

वाशी, ता. ९ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील पुनर्विकास, तसेच नव्या इमारतींच्या बांधकामांच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. पालिकेने निश्चित केलेल्या बांधकाम नियमावलींचे काटेकोर पालन होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी मानक प्रणालीचे पालन न करणाऱ्या ८७ व्यावसायिकांवर पालिकेने कारवाई करत सुमारे एक कोटी १७ लाख कोटींचा दंड वसूल केला होता. दंड आकारल्यानंतरही नियमावलींचा भंग होत असल्याने आता सीसीटीव्हींद्वारे नजर ठेवण्यात येणार असून, या सीसीटीव्हींची तपासणी पालिकेच्या अधिकाऱ्यांना करता येणार आहे.
शहरात बांधकाम व्यावसायिकाकंडून सातत्याने नियमावलींचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने पालिकेने बांधकाम व्यावसायिकांवर कठोर कारवाई केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून दाखल करून घेतलेल्या सुमोटो याचिकेनुसार, तसेच ११ डिसेंबर २०२३ला पारित केलेल्या आदेशानुसार वायू व ध्वनी प्रदूषण कमी करण्याबाबत आदेशित केलेले होते. त्यानुसार शहरातील ध्वनी, वायू प्रदूषण, त्याचप्रमाणे रात्री-अपरात्री ब्लास्टिंगच्या अनुषंगाने नागरिकांकडून नवी मुंबई महापालिकेकडे सातत्याने तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याबाबत पालिकेनेदेखील अनेक वेळा कारवाई केलेली आहे. पालिकेच्या सर्वच आठ विभागांचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांनी ८७ ठिकाणांची स्थळ पाहणी केली होती. त्यानुसार नियमावलींचा भंग करणाऱ्यांवर पालिकेने कारवाई केली आहे. तसेच पालिकेने कोट्यवधी रुपयांची दंडात्मक रक्कम वसूल केल्यानंतरही नियमावलींचा भंग होत आहे. त्यामुळे पालिकेने आता बांधकामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा लावण्याचे निर्देश सर्व बांधकाम व्यावसायिकांना दिले आहेत.
-----------
बांधकामांबाबत मानक नियमावलींचा भंग करणाऱ्या विकसकांवर पालिकेने दंडात्मक कारवाई करूनही बांधकामांबाबतच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे पालिकेने आता बांधकामांच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा लावण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित कामाच्या ठिकाणचे सीसीटीव्ही तपासण्याची मुभा पालिका अधिकाऱ्यांना असणार आहे. त्यामुळे अधिक पारदर्शकता येणार असून, नियमावलींचा भंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करता येणार आहे.
- सोमनाथ केकाण, सहाय्यक संचालक नगररचना, नवी मुंबई महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.