महिला दिन

महिला दिन

Published on

अनोखा महिला दिवस
महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी रॅपलिंगचा थरार अनुभवला
खोपोली, ता. १० (बातमीदार) ः यशवंती हायकर्स खोपोली व रायगड पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी रायगड जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यातील जवळपास ४५ महिला पोलिस व अधिकारी यांनी ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करत रॅपिलिंगचा अनुभव घेतला.
कार्यक्रमास पोलिस कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री कार्यालय सचिव श्रीकर परदेशी, रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे हे स्वतः उपस्थित होते, शिवाय त्‍यांनीही उपस्थित राहून ॲक्टिव्हिटीचा आनंद घेतला. त्यांच्याबरोबर डीवायएसपी विक्रम कदम आणि खोपोली पोलिस निरीक्षक शीतल राऊत व अन्य अधिकारी ही उपस्थित होते. या सर्वांनी ॲक्टिव्हिटी करत महिला पोलिसांचे मनोधैर्य वाढविले. ॲक्टिव्हिटीची सुरुवात करताना अर्चना संदीप पाटील यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच महिला पोलिसांच्या वतीने सुरुवात खोपोली पोलिस ठाण्याच्‍या एपीआय चव्हाण यांनी केली. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी खोपोली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शीतल राऊत व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मेहनत घेतली. यशवंती हायकर्सचे मच्छिंद्र यादव, पद्माकर गायकवाड, महेंद्र भंडारे, संदीप पाटील, अर्चना पाटील, सदाशिव पाटील, निखिल गुरव, अरविंद पाटील, प्रणित गावंड, अभिजीत देशमुख, मुकेश गायकवाड, राहुल कोरडे, अजय फाळे, शुभम पाटील, श्रीपाद पवार, अभिजित आंग्रे यांनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली. यशवंतीच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
---------------------
ज्येष्ठ नागरिक संस्थेने केला महिलांचा सन्मान
रेवदंडा, ता. १० (बामतीदार) ः जागतिक महिलादिनानिमित्त येथील ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे विरंगुळा उद्यानातील सभागृहात महिलांचा सन्मान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष सुभाष चिटणीस यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. या वेळी पंचक्रोशीतील सत्कार संस्थेच्या उपाध्यक्षा सरोज वरसोलकर, अलका देवधर, यशवंती मस्तकार, लता चिटणीस, अपर्णा पाटील यांचा यामध्ये समावेश होता. उपस्थितांचे स्वागत अलका देवधर यांनी केले, तर प्रास्ताविकेत अध्यक्ष यांनी जागतिक महिलादिनानिमित्त मार्गदर्शन केले. प्रकाश पाटील यांनी आभारप्रदर्शन केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच प्रफुल्ल मोरे यांनी श्रीफळ वाढवून केले. यामध्ये येथील विविध महिला मंडळे, भजनी मंडळ व होतकरू सुमारे ४० महिला सहभागी झाल्या होत्या. या वेळी अनेक उपस्थित महिलांनी विचार मांडले. सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमाला पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवकुमार नंदगावे, डॉ. मोहन महाजन आदी उपस्थित होते.
.....................
रायगड पोलिस दलातर्फे महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान
अलिबाग वार्ताहर ः जागतिक महिलादिनानिमित्त रायगड पोलिस दलातर्फे जिल्ह्यातील विविध विभागातील महिला पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. २४ तास ऑन ड्यूटी असणाऱ्या पोलिस दलाच्या महिला अधिकारी व कर्मचारीही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. त्यामुळे त्यांनाही विरंगुळा म्हणून महिलादिनाचे औचित्य साधून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मंत्री आदिती तटकरे यांनी सर्वांना महिलादिनाच्या शुभेच्छा देत रायगड पोलिस दलाचे कौतुक केले. आजच्या काळात मुली, महिला या कोणतीही क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीत. त्यामुळेच मुलींना शिक्षण द्या, मुलगी म्हणून जन्मल्याचा पश्चाताप होणार नाही, याची जबाबदारी समाज म्हणून आपली आहे. त्यामुळे आपण सर्वांनी यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन केले. या मेळाव्यात पोलिस उपनिरीक्षक शिल्पा वेंगुर्लेकर, योगिता सांगळे, पूजा चव्हाण, हवालदार पूनम पाटील, निकिता घरत, पोलिस शिपाई (चालक) काजल डोंगरे, पूजा पाटील (महिला समुपदेशन), हवालदार प्रियंका घरत, शिपाई (कोर्ट पैरवी) प्रियंका नागावकर यांना सन्मानित करण्यात आले.
.....................
