पीओपीबंदीविरोधात मोर्चेबांधणी

पीओपीबंदीविरोधात मोर्चेबांधणी
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० ः ठाणे पालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी यंदा शाडूंच्या मूर्ती तयार करण्याचा आग्रह मूर्तिकारांकडे केला आहे.
यासाठी माती तसेच कार्यशाळेसाठी जागा देण्यात येणार आहे, पण केवळ १५ अर्ज आल्याने महापालिकेचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ठाणे महापालिकेने १६ जानेवारी रोजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक घेतली होती. या बैठकीनंतर आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार ३ फेब्रुवारी रोजी पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठीची नियमावली प्रसिद्ध करण्यात आली. तसेच मूर्तिकारांना शाडूच्या मातीबरोबर जागेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यासाठी ठाणे महापालिका मुख्यालय, पाचपाखाडी येथील प्रदूषण नियंत्रण विभाग येथील प्रभाग समिती कार्यालयात व्यवस्था करण्यात आली आहे, पण पालिकेच्या पीओपी बंदीला ठाण्यातील गणेशोत्सव मंडळांनी विरोध केला आहे. यानिमित्ताने गणेश मंडळांच्या सदस्यांनी घंटानाद आंदोलनही केले होते. या आंदोलनात मूर्तिकारही सहभागी झाले होते. या वेळी मंडळे किंवा मूर्तिकारांचा शाडू मातीला विरोध नसून सरसकट बंद मान्य नसल्याचे सांगण्यात आले. तरीदेखील शासन आदेशांचे पालन करण्याचे पालिकेने ठरवले आहे.
-------------------------------------------
गतवर्षीही गणेश मंडळांचा अल्प प्रतिसाद
शाडूच्या मातीसाठी १० तर, जागेसाठी पाच मूर्तिकारांनी अर्ज केल्याने प्रशासनासमोर नवीन पेच निर्माण झाला आहे. ठाण्यातील किमान शंभर ते दोनशे मूर्तिकारांच्या अर्जाची प्रतीक्षा प्रशासनाला होती, पण प्रत्यक्षात प्रतिसाद कमी मिळाला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीही पालिकेने हा प्रयोग केला होता. त्या वेळीही फारसा प्रतिसाद मिळालेला नव्हता. त्यामुळे पालिकेच्या आवाहनाबाबत मूर्तिकरांमध्ये उदासीनता दिसत आहे.
-------------------------------------------
अर्ज करण्यासाठी शेवटचे पाच दिवस
- मातीची उपलब्धता आणि प्रभागनिहाय जागांचे नियोजन करण्यासाठी, मूर्तिकारांनी शाडूच्या मातीची मागणी करण्यासाठी पालिकेने आता शेवटची मुदत दिली आहे, कारण शाडूच्या मातीच्या खरेदीसाठी पालिकेला निविदा प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
- कळवा आणि वर्तकनगर या प्रभाग समिती वगळता इतर प्रभाग समिती क्षेत्रातून जागा किंवा मातीसाठी अर्ज आलेले नाहीत. त्यामुळे १५ मार्चपर्यंत महापालिका मुख्यालयात मूर्तिकारांनी नोंदणी करावी, असे आवाहन पर्यावरण विभागाच्या प्रमुख मनीषा प्रधान यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com