सेन्सॉर बोर्डाविरोधात निदर्शने
सेन्सॉर बोर्डविरोधात निदर्शने
नामदेव ढसाळ प्रकरणी विविध संघटना आक्रमक
धारावी, ता. ४ मार्च (बातमीदार) : ‘चल हल्ला बोल’ या मराठी चित्रपटातील महाकवी नामदेव ढसाळ यांची रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो...ही कविता काढा. ‘कोण नामदेव ढसाळ’ असा उर्मट सवाल करणाऱ्या सेन्सॉर बोर्डविरोधातच आता ‘चल हल्ला बोल’ करूया, असा इशारा विविध जनसंघटना आणि कार्यकर्त्यांनी दिला आहे. लोकांचा सिनेमा चळवळ, दलित पँथर, लोकांचे दोस्त कष्टकरी शेतकरी संघटना, चर्मकार समाज, मातंग प्रतिष्ठान, संभाजी ब्रिगेड, भारतीय महिला फेडरेशन आदी संघटनांनी दादर (पूर्व) रेल्वे स्थानकाबाहेर रविवारी (ता. २) निदर्शने केली.
लोकांचा सिनेमा चळवळीच्या माध्यमातून लेखक, दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी लोक वर्गणीतून ‘चल हल्ला बोल‘ हा चित्रपट बनवला आहे. दलित पँथर, युक्रांद या चळवळींच्या पार्श्वभूमीवर दलित, आदिवासी, भटके विमुक्त, अल्पसंख्याक, मुस्लिम, शेतकरी, स्त्रिया आदींच्या शोषणाविरुद्ध लढ्याची भूमिका मांडणारा हा चित्रपट आहे, मात्र सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला परवानगी नाकारली आहे. सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी बोर्डाने तब्बल अकरा कट सांगितले आहेत. याबाबत महेश बनसोडे म्हणाले की, नामदेव ढसाळ यांची कविता काढा असे बोर्डाने लेखी कळवले आहे. याबाबत बोर्डाच्या अधिकाऱ्यांना आम्ही जाब विचारला असता, त्यांनी कोण नामदेव ढसाळ? आम्ही ओळखत नाही, असा उर्मट सवाल केला. त्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
सेन्सॉर बोर्ड जाणूनबुजून बहुजन संस्कृती आणि अभिव्यक्तीवर बंदी आणत असल्यामुळे सेन्सॉर बोर्डविरोधात मोहीम सुरू केल्याचे लोकांचे दोस्त संघटनेचे रवि भिलाणे यांनी स्पष्ट केले. या वेळी सुप्रसिद्ध लोकशाहीर संभाजी भगत, डॉ. स्वप्नील ढसाळ, संगीता ढसाळ, पँथर सुमेध जाधव, कॉम्रेड सुबोध मोरे, संभाजी ब्रिगेडचे प्रमोद शिंदे, आदिवासी नेते विठ्ठलभाऊ लाड, ज्योती बडेकर, काँग्रेसचे युवराज मोहिते, कॉम्रेड शैलेंद्र कांबळे आदी उपस्थित होते. विविध मान्यवरांनीही या मोहिमेला पाठिंबा दर्शवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