राज्य सरकारकडून महिला सक्षमीकरणावर भर : तटकरे
माणगाव, ता. १० (बातमीदार) ः महायुती सरकारमार्फत संपूर्ण राज्यात महिलांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. महिला व बालविकास खात्यातर्फे राबविण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना आर्थिक आधार मिळत आहे. महिलादिनाचे औचित्य साधून फेब्रुवारी व मार्चमध्ये लाडकी बहीण योजनेचा हफ्ता ७ ते १२ मार्च यादरम्यान पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे, महाराष्ट्र राज्य सरकार महिला सक्षमीकरणावर अधिकाधिक भर देत असून, महिलांना सक्षम करण्याचे काम करीत आहे, असे प्रतिपादन मंत्री आदिती तटकरे यांनी माणगावात पार पडलेल्या विविध विकासकामांच्या लोकार्पण व शुभारंभप्रसंगी केले. ९ मार्च रोजी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते माणगाव पंचायत समिती येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन व ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग माणगाव कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन पार पडले. तसेच ढालघर फाटा ते वावे रोहिदासवाडी रस्त्याचे लोकार्पण, लोणशी मोहल्ला ईदगाह मैदान संरक्षक भिंत कामाचे उद्घाटन व लोणशी मोहल्ला, लोणशी बौद्धवाडी येथे सिमेंट बंधारा कामाचे भूमिपूजन नामदार आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, युवक अध्यक्ष शादाब गैबी, तहसीलदार दशरथ काळे, तालुकाध्यक्ष काका नवगणे, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष निलेश थोरे, उणेगाव माजी सरपंच राजेंद्र शिर्के, लोणशी सरपंच सिद्धेश पालकर, उणेगाव सरपंच शुभांगी शिर्के, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
................................
आदिवासी वाडीवरील महिलांसाठी आरोग्य शिबिर
पाली, ता. १० (वार्ताहर) ः महिलादिनानिमित्त सुधागड तालुका आरोग्य विभागातील मोबाईल मेडिकल युनिटमार्फत वावळोली व खांडसई आदिवासीवाडी येथे मोफत आरोग्य शिबिर राबविण्यात आले. तसेच मोबाईल मेडिकल युनिट व ग्रीन टच नर्सरीच्या वतीने रोपांचे वाटप करून महिलादिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. महिलादिनानिमित्त डॉ. अंकिता सदानंद भोईर यांनी महिलांना मार्गदर्शन केले. त्या वेळी सिद्धेश्वर ग्रामपंचायत सदस्या संगिता गोविंद चव्हाण, रूपी नवश्या वालेकर व आशासेविका गीतांजली गणेश महाले उपस्थित होत्या.
...........
पोयनाड येथे सुलभा पाटील पुरस्काराने १२ महिलांचा गुणगौरव
पोयनाड (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथे स्व. सुलभा पाटील (काकू) महिला गुणगौरव पुरस्काराने १२ विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला. पोयनाडजवळील जय मंगल कार्यालय येथे झालेल्या एका भव्य कार्यक्रमात ८ मार्च या जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून झेप फाउंडेशन आयोजित या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून खासगी अन्वेषक रजनी पंडित, सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक झेप फाउंडेशनच्या अध्यक्षा चित्रा पाटील यांनी केले. झेप फाउंडेशनच्या आजपर्यंतच्या वाटचालीचे संपूर्ण श्रेय माजी राज्यमंत्री स्व. मीनाक्षी पाटील यांना जाते, असे सांगून मागील १२ वर्षांपासून हा सुलभा पाटील (काकू) पुरस्कार प्रदान केला जातो. यासह झेप फाउंडेशन २६५ बचत गटांना एकत्र घेऊन काम करते, तर यातून १२८ बचत गटांचे अर्थार्जन होते, असे प्रास्ताविकात चित्रा पाटील यांनी सांगितले.
...........
