शहाड सीएनजी पंपावर वाहनचालकांचे हाल

शहाड सीएनजी पंपावर वाहनचालकांचे हाल
Published on

टिटवाळा, ता. ४ (बातमीदार) : शहाड येथील मोहने रोडवर असलेल्या सीएनजी पंपावर वारंवार होणाऱ्या वीज खंडितच्या प्रकारामुळे वाहनचालकांमध्ये संताप उफाळला आहे. या पंपावर सीएनजी भरण्यासाठी आलेल्या रिक्षा आणि चारचाकी वाहनधारकांना तासन् तास प्रतीक्षा करावी लागते. या समस्येवर कोणतेही उपाय केले जात नाहीत. सर्वांत मोठी समस्या म्हणजे वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी उपाय म्हणून जनरेटरची कोणतीही व्यवस्था नाही. पंपाच्या परवानगी प्रक्रियेत जनरेटर असणे आवश्यक असल्याची अट असते; मात्र प्रत्यक्षात येथे त्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे.
शनिवारच्या दिवशी हा गैरसोयीचा मुद्दा अधिकच चिघळला. सकाळपासूनच सीएनजी भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही वेळानंतर अचानक वीजपुरवठा खंडित झाला आणि सर्वच कामे ठप्प झाले. वाहनचालकांना तासन् तास प्रतीक्षा करावी लागली; मात्र पंप व्यवस्थापनाने कोणतीही स्पष्ट सूचना दिली नाही. या गोंधळात वाहनधारकांनी पंप कर्मचाऱ्यांकडे उत्तरदायित्वाची मागणी केली असता, त्यांच्याशी उद्धटपणे बोलले गेले. काही वाहनचालकांनी सांगितले की, पंप व्यवस्थापकांचा वर्तन कठोर आणि उद्धट असून, ग्राहकांच्या समस्या ऐकून घेण्याची त्यांची कोणतीही तयारी नाही. वाहनचालकांच्या तक्रारींकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. सीएनजी पंपावरील सेवा सुरळीत राहावी, यासाठी आवश्यक सुविधा पुरवणे, जनरेटरची व्यवस्था करणे आणि ग्राहकांशी सौजन्यपूर्ण वागणूक राखणे या बाबी पंपधारकांनी तातडीने अमलात आणाव्यात, अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.

शौचालयाचा अभाव
पंपावर शौचालयाची सुविधा असली, तरी ती फक्त कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवली गेली आहे. ग्राहकांना त्याचा वापर करू दिला जात नाही. पंपावर तासन् तास थांबावे लागत असतानाही स्वच्छतागृह न वापरण्याची सक्ती केली जात आहे. त्यामुळे अनेकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

व्यवस्थापकाने आरोप फेटाळले
व्यवस्थापक उमेश परिहार यांच्याशी विचारणा केली असता सीएनजी पंपावर जनरेटर असणे बंधकारक नाही. याशिवाय ग्राहकांना शौचालय वापरण्यास मनाई केलेली नाही. हे शौचालय खुलेच असते. त्याला कुलूप लावले जात नाही, असे सांगत आरोप फेटाळला.

जनरेटरची सक्ती
संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता महापालिका सीएनजी पंपांना बॅकअपसाठी जनरेटर किंवा इन्व्हर्टर ठेवण्याचा सल्ला देतात. विशेषतः ज्या ठिकाणी वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. काही ठिकाणी परवानगी देताना ही एक अट म्हणून घातली जात असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com