बिघाडाच्या कारणाने ७० बस पडून
तुर्भे, ता. ९ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या घणसोली येथील आगारातील ११४ पैकी ७० पेक्षा जास्त साध्या बस विविध तांत्रिक कारणांमुळे आगारातच पडून आहेत. त्यामुळे विविध मार्गांवरील प्रवासी सेवेवर परिणाम होत असून, प्रवाशांना केवळ बसची वाट पाहिल्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यामुळे एनएमएमटीने बसची दुरुस्ती जलद गतीने करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी होऊ लागली आहे.
नवी मुंबई महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या हस्ते २०१५-१६ मध्ये घणसोली येथील प्रशस्त आगाराचे उद्घाटन झाले. त्यानंतर येथील साध्या बसच्या देखभाल व दुरुस्तीचा ठेका एका खासगी ट्रान्सपोर्ट कंपनीला दिला. त्यामध्ये ठेकेदार ट्रान्सपोर्ट कंपनीचा चालक; तर वाहक हा महापालिका परिवहन उपक्रमाचा असेल, अशा प्रकारचे गणित ठरले. त्यानंतर प्रवासी सेवेस प्रारंभदेखील सुरू झाला. त्या वेळी ११४ मिनी, मिडी व अवजड बसचा (वोल्वो) समावेश यामध्ये होता; परंतु आठ वर्षांचा कालावधी उलटला नाही, तर बसना घरघर लागली आहे. घणसोली आगारातून पनवेल, वाशी, ठाणे, उरण, भिवंडी, पूर्णा अशा विविध मार्गांवर बस धावतात. यामध्ये उरण, पनवेल, पूर्णा, भिवंडी बसना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो; परंतु या ठिकाणी बस फार कमी प्रमाणात धावल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला. घणसोली आगारातील बसची दुरवस्था झाल्याने त्यासंबंधी समस्या मांडण्यासाठी चालक व वाहक मागील आठवड्यातील गुरुवारी वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात जाणार होते; परंतु परिवहन उपक्रमाच्या एका बड्या अधिकाऱ्याने जाण्यास प्रतिबंध केला. त्यामुळे त्यामुळे त्यांनी जनता दरबारात जाण्याचे टाळले, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
---------------
दोन दिवस उडाला गोंधळ
४ मार्चला ११४ पैकी ७७ बस काहीना काही तांत्रिक कारणांमुळे घणसोली आगारातच उभ्या होत्या; तर ३७ बस सेवेत होत्या. त्यातील नऊ बस शाळांमधील विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी गेल्या होत्या. म्हणजेच २८ बस फक्त प्रवासी वाहतुकीसाठी होत्या. दुसरीकडे ५ मार्चला ७४ बस आगारात उभ्या होत्या; तर ४० बस प्रवासी सेवेसाठी गेल्या होत्या. नऊ बस विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी दाखल केल्या गेल्या होत्या. याचा अर्थ फक्त ३१ बस प्रवाशांच्या सेवेसाठी कार्यरत होत्या. या दोन्हीही दिवस ६० टक्क्यांपेक्षा जास्त बस आजारी असल्याने याचा फटका प्रवाशांना बसला.
----------
बसमधील तांत्रिक बिघाड
इन्शुरन्स, इंजिन बिघाड, अपघात, ऑइल लीक, ओव्हर हिट, अक्सेल ऑइल, फिटनेस, चेसिस क्रॅक, वायरिंग शॉर्ट, इंजिन ऑइल लेस, गियर सेलेक्टर, किन पिन वर्क, हवा लिकेज, गियर डिफेक्ट, अल्टरनेटर विविध कारणांमुळे बस रस्त्यावर धावत नसल्याचे सांगण्यात येते.
----------
चालकांत भीती
ज्या साध्या बस घणसोली आगारात आहेत. त्यातील बहुतांशी बसची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे कुर्लासारख्या अपघाताची पुनरावृत्ती घडली, तर आम्ही न्याय मागायचा कुठे, असा सवाल चालकवर्ग व्यक्त करत आहेत व भीती व्यक्त करत आहेत.
--------------
घणसोली आगारातील अपेक्षित बससेवा लवकरच सुरू होईल. ज्या बस नादुरुस्त आहेत, त्यांची लवकरच दुरुस्ती करून प्रवाशांची गैरसोय टाळली जाईल.
- योगेश कडूसकर, व्यवस्थापक, एनएमएमटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

