पट्टा

पट्टा

Published on

नाडे स्मशानभूमीत अघोरी कृत्य करणाऱ्या गावाला अंनिसची भेट
पेण, ता. १० (वार्ताहर) : नाडे स्मशानभूमीत अघोरी कृत्य करणाऱ्या गावाला नुकतीच अंनिसकडून भेट देण्यात आली. पेण तालुक्यातील नाडे गावच्या स्मशानभूमीत मागच्या तीन-चार दिवसांपूर्वी काही नवी मुंबईच्या तरुणांनी पैशांचा पाऊस पडण्यासाठी अघोरी कृत्य करत नरबळी विधी करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्‍यांचे हे अघोरी कृत्य हाणून पाडण्यात आले. आरोपींविरोधात पेण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. यासंदर्भातील माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते नितीन निकम आणि संदेश गायकवाड यांना मिळताच यांनी या गावाला भेट देऊन गावकऱ्यांबरोबर चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच या घटनेमुळे भेदरलेल्या गावकऱ्यांच्या मनातील भीतीचे वातावरणात दूर करण्याचा प्रयत्न या वेळी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी केला. गावकऱ्यांच्या मागणीनुसार लवकरच जादूटोणा आणि नरबळी या विषयावर व्याख्यान घेण्याचे अंनिसकडून सांगण्यात आले. या वेळी अंनिसचे मीना मोरे, सतीश पोरे, रामचंद्र घरत आदी उपस्थित होते.
................
द्रोणाचार्य शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने संदेश गायकवाड सन्मानित
रोहा, ता. १० (बातमीदार) ः तालुक्यातील देवकान्हे गावचे सुपुत्र संदेश गायकवाड यांना ठाणे जिल्ह्यातील दिवा येथील नामांकित असलेल्या द्रोणाचार्य शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने सर्वोत्तम सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
संस्थेचा १०वा वर्धापन दिन डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात तीन हजारहून अधिक विद्यार्थी, पालकवर्ग उपस्थित होते. तसेच या सोहळ्यात अनेक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, संस्थाचालक, शिक्षणतज्ज्ञ, उद्योजक व अनेक राजकीय नेत्यांचा समावेश होता. या वेळी द्रोणाचार्य संस्थेच्या संस्थापक विनोद पाटील व सहसंचालिका प्रियंका पाटील यांच्या हस्ते संदेश गायकवाड यांचा विशेष गौरव करण्यात आला आहे. संदेश गायकवाड हे रोहे तालुक्यातील देवकान्हे गावातील रहिवासी असून, ते गेली सहा वर्षे अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून विशेष समाजकार्य करत आहेत. तसेच मुंबई येथील एका नामांकित आंतरराष्ट्रीय कोकण कला व शिक्षण विकास संस्थेमध्ये ते कार्यरत आहेत. ही संस्था गेली १३ वर्षे १० राज्यांत मदतीचे कार्य मोठ्या जोमाने करत आहे. संस्थेच्या माध्यमातून त्यांनी हजारो नागरिकांना मदत केली असून, रायगड, ठाणे, पालघर व मुंबई आदी जिल्ह्यांत ते प्रामुख्याने सामाजिक कार्य करत आहेत.
..........
ढेकू येथील वामन खवळे यांचे निधन
खोपोली, ता. १० (बातमीदार)ः ढेकू येथील वामन खवळे यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी राहत्या घरी ढेकू येथे वृद्धापकाळाने निधन झाले. मनसेचे माजी रायगड जिल्हा अध्यक्ष मनीष खवळे, साजगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच विनोद खवळे व सामाजिक कार्यकर्ते हेमंत खवळे यांचे ते वडील होत. वामन खवळे हे ढेकू गावातील ज्येष्ठ तसेच आदरणीय व्यक्ती म्हणून सर्वत्र परिचित होते. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच खालापूर तालुका व खोपोली परिसरातील राजकीय, सामाजिक तसेच औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांनी खवळे कुटुंबीयांची भेट घेऊन परिवाराचे सांत्‍वन केले.
...............
रोह्यात इमर्जन्सी कॉल फायर अँड सेफ्टीची प्रात्यक्षिके
रोहा (बातमीदार) ः ५४ व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह २०२५ च्या निमित्ताने धाटाव एमआयडीसी येथील डीएमसीसी स्पेशलिटी केमिकल्स लिमिटेड रोहा या कंपनीतर्फे राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह इमर्जन्सी कॉल अँड सेफ्टीची प्रत्यक्षिके सादर करण्यात आली. टँकरद्वारे होणाऱ्या रसायनांच्या वाहतुकीचा अपघात व त्यामधून गळती कशी रोखायची याची इमर्जन्सी ऑफ साइट मॉक ड्रिल रोहा कोलाड मुख्य रस्त्यावर घेण्यात आली. ओलियम भरून महाडच्या दिशेने जाणाऱ्या टँकरचा ब्रेक फेल झाल्यामुळे तो झाडावर आदळला. टँकरमधून दोन ठिकाणाहून गळती झाल्याने एआरटी मेंबर्सच्या मदतीने संबंधित सुरक्षा उपकरणे व इमर्जन्सी ट्रान्सपोर्ट किटचा वापर करून ती रोखण्यात आली. हा थरार तब्बल एक तास नागरिकांनी अनुभवला. त्यामुळे अशा कर्तव्यदक्ष डीएमसीसी कंपनीच्या सदस्यांनी केलेल्या सुरळीत कार्याचे कौतुक होत आहे. या ऑफसेट इमर्जन्सी मॉक ड्रिलप्रसंगी रोहा पोलिस ठाण्यासह अग्निशमन दल धाटाव व सह्याद्री वन्यजीव संस्थेचे विशेष सहकार्य लाभले. तसेच एक्सल इंडस्ट्रीजचे सीनियर इएचएस मॅनेजर सुदाम करपे यांनी या इमर्जन्सी मॉक ड्रिलचे निरीक्षक म्हणून काम पाहिले. मॉक ड्रिल यशस्वी करण्यासाठी डीएमसीसी कंपनीचे एचआर मॅनेजर अनिल जांभळे, प्रथमोपचार अधिकारी राकेश खांडेकर, सौरभ मोरे, सतिष वाघोसकर, अनिकेत पाटील, सामाजिक कार्यकर्ते विष्णू लोखंडे, नरेश सणस यांचे विशेष सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com