पुनर्पावलीमुळे आंब्‍याला फळगळती

पुनर्पावलीमुळे आंब्‍याला फळगळती

Published on

पुनर्पावलीमुळे आंब्‍याला फळगळती
श्रीवर्धनमधील बागायतदार चिंतेत; उत्‍पादन घटण्याची शक्‍यता


श्रीवर्धन, ता. १० (वार्ताहर) ः डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान आंबा झाडांना मोहोर येण्यास सुरुवात झाली होती. अनुकूल वातावरणामुळे श्रीवर्धन तालुक्यात साधारण एप्रिल ते मेपर्यंत फळ काढणीसाठी योग्य होईल, असा विश्वास आंबा बागायतदारांना होता. परंतु काही दिवसांपासून आंब्‍याला पुनर्पावली फुटून मोहोर आल्‍याने देठातून फळगळतीला सुरुवात झाली आहे. परिणामी आंबा उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
श्रीवर्धन तालुक्यात आंबा पिकाचे उत्पादनक्षम क्षेत्रफळ १,९१० हेक्टर इतके आहे. या मध्ये ९० टक्के हापूस तर त्या खालोखाल पायरी व केसर आंब्याची लागवड बागायतदारांनी केली आहे. डोंगरउताराच्या तसेच वरकस जमीन आंबा पिकासाठी योग्य आहेत. पोषक हवामान व झाडांची निगा यावर मोहोर अवलंबून असतो. योग्य वातावरणामुळे नोव्हेंबरअखेरीस मोहोर येण्यास सुरुवात झाल्याने बागायतदारांकडून या वर्षी साधारण चार हजार टन आंबा उत्पादनाची अपेक्षा वर्तविली जात होती, परंतु अचानक फळगळतीला सुरुवात झाल्याने उत्पादन घटण्याची चिंता बागायतदारांना सतावत आहे. काही झाडांना आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात यंदा फळधारणा झाली व सर्व फळांना पोसण्याची क्षमता झाडांमध्ये नसल्याने अनेक ठिकाणी फळगळ झाली आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी पुनर्पालवीमुळे फळ काढणी जूनपर्यंत लांबणार आहे. पावसाळी दिवसात आंब्याला योग्य भाव मिळत नसल्याने बागायतदार काळजीत आहेत.

वातावरणात होणाऱ्या बदलामुळे काही झाडांना पुनर्पावली फुटून मोहोर येत आहे. तरी शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार उपाययोजना करावी.
: श्रद्धा किरण डुंबरे, तालुका कृषी अधिकारी, श्रीवर्धन

श्रीवर्धन - बदलत्या हवामानाने झाडांना पुन्हा मोहोर येण्यास सुरुवात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com