रुग्णांची बेडवरच हालअपेष्टा

रुग्णांची बेडवरच हालअपेष्टा

Published on

उल्हासनगर, ता. ९ (वार्ताहर) : उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात आरोग्य यंत्रणेची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत होणारी ऑर्थोपेडिक इम्प्लांट ऑपरेशन दीड ते दोन महिन्यांपासून रखडली आहेत. आवश्यक शस्त्रक्रियेसाठी दाखल झालेल्या रुग्णांना बेडवरच हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. आर्थिक दुर्लक्षामुळे या रुग्णालयात उपचारांची परिस्थिती बिकट झाली असून, गरजू रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत ऑर्थोपेडिक इम्प्लांट सर्जरीसाठी लागणारे साहित्य रुग्णालयात उपलब्ध नाही. याचे कारण म्हणजे योजनेचे बिल थकल्याने पुरवठादारांनी रॉड व अन्य साहित्यपुरवठा थांबवला आहे. परिणामी, पायात रॉड टाकण्यासाठी दाखल झालेल्या रुग्णांना दीड-दोन महिन्यांपासून प्रतीक्षा करावी लागत आहे. या रुग्णांपैकी बहुतांश जण सामान्य आर्थिक परिस्थितीतील कुटुंबांतील आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेणे परवडणारे नाही. अनेकांना उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावत आहे. शस्त्रक्रिया लांबणीवर पडल्यामुळे रुग्णांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहे. या परिस्थितीची दखल घेत ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी मध्यवर्ती रुग्णालयात भेट देऊन डॉक्टरांशी चर्चा केली. योजना राबवणाऱ्या अधिकाऱ्यांना त्वरित यावर उपाययोजना करण्याचे निवेदन दिले आहे. जर त्वरित निर्णय घेतला नाही, तर ठाकरे गट रुग्णांच्या न्यायासाठी आंदोलन करेल, असा इशारा बोडारे यांनी दिला आहे.

मध्यवर्ती रुग्णालयातील ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून, गरजू रुग्णांची तातडीने शस्त्रक्रिया होणे गरजेचे आहे. सरकारने त्वरित योजनेच्या थकीत निधीची तरतूद करून रुग्णालयाच्या कामकाजाला गती दिली नाही, तर रुग्ण हक्कांसाठी तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा सामाजिक संघटनांनी दिला आहे. रुग्णांचे हाल, प्रशासनाची उदासीनता आणि सरकारच्या दिरंगाईमुळे मध्यवर्ती रुग्णालयाचा आरोग्य व्यवस्थेवरचा विश्वास डळमळीत होत आहे. आता या बिकट परिस्थितीला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


योजनेचे पैसे न आल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. मात्र, आम्ही लवकरात लवकर पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावू.
- डॉ. उत्कर्ष दुधेडीया, अतिरिक्त शल्यचिकित्सक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com