

वाशी, ता. १० (वार्ताहर) : रंगांचा म्हणून ओळखला जाणारा होळी हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १३ मार्चला होळी आणि १४ मार्चला धुळवड असल्याने बाजारपेठांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. होळीनिमित्त विविध रंग आणि पिचकाऱ्यांसोबतच विविध प्रकारच्या मिठाईंनी बाजारातील दुकाने सजली आहेत. त्यामुळे सर्वत्र मिठाईंचा सुगंध दरवळत आहे.
होळीच्या सणाला गोडधोड पदार्थांना विशेष महत्त्व असते. त्यामुळे बाजारात विविध प्रकारच्या मिठाईंची रेलचेल पाहायला मिळत आहे. पारंपरिक पुरणपोळीसोबतच गुजिया, मावा गुजिया, चंद्रकला, श्रीखंड, बासुंदी, गुलाबजाम, रसमलाई आणि अशा इतर अनेक पारंपरिक मिठाईंनी दुकाने सजली आहेत. यासोबतच आधुनिक मिठाईंनाही मोठी मागणी पाहायला मिळते आहे. यामध्ये चॉकलेट बर्फी, काजू कतली, बदाम बर्फी आणि इतर अनेक प्रकारच्या मिठाईंनी ग्राहकांचे लक्ष वेधले आहे. होळी हा रंगांचा सण असल्याने मिठाईंनाही रंगीबेरंगी रूप देण्यात आले आहे. केशरी, पिवळा, हिरवा आणि इतर अनेक रंगांच्या मिठाईंनी दुकाने सजली आहेत. लहान मुलांसाठी खास रंगीबेरंगी मिठाई उपलब्ध आहेत.
-----------------
शुगर फ्री मिठाईवर भर
सध्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी म्हणून मिठाई दुकानदारांनी शुगर फ्री गुजिया आणि इतर मिठाईंचादेखील पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये सुका मेवा, खजूर, अंजीर यांसारख्या नैसर्गिकरीत्या गोड पदार्थांचा समावेश करून तयार करण्यात आलेल्या शुगर फ्री मिठाई ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सर्व मिठाईंचे भाव २०० रुपयांपासून सुरू होत असून, मिठाईच्या प्रकारानुसार ते १,००० ते १,५०० रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत.
---------------
साखरेच्या गाठींना महत्त्व
दिवाळीतील लाडू, करंज्याप्रमाणेच होळी सणाला साखरेच्या गाठींना विशेष महत्त्व आहे. पुरणाच्या पोळीसोबतच महाराष्ट्रातील घराघरात होळीनिमित्त साखरेच्या गाठीदेखील आणल्या जातात. महाराष्ट्रात ही परंपरा खूप जुनी असून, आजही ती जोपासली जाते आहे. यंदा कच्चा माल महागल्याने साखर गाठींच्या किमतीतही काही प्रमाणात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात साखरेच्या गाठी १२० ते १५० रुपये किलोप्रमाणे विकल्या जात आहेत.
---------
आरोग्याची काळजी घ्या!
मिठाई खरेदी करताना ग्राहकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन आहारतज्ज्ञांकडून करण्यात आले आहे. ताजी आणि स्वच्छ मिठाई खरेदी करावी आणि मिठाई खरेदी करताना विशेषतः मिठाईत वापरण्यात आलेला मावा तपासून घ्यावा, असे आवाहन मिठाई विक्रेत्यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.