

कलोते धरणात बेकायदा नौकानयन
सिंचनाच्या पाण्याचा वापर मनोरंजन केंद्रासाठी
खालापूर, ता, ४ (बातमीदार) ः तालुक्यातील कलोते-मोकाशी धरणाचे पाणी सिंचनासाठी उपयोगात आणले जात असताना केवळ काही धनाढ्यांच्या मनोरंजनासाठी या ठिकाणी नौकानयन केले जात असल्याने धरणाची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
तालुक्यातील उन्हाळी शेतीसाठी पाण्याची सोय व्हावी, यासाठी कलोते गावातील शेतकऱ्यांनी ४० वर्षांपूर्वी धरणासाठी जमिनी दिल्या. मात्र काही वर्षांपासून धरणातील पाण्याचा उपयोग सिंचनासाठी कमी आणि नौकानयन, साहसी खेळांसाठी होऊ लागल्याचे दिसून येत आहे.
मुंबई-पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या धरण परिसरात सिनेकलावंत, धनाढ्यांनी जागा खरेदी केल्या आहेत. धरण पात्रात अतिक्रमण करून फार्महाउस, बंगले आणि हॉटेलही बांधण्यात आले आहे. सिमेंटचे पक्के बांधकाम करताना धरणाची धोकादायक पातळीही ओलांडल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.
वीकेण्ड अथवा सुट्टीच्या हंगामात येथील फार्महाउस पर्यटकांना भाड्याने दिले जात असून, नौकानयन सोयही उपलब्ध करून देण्यात येते, मात्र हे सर्व अनधिकृतपणे सुरू असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
मध्यंतरी कलोते धरणात पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. वन विभागाने अतिक्रमणविरोधात जोरदार कारवाई केली होती. तशी कारवाई पाटबंधारे विभागाकडून करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. कलोते धरण सिंचनासाठी असताना त्याचा फायदा शेतकऱ्यांना कमी आणि बाहेरील व्यावसायिक जास्त घेत आहेत. धरणातील गाळ कित्येक वर्षे न काढल्याने साठवण क्षमता कमी झाली आहे, येथील नौकानयन बंद करावे, यासाठी जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ता दीपक पवार यांनी दिली.
पोलिस कारवाईसाठी पत्र देणार
अनधिकृत नौकानयनाबाबत संबंधितांना कर्जत पाटबंधारे विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता भरत गुंटूरकर यांनी नोटीस पाठवली होती, याशिवाय कलोते धरण परिसरात एक कर्मचारीही तैनात केला होता, परंतु त्यानंतर पुन्हा अनधिकृत नौकानयन सुरू असल्याचे दिसून येत आहे. याबाबत विचारणा केली असता, विनापरवाना सुरू असलेल्या नौकानयनबाबत माहिती घेऊन आवश्यकतेनुसार पोलिस कारवाईसाठी पत्र देऊ, असे पाटबंधारे विभागाचे उपअभियंता नीलेश देशमुख यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.