राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरावर दगडफेक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरावर दगडफेक
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १० : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ स्पर्धांचे शिबिर भरविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे हे शिबिर सुरू असताना रविवारी (ता. ९) रात्री आठ वाजता विद्यार्थ्यांच्या दिशेने अज्ञात व्यक्तीने दगड फेकल्याची घटना घडली आहे. डोंबिवलीतील ९० फिट रोडवरील कचोरेमधील वीर सावरकर नगर येथील एका मैदानावर हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
डोंबिवलीजवळील ठाकुर्ली कचोरे परिसरात वीर सावरकरनगर भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा आहे. ती शाखा संजू चौधरी चालवितात. या शाखेच्या वतीने लहान मुलांसाठी प्रशिक्षण शिबिर भरवले आहे. कचोरे, ठाकुर्ली परिसरातील सुमारे ३५ मुलांनी यात सहभाग घेतला आहे. शिबिरात प्रशिक्षक पवन कुमार हे मुलांना विविध प्रकारचे खेळ शिकवतात. मागील महिनाभरापासून चौधरी वाडी मैदानात संघ स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू आहे.
यापूर्वी एक, दोन वेळा हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू असताना अज्ञाताने दगडफेक केली होती, पण चुकून दगड आले असावेत म्हणून त्याकडे चालकांनी दुर्लक्ष केले. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान संघ स्वयंसेवक मुले मैदानात विविध खेळाचे प्रशिक्षण घेत होती. लाठ्या-काठ्या मुले खेळत होती. मैदानी खेळात काही मुले व्यस्त होती. या वेळी अचानक चौधरी वाडी मैदान भागातील झाडाझुडपांमधून प्रशिक्षण घेत असलेल्या मुलांच्या दिशेने दगड भिरकावण्यात आला. सुरुवातीला चुकून हा दगड कोणी फेकल्याचा संशय चालकांना आला. त्यानंतर दगड फेकण्याचे प्रमाण वाढल्याने कचोरे येथील संघ शाखा चालक संजू चौधरी, पवन कुमार यांनी या दगडफेकीत कोणा स्वयंसेवकाला काही इजा होऊ नये, यासाठी मैदानी खेळ बंद केले. या दोघांनी टिळकनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली असून, पोलिसांनी अज्ञातांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही तपासून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तसेच अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी कचोरे भागात बंदोबस्त तैनात केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

