६० वर्षांच्या सहजीवनाचा अनोखा आदर्श

६० वर्षांच्या सहजीवनाचा अनोखा आदर्श
Published on

६० वर्षांच्या सहजीवनाचा अनोखा आदर्श
पाटील दांपत्याच्या सत्कारातून नवदांपत्यांना सुखी संसाराचा मंत्र
वाशी, ता. २ वार्ताहर : आजच्या धकाधकीच्या जीवनात जिथे नात्यांची वीण उसवत चालली आहे, तिथे नवी मुंबई स्टुडन्ट अँड युथ फाउंडेशनने एक प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये सानपाडा गावातील ज्येष्ठ नागरिक पांडुरंग सिताराम पाटील आणि पार्वती पांडुरंग पाटील यांच्या विवाहपूर्तीच्या हिरक महोत्सवी दिनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. समाजातील विवाह संस्था अबाधित राहावी आणि नवदाम्पत्यांना या उदाहरणातून प्रेरणा मिळावी, म्हणून या सोहळ्याचे आयोजन केल्याचे आयोजकांनी सांगितले.
६० वर्षांचे यशस्वी सहजीवन पूर्ण केलेल्या पाटील दांपत्यांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला. या दांपत्याच्या जीवनातून आजच्या पिढीला नातेसंबंधांचे महत्त्व आणि जबाबदारीची जाणीव व्हावी, हा या सोहळ्याचा प्रमुख उद्देश होता. या कार्यक्रमाला राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, सभागृह नेते अनंत सुतार, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते प्रा. अविनाश कुलकर्णी, हभप गुरुवर्य निलेश महाराज कुलकर्णी, युवा नेते निशांत भगत, माजी नगरसेविका वैजयंती भगत, सुनंदा पाटील, समाजसेवक विजय वाळुंज हे उपस्थित होते. त्यांनी पाटील दांपत्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रा. अविनाश कुलकर्णी यांनी आपल्या मार्गदर्शनातून भारतीय संस्कृतीतील संतवचनांचा दाखला देत, पती-पत्नीने एकमेकांवर विश्वास ठेवल्यास संसार सुखी होतो, असे सांगितले. तर माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी आजच्या पिढीला जबाबदारी आणि कर्तव्याचे महत्त्व विशद केले. यावेळी आयोजक हर्षित भगत यांनी वाढत्या घटस्फोटांच्या घटनांवर चिंता व्यक्त करत, याबाबत समाजाला विचार करण्याची गरज असल्याचे सांगितले.
...................
घटस्फोटांवर चिंता:
२०२४ च्या कॅलेंडर वर्षात देशात १२ लाख तर केवळ मुंबई हायकोर्टात १८ हजार एवढ्या मोठ्या प्रमाणात घटस्फोटांच्या केसेस दाखल झालेल्या आहेत. ही प्रकरणे न्यायालयाने परस्पर सामंजस्याने मिटवण्याचा सल्ला देऊनही जर मिटली नाहीत तर त्यातून हजारो-लाखो मुलांचे भवितव्य धोक्यात येणार आहे. त्यामुळे याकडे पाटील दाम्पत्यांसारखी उदाहरणे समाजाच्या समोर येणे अधिक गरजेचे असून समाजातील विवाह संस्था केवळ अबाधित न राहता, त्याचे महत्व आजच्या पिढीला पटवून देण्याची गरज असल्याचे मत आयोजकांकडून मांडण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com