थोडक्यात बातम्या
सत्याग्रह महाविद्यालयात महिलादिन साजरा
खारघर, ता. ९ (बातमीदार) ः सत्याग्रह अध्यापक महाविद्यालयाच्या वतीने जागतिक महिलादिन साजरा करण्यात आला. या वेळी भारताचे संविधान आणि महिला या विषयावर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मत व्यक्त केले. या वेळी भारताच्या संविधानाला लागू होऊन ७५ वर्षे पूर्ण झाले, तरीही भारतातली लैंगिक असमानता आजही कायम असल्याचे मत अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केले, तर या वेळी प्रा. शिवाजी आमटे, डॉ. प्रीती शर्मा, डॉ. राजेंद्र देशमुख, प्रा. संगीता साळुंखे, प्रा. नेहा कपोते, सोनाली भोसले, कविता जाधव आदी प्राध्यापकांनी अनेक उदाहरणे देऊन गैरबराबरी तथा महिला भेदभावाची जंत्रीच मांडली. हिंदू, मुस्लिम, राजे, शासक आणि धर्मगुरूंनी आजतागायत महिलांना समतेच्या आणि समान संधीपासून नाकारण्याचे काम केले आहे. त्यामुळे स्वतंत्र भारतामध्येसुद्धा महिला, पुरुष असमानता सुरूच आहे. लैंगिक प्रमाण मुलापेक्षा मुलीचे कमी आहे. तसेच साक्षरता कमी आहे. शिक्षणाच्या स्तरामध्ये तफावत आहे. व्यावसायिक आणि खासगी विद्यापीठ शिक्षण संस्थेत महिलांचे प्रमाण कमी आहे. देशातील केवळ १५ ते २० टक्के महिलांकडे जमिनीची मालकी असल्याचे सांगितले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा. नेहा राने यांनी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, प्रशासकीय सेवा, उद्योग, क्षेत्रात माहिलांचा सहभाग अत्यल्प असल्याची खंत व्यक्त केली. कार्यक्रमाला सुजाता भोसले, वनिता सूर्यवंशी, एम. एल. सूर्यवंशी, प्रा. सतीश पवार, संस्थेचे संचालक डॉ. जी. के. डोंगरगावकर उपस्थित होते.
.....................................
कोकण रेल्वेतर्फे महिला सक्षमीकरणाचा नारा
नवी मुंबई, ता. ९ (वार्ताहर) : ‘कोकण रेल्वे’ने सक्षमीकरण, लिंग समानता आणि समावेशकतेप्रती असलेल्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत आंतरराष्ट्रीय महिलादिन मोठ्या उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमात माजी पोलिस महासंचालक डॉ. मीरा बोरवणकर यांनी कायदा अंमलबजावणीतील त्यांचा अनुभव सांगितला. नेतृत्वाच्या भूमिकेत महिलांनी अडथळे दूर करण्याचे महत्त्व विशद केले. डॉ. बोरवणकर यांनी महिलांना त्यांच्या क्षमता स्वीकारण्यास, सामाजिक रूढींना आव्हान देण्यास आणि त्यांच्या हक्कांसाठी वकिली करण्यास प्रोत्साहित केले. महिलांच्या कल्याणावरील भाषणात तेरणा मेडिकल कॉलेजच्या माजी प्राध्यापिका तथा प्रसूती-स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. दीपा कला यांनी महिलांच्या आरोग्याच्या आवश्यक पैलूंवर प्रकाश टाकला. प्रजनन काळजी, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि एकूण कल्याण साध्य करण्यासाठी स्वतःची काळजी घेण्याचे महत्त्व याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. ‘कोकण रेल्वे’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनीही उपस्थितांना माहितीपूर्ण मार्गदर्शन करीत संस्थेच्या वाढ आणि यशात महिलांच्या अपरिहार्य भूमिकेवर प्रकाश टाकला. झा यांनी समावेशक कार्यस्थळाला चालना देण्यासाठी आणि सर्व स्तरांवर महिलांसाठी समान संधी सुनिश्चित करण्यासाठी ‘कोकण रेल्वे’च्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
...............
पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या महिलांचा सन्मान
रोहे, ता. ९ (बातमीदार) ः रोहा-धाटाव मार्गावरील जनशोभा या पेट्रोल सर्व्हिस सेंटरला कोकण विभागाचा मानाचा बेस्ट क्लब एचपीफस्ट आउटलेट या पुरस्काराने जागतिक महिलादिनाच्या पूर्वसंध्येला सन्मानित करण्यात आले, तर जागतिक महिलादिनानिमित्त या पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या महिलांचादेखील सन्मान करण्यात आला.
या सर्व्हिस सेंटरवर काम करणाऱ्या महिला पेट्रोल, डिझेल भरणे, सीएनजी गॅस भरणे, तर टायरमध्ये हवा भरणे, चार्जिंगच्या कामाबरोबर हिशेब ठेवणे, बँकेत पैसे भरणे-काढणे इत्यादी कामे अत्यंत प्रामाणिकपणे करत आहेत, शिवाय ग्राहकांना आपुलकीने सेवा पुरवित आहेत. त्यामुळे या पुरस्काराचा बहुमान खऱ्या अर्थाने त्यांचाच असल्याचे मत जनशोभा पेट्रोल सर्व्हिस सेंटरचे मालक समीर शेडगे व सचिन शेडगे यांनी व्यक्त केले. महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, महिला सक्षमीकरण आणि त्यांना आर्थिक स्रोत निर्माण व्हावे, हा जनशोभा सर्व्हिस सेंटरचा प्रामाणिक हेतू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
.............
महिलादिनानिमित्त भूषण प्रतिष्ठानतर्फे अन्नदान
शिवडी, ता. ९ (बातमीदार) ः सामाजिक उपक्रमातून महिला व विद्यार्थ्यांना तसेच गरजवंतांना मदत करणाऱ्या भूषण प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिलादिनानिमित्त शनिवार, (ता. ८) मार्च रोजी परळ पूर्व येथील टाटा मेमोरियल कर्करोग रुग्णालय येथे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना अन्नदान करून महिलादिन साजरा करण्यात आला. दरम्यान, भोईवाडा पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या पोलिस चौकीचे काँस्टेबल सचिन पवार यांच्या हस्ते अन्नदान उपक्रमात सहभागी महिलांचा तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी डॉ. कुंदा मराठे, डॉ. शिल्पा पवार, हेतल सचला, आशा पवार आणि सरीता सोनवणे तसेच भूषण प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भूषण पवार आणि विश्वस्त शिवप्रसाद मागाडे उपस्थित होते.
....................
मालाडमध्ये ज्येष्ठ महिलांनी धरला ठेका
मालाड, ता. ९ (बातमीदार) ः कांदिवली पश्चिमेतील नुगाबेस्ट या आरोग्यविषयी सेवा पुरवणाऱ्या कंपनीच्या मथुरादास रोड येथील केंद्रात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या वेळी तरुणांसह ज्येष्ठ महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. या वेळी ज्येष्ठ महिलांनी हिंदी गाण्यांवर ठेका धमाल-मस्ती केली. तसेच या वेळी संस्थेच्या वतीने हळदी-कुंकू समारंभाचेही आयोजन केले होते. नुगाबेस्टच्या हंसा, भागवती शांती, श्रीयंका आणि सुनीता या सर्व महिलांनी सर्व ग्राहकांचे स्वागत करत त्यांना भेटवस्तू दिल्या. तसेच सफल विकास वेल्फेअर सोसायटीच्या वतीने वैशाली महाडिक यांनी तुळशीचे रोपटे देऊन नुगाबेस्टच्या प्रति आपली व ग्राहकांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

