

अंबरनाथ, ता. १२ (वार्ताहर) : तालुक्यातील ग्रामीण भागात कुडा मातीच्या घरात राहणाऱ्या सुमारे २६० आदिवासी बांधवांना सरकारची घरकुल योजना मंजूर झाली आहे. शहरापासून लांब आणि दुर्गम भागात राहणाऱ्या, सोयीसुविधांपासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना पक्का निवारा मिळणार असल्याने आनंदाचे वातावरण पसरले आहे.
अंबरनाथ तालुक्यातील शहरापासून दूर आणि ग्रामीण भागात दरी खोऱ्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना सरकारच्या शबरी योजनेंतर्गत घरकुल योजना मंजूर झाली आहे. सुमारे २६० जणांना आता हक्काचे आणि राहण्यायोग्य घर मिळणार आहे. शबरी आदिवासी घरकुल योजना ही अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारद्वारे राबवली जाते. ही योजना प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर राबवली जाते. याचा लाभ तालुक्यातील कात्रपगाव, सोनवली, खरवई, वालीवली, वडवली, दंडाची वाडी, तळ्याची वाडी, चिंचेश्वरी पाडा, मानकीवली, कवट्याची वाडी, बारकूपाडा, जवसाई, वाडाची वाडी, फणसीपाडा, चंदनवाडी, लक्ष्मीनगर; तसेच दुर्गादेवीचा पाडा या वाड्यातील आदिवासी बांधवांना पक्की घरे बांधून मिळणार आहे. दरम्यान, लाभार्थींनी तहसील कार्यालयात अर्ज भरण्यासाठी आणि कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. तब्बल २६० आदिवासी बांधवांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार असल्याने त्यांच्यामध्ये आनंदाची लाट पसरली आहे.
तुटक्या फुटक्या घरातून मुक्ती
योजनेचा लाभ अंबरनाथ तालुक्यातील आदिवासी बांधवांना मिळावा, यासाठी आदिम कातकरी संघटना पाच वर्षांपासून कार्यरत आहे. यामध्ये विधवा लाभार्थी महिलांचे प्रमाण अधिक आहे. आता त्यांना पावसाळ्यात गळत्या, पडक्या, कुडामेडाच्या, तुटक्या फुटक्या घरातून मुक्ती मिळून पक्के घर राहायला मिळणार असल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.
आदिवासी बांधव अशिक्षित नसल्याने सरकारच्या योजना समाजापर्यंत पोहचतच नाहीत. अंबरनाथ तालुक्यात या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी आदिम कातकरी संघटनेने अनेक जनजागृतीचे कार्यक्रम राबवले. आदिवासी बांधवांच्या पक्क्या निवाऱ्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे जमवण्याचा आणि त्यांना लागणारे सहकार्यही संघटना करत आहे.
- सतीश जाधव, तालुका कार्याध्यक्ष, आदिम कातकरी संघटना, अंबरनाथ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.