होळीच्या सोंगातून परंपरेचे संवर्धन
तुर्भे, ता. १२ (बातमीदार) : आधुनिक काळाच्या ओघात सर्वच सणांचे रूप पालटत असले तरी स्मार्ट सिटीतील गावांमध्ये सण, उत्सवाची परंपरा पूर्वीप्रमाणेच जोपासली जात आहे. सेक्टर, तसेच नोडमधील गल्लीबोळात होळ्या पेटवल्या जात असल्या तरी नवी मुंबईतील आगरी, तसेच कोळीवाड्यांमध्ये ‘एक गाव, एक होळी’ची परंपरा आजही कायम आहे. प्रत्येक गावागावात होळीच्या आठ दिवस आधीपासूनच विविध सोंगे घेऊन गावात एकोपा टिकविण्याचे काम होळी सणानिमित्ताने आजही करण्यात येते. यामुळे परंपरेचे जतन आणि संवर्धन होत आहे.
वाशी, कोपरखैरणे गावांसह इतरही गावांतील ग्रामस्थांकडून पारंपरिक होळीचा सोंग हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळीच्या पूर्वसंध्येला गावकरी एकत्र येऊन विविध पारंपरिक खेळ खेळतात. लहान मुले नवरा-नवरीच्या वेशभूषेत मिरवणूक काढून संपूर्ण गावात वरात काढून आनंदोत्सव साजरा करतात. या उत्सवाच्या निमित्ताने ग्रामस्थ पारंपरिक रंगीबेरंगी पोशाख परिधान करून सहभागी होतात. या सोहळ्यात हेलका हा पारंपरिक खेळ विशेष महत्त्वाचा असून, त्यासोबतच पारंपरिक गीते गात उत्सवाचा आनंद द्विगुणित केला जातो. हा सांस्कृतिक सोहळा गावाच्या समृद्ध परंपरेचे दर्शन घडवत असतो. कोपरखैरणे गावातदेखील ‘एक गाव एक होळी’ आयोजित केली जात असून महिला पारंपरिक नाचगाण्यांचा सराव करीत आहेत. तुर्भे गावात तरुण आट्या-पाट्या खेळ खेळून जागरण करीत आहेत.
----------------
हावलू बायचा सण
आगरी-कोळी बांधव सर्व सणांप्रमाणे होळी मोठ्या उत्साहात साजरी करतात. आगरी-कोळी भाषेत सांगायचे झाले तर होळी म्हणजे ‘हावलू बायचा’ सण आणि रंगपंचमी म्हणजे ‘शिमगा’ म्हणून ओळखला जातो. होळीच्या एक दिवस अगोदर काही गावांत बँड वाजवत आजही सोंग काढण्याची प्रथा आहे; तर काही ठिकाणी होळीच्या दिवशी गावातून नाचत मिरवणूक काढली जाते. या वेळी होळीच्या पूजेचा मान हा गावच्या पाटलाच्या घरातील महिलेला दिला जातो.
-----------------------
जावयाचा सन्मान आणि प्रदक्षिणा
होळी सणानिमित्त जावईबापूंचा सन्मान करण्याची प्रथा आजही नवी मुंबई शहरात टिकून राहिली आहे. या सणाला गावात होळीच्या आधी ज्या मुलींची नवीन लग्ने झाली असतील त्या नवदाम्पत्याला मान देत जावईबापूंचा जाहीर सत्कार केला जातो. होळी पेटवल्यानंतर सर्वप्रथम हे जोडपे प्रदक्षिणा घालते आणि मग गावकरी कुटुंबासह होळीला नारळ आणि ऊस वाहतात. होळीच्या राखेचा टिळा लावल्यानंतर सर्व जण घरचा रस्ता पकडतात.
---------------------
संस्कृतीचे जतन
- दिवाळे कोळीवाड्याची होळी ही सर्वांत मोठी होळी म्हणून नवी मुंबईत ओळखली जाते. होड्यांची, बोटींची पूजा केली जाते. दिवाळीप्रमाणेच होळी हा दुसरा महत्त्वाचा सण मानला जातो. या सणात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोळीबांधव उपजीविकेचे साधन असलेल्या होड्यांची पूजा करतात. तिची रंगरंगोटी करून तिला नववधूप्रमाणे सजवले जाते.
- कोळीबांधव पारंपरिक वेशभूषेत ढोल-ताशांच्या ठेक्यावर होळीभोवती नाचतात. हा सण नवविवाहित जोडप्यांसाठी महत्त्वाचा असतो. आगरी-कोळी समाज शिकला असला तरी होळीची प्रथा मात्र पूर्वीसारखीच पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते. राहणीमान, पेहराव सगळे बदलले असले तरी होळीच्या सणाची प्रथा मात्र पारंपरिक पद्धतीने जतन करून ठेवली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

