

बचत गटाच्या महिलांना प्रोत्साहन
खाद्यपदार्थांची करणार डिलिव्हरी; महापालिकेचा झोमॅटोसोबत करार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मुंबईतील बचत गटाच्या महिला आता आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत. मुंबई महापालिकेच्या नियोजन विभागाच्या माध्यमातून बचत गट स्थापन करून महिलांचे आर्थिक सबलीकरणही करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता महापालिका आणि घरोघरी खाद्यपदार्थ पोहोच करणारी ‘झोमॅटो’ कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रोजेक्ट आर्या’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार जागतिक महिलादिनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने झोमॅटोसोबत करार केला आहे. त्यानुसार ‘प्रोजेक्ट आर्या’चा शुभारंभ उद्या बुधवारी (ता. ५)पासून होणार आहे.
बचत गट म्हटले की लोणची, पापड, कापडी पिशव्या, सजावटीचे साहित्य तयार करणे, अशी कामे आपल्या डोळ्यासमोर येतात, मात्र आता ही पारंपरिक चौकट ओलांडून महिलांमधील आत्मविश्वास वाढविण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेने हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे आता बचत गटाच्या महिला खाद्यपदार्थांचे वितरण करताना दिसणार आहेत.
मुंबईतील धावते आयुष्य, बदलती जीवनशैली, वेळेची कमतरता, नोकरी-व्यवसायामुळे होणारी फरपट यामुळे अनेकांना पोटपूजा करण्यासाठी विविध उपाहारगृहे, भोजनालय, खानावळी यावर निर्भर राहावे लागते. साहजिकच अशाप्रकारे खाद्यपदार्थ कार्यालयात, घरी उपलब्ध झाल्यास अनेकांची सोय होते. या क्षेत्रात आता अनेक व्यावसायिक कंपन्या सेवा देतात. त्यातील नामांकित असलेल्या झोमॅटो कंपनीच्या संयुक्त विद्यमाने महापालिकेने बचत गटाच्या महिलांसाठी ‘प्रोजेक्ट आर्या’सुरू केला आहे. त्याचा शुभारंभ पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते होणार आहे. मुलुंड (पश्चिम) येथील कालिदास नाट्यगृहात सायंकाळी ५.३० वाजता या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे.
महिलांना दुचाकी चालविण्याचे प्रशिक्षण
खाद्यपदार्थ वितरणात आतापर्यंत पुरुषांचीच संख्या अधिक आढळते. हीच बाब अधोरेखित करून मुंबई महापालिकेने यासाठी बचत गटाच्या ३० ते ४० महिलांना दुचाकी चालविण्याचे प्रशिक्षण दिले आहे. तसेच स्वसंरक्षणाचे धडे दिले आहेत. यासोबतच मोबाईल ॲपद्वारेही या महिला प्रसंगी गरज भासल्यास आपल्कालीन संदेश (एसओएस) पाठवून स्वत:चे रक्षण करू शकणार आहेत.
देशातील पहिली पालिका
‘झोमॅटो’सोबत अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी मुंबई महापालिका ही भारतातील पहिलीच महापालिका आहे. या उपक्रमांतर्गत दुर्बल घटकांना प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध संकल्पना राबविण्यात येणार आहेत. सुरुवातीला महापालिकेच्या टी विभागात म्हणेच मुलुंड परिसरात हा उपक्रम सुरू होत आहे. त्यानंतर इतर सर्व विभागांमधील (वॉर्ड) बचत गटातील महिलांनाही यात सहभागी करून घेण्यात येणार आहे. महानपालिकेच्या स्वयंसहायता समुहाच्या माध्यमातून हा उपक्रम पार पाडण्यात येणार आहे.
सहभागी महिलांच्या मुलांना शिष्यवृत्ती
‘प्रोजेक्ट आर्या’मध्ये सहभागी महिलांना नोंदणी प्रक्रिया, प्रशिक्षण, सुरक्षा उपायबाबतच्या योजना आणि विमा सुविधा झोमॅटोकडून प्रदान करण्यात येणार आहेत. या उपक्रमात सहभागी महिलांच्या मुलांना शिष्यवृत्ती, अपघात विमा, मातृत्व विमा, कुटुंबासाठी विमा, मासिक पाळी दरम्यान दोन दिवसांसाठी रजा, नि:शुल्क सुरक्षा साहित्य, कुटुंबासाठी आदी बाबींचा समावेश आहे. सध्या मुलुंड (टी वॉर्ड) येथे इच्छुक महिलांकरीता झोमॅटो अॅपवर नोंदणीसाठी प्रशिक्षण सत्रे आणि इलेक्ट्रिक दुचाकी चालविण्याचे विशेष प्रशिक्षण सत्रे आयोजित केली जात आहेत, अशी माहिती संचालक डॉ. प्राची जांभेकर यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.