उद्योग विश्वाचा डेटा लवकरच हाती

उद्योग विश्वाचा डेटा लवकरच हाती

Published on

नवनीत बऱ्हाटे : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. ४ : भारताच्या आर्थिक व्यवस्थेचा व्यापक मागोवा घेण्यासाठी केंद्र सरकारतर्फे राष्ट्रव्यापी आठवी आर्थिक गणना २०२५-२६ राबवली जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी उल्हासनगर पालिकेत महानगरपालिका स्तरावरील समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची प्रथम आढावा बैठक सोमवारी (ता. ३) स्थायी समिती सभागृहात पार पडली. महापालिका प्रशासक तथा आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत गणनेच्या कार्यपद्धती, नियोजन, अंमलबजावणी, प्रशिक्षण आणि पूर्वतयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
आठवी आर्थिक गणना ही देशातील आर्थिक क्षेत्राचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने हाती घेतलेली व्यापक मोहीम आहे. या गणनेत घरोघरी भेट देऊन, विविध उद्योग, व्यवसाय, सेवा क्षेत्रातील उपक्रम आणि घरगुती व्यवसायांची माहिती संकलित केली जाणार आहे. यामध्ये निवासी परिसरातील उद्योग, घरगुती व्यवसाय, तसेच सार्वजनिक आणि खाजगी आस्थापनांचा समावेश असणार आहे. या गणनेच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेचा संपूर्ण आकृतिबंध उभा राहणार असून भविष्यातील धोरणे ठरवण्यासाठी हा डेटा अत्यंत मोलाचा ठरणार आहे.
समन्वय समितीच्या या महत्त्वपूर्ण बैठकीला उल्हासनगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, उपसंचालक तथा विभागीय नोडल अधिकारी सरिता रणवरे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, उप-आयुक्त (मालमत्ता) अजय साबळे, प्रशासन अधिकारी (शिक्षण) कुंदा पंडीत, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा यांच्यासह पालिकेच्या विविध विभागांचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि जिल्हा उद्योग केंद्र तसेच बालविकास विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत उपसंचालक तथा विभागीय नोडल अधिकारी सरिता रणवरे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना गणनेच्या कार्यपद्धती, नियोजन, सर्वेक्षणाच्या टप्प्यांची माहिती आणि यासाठी लागणाऱ्या प्रशासकीय तयारीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

उल्हासनगर महापालिका आठवी आर्थिक गणना २०२५-२६च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सज्ज झाली आहे. पालिका स्तरावरील समन्वय समिती, प्रशासन आणि विविध विभागांचा सक्रिय सहभाग ही या गणनेच्या यशस्वीतेची गुरुकिल्ली ठरणार आहे.
- अजय साबळे, जनसंपर्क अधिकारी

संरचनेची अचूक माहिती मिळणार
पालिका क्षेत्रात लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगधंद्यांची संख्या अधिक आहे. या आर्थिक गणनेच्या माध्यमातून शहरातील व्यावसायिक संरचनेची अचूक माहिती मिळणार आहे, जी स्थानिक विकास योजना, उद्योग धोरणे आणि भविष्यातील आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

महत्त्वाचे टप्पे
१. पूर्वतयारी आणि योजना : गणनेसाठी आवश्यक मनुष्यबळ, तांत्रिक साधने आणि संकलन पद्धती निश्चित करणे.
२. प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी : सर्वेक्षणासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देऊन त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करणे.
३. माहिती संकलन आणि पडताळणी : घरगुती व्यवसाय, उद्योग आणि सेवा क्षेत्रातील नोंदणी व सत्यापनाची कार्यपद्धती ठरवणे.
४. डेटा संकलनाचे डिजिटायझेशन : सर्वेक्षणाच्या नोंदी डिजिटल स्वरूपात करून तंत्रज्ञानाच्या मदतीने गतिमान प्रक्रिया राबवणे.
५. समन्वय आणि अंमलबजावणी : राज्य आणि केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार आर्थिक गणना वेळेवर पूर्ण करणे.

पुढील टप्प्यातील कार्यवाही
* महापालिका स्तरावर विशेष प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत.
* आर्थिक गणनेसाठी नियोजित सर्वेक्षक आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे.
* शहरातील नागरिक, व्यावसायिक आणि उद्योजकांना गणनेच्या उद्देशाबद्दल जागरूक करण्यासाठी माहितीपत्रक आणि जाहिरात मोहिमा हाती घेतल्या जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com