घरकाम करणाऱ्या महिलांचा सन्मान
कर्जत (बातमीदार) ः जागतिक महिलादिनानिमित्त वांगणीतील वार्ड क्र. ५ मधील घरकाम करणाऱ्या महिलांकडून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निसर्ग सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष विशाखा वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात महिलांच्या योगदानाला सन्मान देत त्यांच्या हक्कांवरही प्रकाश टाकण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. या वेळी महिलांचे हक्क, अधिकार, कौटुंबिक हिंसाचार, कामगार कायदे आणि लिंग समानता या महत्त्वाच्या विषयांवर ॲड. प्रविशा परब यांनी मार्गदर्शन केले. तसेच स्थानिक आशा वर्कर आणि शालेय शिक्षिकांनी महिलांच्या आरोग्यासंबंधी महत्त्वपूर्ण माहिती पुरवली. विशेषतः गरोदर माता व बालकांच्या पोषणासंदर्भात तसेच आदिवासी महिलांमधील कुपोषणासंबंधी चर्चाही करण्यात आली. या कार्यक्रमात सहभागी महिलांनी आपले अनुभव कथन करत गाणी गायली. तसेच ''संगीत खुर्ची''सारख्या खेळांमध्ये भाग घेऊन आनंद साजरा केला. या उपक्रमामुळे कार्यक्रमाला खास रंगत आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात निसर्ग सामाजिक संस्थेच्या सचिव सपना रोकडे आणि कार्यकर्त्या पूजा घारे, यशोदा गायकवाड, सीता पवार, शिल्पा रोकडे, अरुणा सुर्वे, मनीषा पाटील, रजिया खान, मंजुळा गायकर, नीलम घाडे, वनिता वाघमारे, अरुण मुकणे आणि रंजना जाधव यांनी मोलाची भूमिका बजावली.
...........
माणगावात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
माणगाव, ता. १० (बातमीदार) ः शहरातील अशोकदादा साबळे विधी महाविद्यालय व अधिवक्ता परिषद माणगाव तसेच सिद्धेश डान्स फिटनेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी शहरातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. या वेळी सिद्धेश वाडकर यांच्याकडून महिलांकरिता अरेबीक्स, झुंबा आयोजित करण्यात आला होता. सकाळी ९ ते १० या वेळेत डॉ. क्षमा मेहता व डॉ. स्नेहल येलपले यांनी महिला आरोग्य व आहारविषयक मार्गदर्शन केले. त्यानंतर सकाळी १० ते ११ या कालावधीमध्ये कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर १२ ते १ या कालावधीमध्ये ॲड. मानसी म्हात्रे यांचे महिलांविषयी कायदे याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास ॲड. राजीव साबळे, चेअरमन नरेंद्र गायकवाड, उद्योजक आणि संचालक नितीन बामुगडे, ॲड. महेद्र मानकर, ज्येष्ठ विधीज्ञ आणि चेअरमन ॲड. विनोद घायाळ, ॲड. योगेश तेंडुलकर, प्राचार्य डॉ. बबन खामकर, चेअरमन आणि पत्रकार अरुण पवार, निलेश थोरे, डी. एम. जाधव, ॲड. प्रवीण मुसळे, ॲड. सुजित मेहता आदी मान्यवर उपस्थित होते.
........
आंतरराष्ट्रीय महिलादिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन
पोलादपूर (बातमीदार) ः शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ, महाड संचालित पोलादपूर येथील सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय महिलादिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून मनोगत व्यक्त करताना पोलादपूर पोलिस कार्यालयातील महिला पोलिस हवालदार जयश्री सरनेकर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना नुकत्याच स्वारगेट-पुणे येथील झालेल्या दुर्दैवी घटनेचा उल्लेख करून याबाबत तरुणींनी अधिक सक्षम होणे आणि योग्य वेळीच समाजातील अपप्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. या वेळी पोलिस खात्यामार्फत महिलांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइन नंबर राईड १०९१, डायल ११२, दामिनी पथक इत्यादींची माहितीदेखील सरनेकर यांनी विद्यार्थिनींना दिली. या वेळी महाविद्यालयीन तरुणींनी सायबर क्राइमबाबतदेखील सतर्क राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. राम बरकुले यांनी महिलांना आरक्षण आणि संरक्षणाबरोबरच मुलगी, आई, बहीण, पत्नी, सहकारी या सर्व नात्यांमध्ये महिलांना सन्मानाची वागणूक देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
.................
महात्मा गांधी ग्रंथालयातर्फे पेनचे वाटप
पेण (बातमीदार) ः महात्मा गांधी ग्रंथालय व वाचनालयात जागतिक महिलादिनानिमित्त पेण पोलिस ठाण्यात पेनचे वाटप करण्यात आले. ग्रंथपाल दीपिका कदम यांच्या हस्ते पोलिस ठाण्यातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना पेनचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. महात्मा गांधी ग्रंथालय व वाचनालयाचे अध्यक्ष अरविंद वनगे यांच्या हस्ते शासकीय उप रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी महिलांनादेखील पेनचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. सहाय्यक ग्रंथपाल नम्रता पाटील यांच्या हस्ते पेण उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात जाऊन तेथील महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांना पेनचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. अशा तऱ्हेने एक आगळा वेगळा महिलादिन वाचनालयातर्फे साजरा करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com