‘शिवकालीन’पाणी योजनेचा विसर

‘शिवकालीन’पाणी योजनेचा विसर

Published on

शहापूर, ता. १२ (बातमीदार)ः उन्हाळा आला की शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाई जाणवू लागते. ग्रामस्थांना विशेष करून महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, कायमस्वरूपी तोडगा काढण्याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे युती सरकारच्या काळात आलेल्या ‘शिवकालीन’पाणी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीची मागणी होत आहे.
शिवकालीन पाणीसाठवण योजनेत ‘रूफवाँटर हार्वेस्टिंग’ म्हणजे छपरावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण केले जाते. वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर केल्यास ही योजना पाणीटंचाईच्या काळात उपयुक्त ठरू शकते. दोन टप्प्यातील या योजनेत छपरावरील पाणी अडवून जलवाहीनीतून घराजवळच बांधलेल्या टाकीत पाणीसाठा करण्यात येत होते. त्या पाण्याचे शुद्धीकरण करून उन्हाळ्यात त्याचा वापर केला जात होता. तर दुसऱ्या प्रकारात शेतजमिनीतून वाहुन जाणारे पाणी अडवून सार्वजनिक अथवा खासगी विहिरीजवळ खोल खड्डा पाणी सोडायचे. या प्रक्रियेला पुनर्भरण प्रक्रिया असे म्हणतात. पाणीटंचाईच्या काळात साठवण टाकीतील पाण्याचा वापर करता येईल, अशी संकल्पना होती. पण प्रशासनाची उदासीनता आणि जनजागृतीच्या अभावामुळे योजनेची प्रभावी अंमलबजावणीत अपयश आल्याने ही योजना जवळपास बंद पडल्याच्या मार्गावर आहे.
---------------------------------------------
ग्रामसभेमार्फत जनजागृतीची गरज
शहापूर तालुक्यातील परिसरात कायमची पाणीटंचाई असते. या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी पंचायत समीतीच्या ग्रामपंचायत विभाग, ग्रामपंचायती, जिल्हा परिषदेचा लघुपाटबंधारे विभाग व भूजल सर्वेक्षण विकास विभागाकडे देण्यात आली होती. पण या विभागांनी जनजागृतीच केली नसल्याने योजनेचा हेतू सफल झाला नाही. त्यामुळे सध्याची पाणीटंचाई लक्षात घेता या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाने शहापूर तालुक्यात ग्रामसभेमार्फत जनजागृती करून स्थानिकांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.
----------------––––-------------------------------------------
वाशाळा येथे पहिला प्रयोग
दहा ते बारा वर्षांपूर्वी शिवकालीन योजना वाशाळा येथे राबवण्यात आल्याचे वाशाळातील स्थानिक रहिवासी अंकुश भोईर सांगतात. योजनेचा वापर कसा करावा, याबाबत कोणतीही माहिती नसल्याने पावसाळ्यातील चार महिनेच टाकीचा वापर केला जात होता. पण आता त्यांना गळती लागली आहे. त्यामुळे योजनेबाबत जनजागृती केल्यास तालुक्यातील पाणीटंचाईची समस्या दूर होण्यासाठी मदतच होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com