहराच्या कुंभार आळी, म्हाडा कॉलनी, नंदीमाळ नाका, शिवाजी चौक, हनुमान मंदिर ते चावडी नाका, न्यायालय ते बस स्टँड, नगरपालिका ते चिंचपाडा रोड, प्रायव्हेट हायस्कूल ते शिवाजी चौक रोड, उत्कर्ष नगर, चावडी नाका, साई मंदिर, रेल्वे स्टेशन ते ए. टी. पाटील चौक अंतोरे रोड, वैकुंठ धाम स्मशानभूमी ते आंबेडकर शाळा रस्ता, अशा अनेक ठिकाणचे परिसर स्वच्छता अभियानमार्फत स्वच्छ करण्यात आले. या स्वच्छता मोहीमअंतर्गत साधारणपणे १५.२७ टन सुका व ६.७१ टन ओला कचरा, असा २१.९९ टन कचरा गोळा करून नगरपालिकेच्या कचरा डेपोत त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत पेण नगरपालिका मुख्याधिकारी जीवन पाटील, आरोग्य अधिकारी दयानंद गावंड, मुख्य लेखापाल किरण शहा, पेण नगर परिषद, उपजिल्हा रुग्णालय, पेण दिवाणी व फौजदारी न्यायालय, पेण पोलिस स्थानक, पेण वन विभाग यास इतर सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
.................
वसंत पिंगळे यांचे निधन
पोयनाड (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील कुर्डुस येथील रहिवासी वसंत पोसू पिंगळे यांचे शनिवार १ मार्च रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ८५ होते. त्यांच्यावर कुर्डुस येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आदर्श शिक्षक या पुरस्काराने त्यांचा गौरव झाला होता. विविध ठिकाणी त्यांनी सेवा बजावून अनेक विद्यार्थी घडवले. परिसरात ते गुरुजी या नावाने प्रसिद्ध होते. कुर्डुस गावातील प्रत्येक सामाजिक व शैक्षणिक कार्यात त्यांचा पुढाकार असत. त्यांच्या पश्चात मुले, मुली, जावई, नातवंडे व समस्त पिंगळे परिवार आहे. त्यांचे दहावे १० मार्च रोजी हरिहरेश्वर येथे, तर उत्तरकार्य १२ मार्च रोजी कुर्डुस येथे राहत्या घरी होणार आहे. त्यांना कुर्डुस ग्रामस्थ मंडळाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
..............
कोलाड हायस्कूलमध्ये जापनीज इन्सेफेलाइटीस लसीकरण
रोहा (बातमीदार) ः जापनीज इन्सेफेलाइटीस हा एक गंभीर आजार असून, या रोगामुळे अपंगत्व येण्याची शक्यता असते. जापनीज इन्सेफेलाइटीस या विषाणूमुळे हा आजार होते. हा आजार संसर्गित डासांमुळे पसरतो. हा आजार तयार होऊ नये म्हणून लस तयार करण्यात आली आहे. या अनुषंगाने तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी यांच्यातर्फे द. ग. तटकरे माध्यमिक विद्यालय कोलाड येथे जापनीज इन्सेफेलाइटीस या लसीकरण मोहिमेचे उद्घाटन शनिवारी १ मार्च रोजी आंबेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सुरेश महाबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी प्रणय मिश्रा, हायस्कूलचे प्राचार्य वर्ग उपस्थित होता. या लसीकरण मोहिमअंतर्गत १ ते १५ वर्ष वयोगटातील १०, ६०५ विद्यार्थ्यांना ही लस दिली जाणार आहे. या अनुषंगाने भागातील विविध शाळा, अंगणवाड्या आदी ठिकाणी जाऊन लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी प्रणय मिश्रा यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

