

खारघरमध्ये सोसायटीच्या आवारात साप
खारघर (बातमीदार) : वाढत्या उष्णतेमुळे साप बिळामधून बाहेर पडत असल्याच्या घटना सध्या खारघरमध्ये घडत आहेत. नुकतेच येथील सेक्टर १२ मधील नंदनवन सोसायटीमध्ये असाच साप आढळून आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. निवाऱ्यासाठी सुरक्षित जागेच्या शोधात असताना सोसायटीच्या आवारात नागरिकांना साप दिसून आला. या वेळी सर्पमित्राला पाचारण करून त्याला पकडण्यात आले. त्यानंतर जवळील जंगलात त्याची सुटका करण्यात आली. विशेष म्हणजे, या वेळी सापाची कातदेखील आढळून आली. सोसायटीच्या आवारात साप आढळून आल्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
.................
होळीनिमित्त विराट हास्य कवी संमेलन
खारघर (बातमीदार) : होळीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने खारघरमध्ये विराट हास्य कवी संमेलन, रंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या हास्य कवी संमेलनात मुंबई येथील कवी सागर त्रिपाठी, भोपाळ येथील हास्यकवी दीपक दणादण, अमरावती येथील हास्यकवी मनोज मद्रासी आणि गोरखपूर येथील गीतकार प्रेमलात्त त्रिपाठी आदी सहभागी होणार आहेत. या वेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुण भगत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम शुक्रवारी (ता. १४) सेक्टर २० मधील कानोजी आंग्रे मैदानात होणार आहे. खारघरवासीयांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महोत्सवाचे निमंत्रक जय प्रकाश त्रिपाठी, ब्रिजेश पटेल आणि शैलेंद्र त्रिपाठी यांनी केले आहे.
................
ध्वजनिधीसाठी महापालिकेला पाच लाख रुपयांची मदत
पनवेल, ता. १४ (बातमीदार) ः धुतूम गावचे माजी सरपंच धनाजी ठाकूर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सलग चौथ्यांदा ध्वजदिन निधीसाठी पाच लाखांचा धनादेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यांच्या या मदतीबद्दल जिल्ह्यातील माजी सैनिकांनी अभिनंदन केले आहे.
सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अखत्यारितील रायगड जिल्ह्यामधील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून युद्ध, विधवा, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व त्यांचे पाल्य यांच्याकरिता विविध कल्याणकारी योजनांद्वारे आर्थिक मदत देण्यात येते. विविध कल्याणकारी योजनांसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजदिन निधी संकलन समितीमार्फत ध्वजदिन निधी संकलित केला जातो. अशा ध्वजदिन निधीस जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी, स्वच्छेने निधी देणाऱ्या दानी व्यक्ती यांच्याकडून निधी संकलित केला जातो. माजी सैनिकांचे कल्याणार्थ ध्वजदिन निधीस सढळ हाताने योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड ले. कर्नल राहुल वैजनाथ माने (नि.) यांनी केले आहे. त्यानुसार धुतूम गावचे माजी सरपंच धनाजी ठाकूर यांनी पाच लाख रुपयांची मदत केली आहे. या वेळी धनाजी ठाकूर यांचे चिरंजीव ॲड. किशोर ठाकूर, उपाध्यक्ष उरण तालुका बार असोसिएशन, धुतूम गावचे माजी उपसरपंच, सदानंद विठ्ठल ठाकूर व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे ले. कर्नल राहुल वैजनाथ माने (नि.) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग व कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
...........
जलतरणपटू तनय लाडचा आयुक्तांच्या हस्ते सत्कार
पनवेल (बातमीदार) ः सध्या कामोठे येथे राहणारा बारावर्षीय पनवेलचा रहिवासी असलेला महाडचा बारावर्षीय तनय तुषार लाड याने गेटवे ऑफ इंडिया ते अटल सेतू (१७ किमी) हे अंतर केवळ दोन तास २६ मिनिटांत पार करीत सर्वात वेगवान जलतरणपटू होण्याचा मान मिळवला आहे. या अभूतपूर्व जलतरण कामगिरी करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या जलतरण कामगिरीबद्दल आयुक्त मंगेश चितळे यांच्या हस्ते त्याचा सत्कार पालिका मुख्यालयात करण्यात आला. आई-वडिलांच्या मार्गदर्शनाबरोबरच त्याच्या या कामगिरीत प्रशिक्षकांचा मोलाचा सहभाग लाभला आहे. पलावा येथील प्रसिद्ध जलतरणपटू आणि मार्गदर्शक रूपाली रेपाळे व अनिरुद्ध महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली तनय प्रशिक्षण घेत आहे. तनयच्या या विक्रमी कामगिरीमुळे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्याच्या कुटुंबीयांबरोबरच प्रशिक्षक, मित्र मंडळी आणि संपूर्ण शाळेतील शिक्षक-विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.