थोडक्‍यात रायगड नवी

थोडक्‍यात रायगड नवी

Published on

थोडक्‍यात रायगड नवी
बबन पाटील श्री सद्‌गुरू वामन बाबा महाराज पुरस्काराने सन्मानित
खारघर, ता. ९ (बातमीदार) : श्री सद्‌गुरू वामन बाबा महाराज पुरस्काराने बबन पाटील यांना महाशिवरात्रीचे औचित्य साधून सन्मानित करण्यात आले. वैकुंठवासी श्री सद्‌गुरू वामन बाबा महाराज यांनी सत्पुरुषांच्या आर्शीवादाने बबन पाटील यांनी समाजाची बांधिलकी स्विकारून राजकीय व सामाजिक चळवळ जिवंत ठेवली आहे. शाळा, कॉलेज निर्माण करून बहुजन समाजाला ज्ञानाचा मार्ग सुलभ करून सेवेचे व्रत धारण केले. त्यांनी आपल्या जन्मगावी भगवान सिद्धेश्वराच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करून नवीन वास्तू निर्माण केली. त्यांच्या अंगे असलेल्या कर्तबगारीने आणि जबाबदारीने तन, मन, धन समर्पण करून कार्य पूर्णत्वाला नेल्याबद्दल त्यांच्या सामाजिक आणि धार्मिक कार्याची जाणीव ठेवून तळोजा मजकूर ग्रामस्थांच्या वतीने श्री सद्‌गुरू वामनबाबा सेवा सन्मान पुरस्कार योगीराज यशवंत महाराज पाटील, हभप रामदास बाबा पाटील, हभप लालचंद महाराज राजे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी शिवसेना (उबाठा) उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, कीर्तनकार धनाजीबुवा, लालचंद्र महाराज, श्रीकांत महाराज मोहोकर आदींसह हजारो ग्रामस्थ उपस्थित होते.
............
दिवाळेत खांदेवाले मच्छीमार संस्थेची महापूजा
तुर्भे (बातमीदार) ः दिवाळे कोळीवाड्यातील फगवाले मच्छीमार संस्था यांच्या वतीने शनिवारी (ता. ८) सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. वर्षभर खोल समुद्रात जाऊन मासेमारी करणारा कोळीबांधव सुरक्षित राहावा आणि समुद्रात मासेमारी करताना मुबलक मासे मिळावेत, यासाठी बंदरकिनारी पूजा मांडून देवापुढे मनोभावे प्रार्थना करण्यात आली. या संस्थेचे १५वे वर्ष असून २००९ पासून खांदेवाले मच्छीमार संस्था ही विविध कार्यक्रमासाठी पुढाकार घेते. वर्षातून एकदा दिवाळे कोळीवाड्यातील कोळीबांधव सारे भेदभाव विसरून पूजेसाठी एकत्रित येऊन सहभागी होतात. विशेष म्हणजे, या पूजेसाठी पारंपरिक वेशभूषा करून महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या वेळी उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. दरम्यान, श्री सद्‌गुरू वामन बाबा प्रासादिक संगीत भजन मंडळ व छाया कला सर्कल ब्रास बॅण्ड पथकाने सादर केलेल्या भक्तिमय गीतांनी अवघा परिसर भक्तिरसात न्हाऊन गेला होता. या कार्यक्रमाला खांदेवाले मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष रमेश हिंडे, फगवाले मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष अनंता बोस, डोलकर मच्छीमार संस्थेचे भालचंद्र कोळी, ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत कोळी, नगरसेविका भारती कोळी, भूषण कोळी, परशुराम पाटील, जगन्नाथ कोळी, दीप्ती कोळी, श्री कृष्ण मंडळ मेटपाडा यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक मान्यवर आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
..................
महिलांना भेडसावणाऱ्या आजारांवर मार्गदर्शन
पेण (वार्ताहर) : जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून पेण एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ, शिक्षक पालक संघ, सखी सावित्री या समितीतील सर्व महिला भगिनींकरिता महिलांच्या विविध समस्यांबाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी स्त्रीरोगतज्ज्ञ‍ डॉ. नेत्रा पाटील यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले, की आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये महिलांना विविध समस्यांना तसेच अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच विविध आजारांना सामोरे जावे लागत असल्याने आजच्या काळातील महिलांनी मुलांबरोबर स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. महिलांनी आपले वजन कमी करणे, मासिक पाळीतील रोजचा आहार, पीसीओडी या सर्व गोष्टी कशामुळे होतात, याकडे लक्ष देणे तसेच महिलांमध्ये कर्करोगाचे वाढलेले प्रमाण पाहता यावर तत्काळ उपाययोजना करणे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करणे, अशा अनेक समस्यांबाबत त्यांनी उपस्थित महिलांशी हितगुज केले. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका लेखा ठाकूर, सहशिक्षिका रूचा परांजपे, माता पालक संघ सदस्या जिजाबाई शिंदे, कविता पेडणेकर, सुषमा साखरे आदींसह शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com