वसई-विरारकरांना भविष्यात जलदिलासा
वसई, ता. १२ (बातमीदार) : वाढती लोकसंख्या, पाण्याची निकड व भविष्यासाठी मागणीनुसार तरतूद करता यावी, यासाठी पाणीपुरवठा योजनेकडे महापालिका प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. नागरिकांना घरीच पाणी मिळावे, यासाठी गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत पाहता यंदा वसई-विरार महापालिकेने १२६ कोटींनी वाढ करत ७८४ कोटींची तरतूद केली आहे.
वसई-विरार शहराची लोकसंख्या २५ लाखांहून अधिक आहे. सध्या शहराला पेल्हार, उसगाव, सूर्या पाणीपुरवठा योजनेचा टप्पा एक, सूर्या टप्पा तीन व एमएमआरडीएच्या सूर्या पाणीपुरवठा योजनेतील एकूण ३७० द.ल.लि. पाणी उपलब्ध होत आहे; मात्र मोठमोठी गृहसंकुले, लोकवस्ती वाढू लागली आहे. त्यामुळे पाण्याची कमतरता अनेक परिसरात निर्माण होत आहे. एकीकडे पाणीपुरवठा योजना अमलात आणल्या जात असल्या तरी जलवाहिनीला गळती, वारंवार होणारे बिघाड, तांत्रिक अडचणींमुळे अनियमित, कमी दाबाने पाण्याचा पुरवठा नागरिकांना होतो. त्यामुळे महापालिकेने जीर्ण झालेल्या जलवाहिन्या काढून नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच जलकुंभ उभारण्यात येत आहेत, जेणेकरून थेट त्या भागात पाणीवितरण करणे सोईचे होणार आहे.
गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी सर्वेक्षण करून त्यावर उपाययोजना करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. जुन्या योजनेसह खोलसापाडा एक व दोन योजनेचे पाणी नागरिकांना उपलब्ध व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुख्य व अंतर्गत जलवाहिनीसह अन्य कामे करण्यासाठी वसई-विरार महापालिकेने यंदाच्या आर्थिक वर्षात प्रस्तावित निधीत वाढ केली असल्याचे दिसून येत आहे. त्यात एसटीपी प्रकल्पाचादेखील समावेश असणार आहे.
जलवाहिन्यांच्या कामाला वेग
अमृत पाणीपुरवठा योजना एकअंतर्गत शहरात विविध ठिकाणी २८४ किमीच्या जलवाहिन्या अंथरण्याची कामे, तसेच १७ जलकुंभ उभारण्याची कामे करण्यात आली आहेत. अमृत टप्पा २.० अंतर्गत पाणीपुरवठा योजना बळकटीकरण व विस्तारीकरणाचे काम मंजूर झाले आहे. त्यामुळे या दोन योजनांचा शहरासह गावांना फायदा होणार आहे.
पाणीसाठा प्रकल्पाला वेग
खोलसापाडा एक आणि दोन धरणांवरून पाणीपुरवठा योजनेसाठी कामाचे प्रस्ताव तयार करून वसई-विरार शहरात अतिरिक्त पाणीसाठा आणण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे भविष्यात या योजनेचे पाणी नागरिकांना लाभदायक ठरणार आहे.
आर्थिक वर्ष पाणीपुरवठ्यासाठी तरतूद
२०२४-२५ ६५८ कोटी
२०२५-२६ ७८४ कोटी
वसई-विरार शहरातील नागरिकांसाठी पाणीपुरवठा योजनेची कामे हाती घेतली आहेत. योजना आणि देखभाल दुरुस्तीसाठी येत्या आर्थिक वर्षात खर्चाची तरतूद प्रस्तावित आहे. भविष्यात लोकवस्ती वाढणार आहे, त्या दृष्टीने पाणी योजनेसाठी प्रशासनाचा प्रयत्न आहे.
- अनिलकुमार पवार, आयुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

