

फसवणुकीचे जाळे विस्तारले
ठाण्यात वर्षभरात सायबर, ठकबाजी, विश्वासघाताचे १,७२० गुन्हे
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : आयुष्यभर चालक म्हणून काम केले; मात्र ‘भरभराटीच्या’ प्रलोभनाने चेंबूरमधील ६५ वर्षीय जनार्दन यांना जमापुंजी गमवावी लागली. टोरेसमध्ये मुलाने आधी २० हजार गुंतवले. त्याला परताव्याचा पहिला हप्ता आला. त्याच्या सल्ल्यानुसार पाच लाखांची गुंतवणूक केली. आता परतावा मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचा तक्रार अर्ज घेऊन ते ठाणे पोलिस मुख्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेकडे सध्या आशेने खेटा मारत आहेत. ते एकटेच नाहीत, तर त्यांच्यासारखे असंख्य फसवणूक झालेले गुंतवणूकदार सध्या चिंतेत आहेत. ठाण्यात सायबर गुन्हेगारी वाढली असतानाच फसवणुकीचे जाळेही विस्तारले आहे. पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या वर्षभरामध्ये असे एक हजार ७१० हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत.
जादा परताव्याचे प्रलोभन दाखवून पोबारा केलेल्या टोरेस कंपनीचे प्रकरण आता शांत झाले आहे. हा घोटाळा जेव्हा अघडकीस आला, तेव्हा ठाणे, मुंबईतील शेकडो गुंतवणूकदार तक्रारीसाठी पोलिस ठाण्यात पोहोचले, पण गेलेली रक्कम आता परत मिळणार नसल्याने सर्वांनीच आशा सोडली आहे. या गुन्ह्याचा तपासही आता थंडावला आहे. खरेतर ठाणे शहर किंवा जिल्ह्यातील हा एकमेव मोठा आर्थिक घोटाळा नाही. जादा परताव्याच्या प्रलोभनाने यापूर्वीही ठाणेकरांचे शेकडो कोटी रुपये बुडाले आहेत. मागील पाच वर्षांचा आढावा घेतला, तर सर्वांत मोठा घोटाळा म्हणून व्ही. जी. एन.चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार केरळस्थित असलेल्या या ज्वेलरी दुकानदाराने तब्बल ३२ हजार ५८१ जणांना ठगवले होते. सुरुवातीला भीसीच्या माध्यमातून सोन्यात पैसे गुंतवणूक करून त्यांनी ग्राहकांचा विश्वास जिंकला. पुढे शेअर्समध्ये गुंतवणूक करून जादा पैशांचे प्रलोभन दाखवले. त्यासाठी एजंटची मोठी साखळी उभारली. त्यातून या ठगाने ६२० कोटींची माया जमवली, पण परतावा देण्याची वेळ आली तेव्हा हात वर केले. याप्रकरणी मुख्य आरोपी असलेले नायर दाम्पत्य सध्या तुरुंगात आहे, पण गुंतवणूकदारांच्या हाती काहीही आलेले नाही.
व्ही. जी. एन. ज्वेलर्सच्या फसवणूक प्रकरणानंतरही गुंतवणूकदार शहाणे झाले नाही. त्यामुळेच काही महिन्यानंतर ठाण्यातील गुडवीन ज्वेलर्समध्येही असाच प्रकार घडला. कधी कुक्कूट पालन, कधी मत्स्यव्यवसाय, तर कधी परदेशी पर्यटनाच्या नावावर नवनवीन पॉन्झी स्कॅमच्या जाळ्यात गुंतवणूकदारांना खेचले जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. ठाणे पोलिस आयुक्तालयात २०२४ मध्ये अशा स्वरूपाचे २१ गुन्हे दाखल आहेत. एस. कुमार, प्लिप ड्रीम इंडिया, गोट फार्मिग, ए. एस. ॲग्रो इत्यादी अशा कंपन्याची नावे आहेत. यातील प्लिम ड्रीम इंडियाने गुंतवणूकदारांना चक्क तळे भाड्याने देण्याची योजना आणली होती. तळ्यात माशांची अंडी टाकणार, त्याची पैदास करणार, ते मोठे झाले की किलोच्या भावाने खोऱ्याने पैसे येणार, अशी स्वप्ने दाखवत हजारोंपासून ते लाखो रुपये गुंतवणूक करून घेतले, पण तळेही राखले नाही आणि त्याची चवही गुंतवणूकदारांच्या तोंडी लागली नाही.
पैसे बुडाल्यातच जमा
व्हीजीएन प्रकरणातील मुख्य आरोपी तुरुंगात आहेत. त्यांची मालमत्ता जप्त केली, पण फसवणुकीच्या रकमेसमोर ती चिल्लरच आहे. एकूण ६२० कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाला, तर जप्तीतून केवळ १९ कोटीच मिळाले आहेत. इतर गुन्ह्यांच्या बाबतीतही तीच परिस्थिती आहे. टोरेसच्या कल्याण शाखेच्या झाडाझडतीत दोन पेटी भरून नकली दागिने आणि हिरे म्हणून काचेचे खडे सापडले आहेत. त्याची बाजारात किंमत १० हजारही नाही. काही तिजोऱ्याही ताब्यात घेतल्या गेल्या, पण त्यातही काही ठोस सापडले नसल्याने पैसे बुडाल्यातच जमा आहेत.
सायबर गुन्हेगारांनी लुटले १६२ कोटी
जादा परताव्याच्या प्रलोभनाने जमापुंजी गमावणाऱ्यांना शहाणपण अजूनही येत नसताना सायबर दरोडेखोरांच्या जाळ्यात सहज सावज सापडत आहे. सायबर गुन्हेगारांपासून सावध राहा, बँक खात्याची माहिती देऊ नका, असा मोबाईलवर रोज कॉलरट्यून चालत असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. लाइट बिल भरण्यापासून ते उसणे पैसे परत देण्याचा बहाणा करून गेल्या वर्षी सायबर दरोडेखोरांनी विविध गुन्ह्यांत १६२ कोटी लुटल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
फसवणुकीची आकडेवारी
गुन्हे दाखल उघड अटक
ठकबाजी ९०५ ५७४ ४०१
विश्वासघात ८७ ७९ ७५
सायबर गुन्ह्याची वर्गवारी
एकूण दाखल- ७१४, उघड- ३९
टाक्स - ५८
शेअर ट्रेडिंग- ११६
कुरियर फ्रॉड- २६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.