‘पीएमजीपी’चा पुनर्विकास मार्गी लागणार

‘पीएमजीपी’चा पुनर्विकास मार्गी लागणार

Published on

‘पीएमजीपी’चा पुनर्विकास मार्गी लागणार
म्हाडा लवकरच सरकारला प्रस्ताव पाठवणार; रहिवाशांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : अंधेरी पूनमनगर येथील पीएमजीपी वसाहतीचा रखडलेला पुनर्विकास आता मार्गी लागणार आहे. म्हाडाने या वसाहतीच्या पुनर्विकासासाठी वारंवार निविदा काढूनही विकसकांकडून त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अखेर म्हाडानेच स्वत:च या वसाहतीचा पुनर्विकास करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार पुनर्विकासाचा प्रस्ताव म्हाडाकडून लवकरच राज्य सरकारला पाठवला जाणार असल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

पूनमनगर येथील सुमारे २७ हजार चौरस मीटरच्या भूखंडावर नव्वदच्या दशकात पीएमजीपी वसाहत उभारण्यात आली आहे. या वसहतीमध्ये चार मजली १७ इमारती असून त्यात ९४२ निवासी तर ४२ अनिवासी गाळे आहेत. या वसाहतीचा पुनर्विकास करण्यासाठी संबंधित गृहनिर्माण सोसायटीने एका विकासकाची नेमणूक केली होती; मात्र गेल्या दहा वर्षांत संबंधित विकसकाने पुनर्विकास केलेला नाही. त्यामुळे या विकसकाची नेमणूक रद्द करण्यात आली असून म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट पद्धतीने विकसकाची नेमणूक करण्यासाठी वारंवार निविदा काढण्यात आली होती; त्यालाही प्रतिसाद न मिळाल्याने म्हाडाने आता स्वत:च या वसाहतीचा पुनर्विकास करण्याचे ठरविले. त्याबाबत म्हाडाकडून नियोजन सुरू आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

वारंवार स्लॅब कोसळण्याच्या घटना
पीएमजीपी वसाहतीमधील या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट केले असता ती ‘सी १’ गटात म्हणजे इमारती धोकादायक असून वास्तव्यास अयोग्य असल्याचे समोर आले. वारंवार येथे स्लॅब कोसळून रहिवासी जखमी होण्याच्या घटना घडत आहेत.

१७ मजली इमारती
पीएमजीपी वसाहतीच्या पुनर्विकासाला राज्य सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्यास म्हाडा या ठिकाणी १७ मजली इमारत बांधण्याच्या तयारीत आहे. सध्या येथील रहिवासी वर्षानुवर्षे १८० चौरस फुटाच्या घरात राहत असून त्यांना ४३० ते ४४० चौरस फुटांची घरे देण्याची म्हाडाची तयारी आहे. रहिवाशांना भाडे किंवा संक्रमण शिबिराचा पर्याय देऊन घरे रिक्त केली जातील. त्यानंतर पुनर्विकासाच्या कामाला सुरुवात होईल. या पुनर्विकासातून म्हाडालाही घरे उपलब्ध होऊ शकणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com