

रस्ता बांधकामाच्या प्रतीक्षेत; रोज लाखो लिटर पाण्याची नासाडी
शिवडी, ता. १० (बातमीदार) ः शिवडी पूर्व विभागात कमी दाबाने अथवा गढूळ पाणीपुरवठा, असा गंभीर प्रश्न कायम असतानादेखील शिवडी पूर्व गाडी अड्डा येथील अटल सेतूजवळ मेसेंट रोडवर गेल्या चार महिन्यांपासून जलवाहिनी फुटली आहे. या विभागात सायंकाळी पाणी येते. त्यामुळे रोज सायं. पाच ते सात वा. दरम्यान या जलवाहिनीतून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे, तर रस्त्यावर पाणी साचून राहिल्याने सर्वत्र चिखल होते. परिणामी वाहने स्लिप होऊन अपघात होत आहेत, तर फुटलेल्या जलवाहिनीमुळे येथील रस्त्याचे बांधकामदेखील रखडले आहे. यामुळे स्थानिकांसह वाहनचालकांमधून महापालिकेविरोधात नाराजी व्यक्त होत आहे.
शिवडी पूर्व गाडी अड्डा येथील अटल सेतूजवळ मेसेंट रोड असून, या अर्ध्या रोडचे नऊ महिन्यांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले आहे, मात्र नऊ महिने उलटल्यानंतरही वाहनाना ये जा करण्यासाठी हा रोड अद्याप पूर्णपणे चालू करण्यात आलेला नाही. अर्धा रोड चालू व अर्धा रोड बंद अशी स्थिती सध्या या रोडची आहे. त्यात या रोडवर महानगरपालिकेची एक जलवाहिनी फुटली आहे. जी गेल्या चार महिन्यांपासून फुटली आहे. त्यामुळे रोज लाखो लिटर पाण्याची नासाडी येथे होत आहे. त्यात या रस्त्यावर पाणी साचून राहिल्याने चिखल होतो. परिणामी चिखलामुळे अनेकदा वाहने स्लिप होऊन अपघात होतात. यात दुचाकी स्लिप होऊन अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे. याकडे महापालिका जल विभागाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी येथून ये जा करण्याऱ्या वाहन चालकांसह स्थानिक नागरिकांडून होत आहे. याबाबत महापालिका एफ दक्षिण विभागाकडे तक्रार ही देण्यात आल्या आहेत, मात्र अद्याप कोणतीही उपयोजना येथे राबविण्यात आलेली नसल्याचा संताप स्थानिकांनी व्यक्त केला आहे. मोठा अपघात होण्यापूर्वी जलवाहिनी दुरुस्त करावी, अशी मागणी स्थानिकांमधून करण्यात येत आहे.
सदरील जलवाहिनी ही मुंबई पोर्ट ट्रस्टअंतर्गत येते. त्यामुळे महापालिकेचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. या समस्येसंदर्भात मुंबई पोर्ट ट्रस्टकडे पत्रव्यवहार करण्यात येईल.
-दर्शना पाटील, जल विभागीय अधिकारी, महापालिका एफ दक्षिण
ही जलवाहिनी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेत आहे, मात्र ही जलवाहिनी मुंबई पोर्ट ट्रस्टची नाही. या जलवाहीनीचा पाणीपुरवठा महापालिकेकडून करण्यात येतो.
- दिनेश परुळेकर, जल विभागीय अधिकारी, मुंबई पोर्ट ट्रस्ट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.