

पार्किंग प्लाझामध्ये जीवाला घोर
इमारतीचे फायर, सुरक्षा ऑडिट झाले नसल्याचे उघड, कर्मचाऱ्यांमध्ये भीती
राजीव डाके ः सकाळ वृत्तसेवा
ठाणे शहर, ता. १२ ः ठाणे जिल्ह्यातील रस्ते, बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांना ठाणे पालिकेच्या पार्किंग प्लाझामध्ये स्थलांतर करण्यात आले आहे; मात्र या इमारतीमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या केबिनकरिता वापरण्यात आलेले साहित्य जळाऊ असल्याने आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित बाहेर पडणे कठीण असल्याने कर्मचाऱ्यांच्या जीवाला घोर लागला आहे.
ठाणे जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाची मूळ इमारत पाडून नवीन इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. तोपर्यंत या विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना माजिवडाजवळील ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे. दहा मजली इमारतीमध्ये ८ आणि ९ असे दोन मजले सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ आणि २, जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग, आदिवासी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व उप विभाग कार्यालये आहेत. तसेच लवकरच ठाणे मंडळ, महसूल, ठाणे नगर पोलिस यांनाही तात्पुरत्या स्वरूपात येथे स्थलांतरित केले जाणार आहे. वाहनांच्या पार्किंगसाठी तयार करण्यात आलेल्या या इमारतीचे काम सध्या अर्धवट अवस्थेत आहे. तसेच इमारतीचे आग, स्ट्रक्चरल आणि इतर सुरक्षा साधनांचे लेखापरीक्षण झालेले नाही. लिफ्टचे कामदेखील अर्धवट असून वापर परवाना उपलब्ध नसल्याची माहिती आहे. तसेच तात्पुरत्या स्वरूपातील वातानुकूलित यंत्रणा, पंखे, संगणक, लाइट यांची कामे घाईघाईने केली असल्याने त्यांच्या दर्जाबाबतही साशंकता आहे. तसेच इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात जळाऊ, टाकाऊ साहित्य असल्याने आग लागण्याचा धोका अधिक आहे.
--------------------------------------------------------
प्रवासासाठी आर्थिक भुर्दंड
कर्मचाऱ्यांना पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयाची अपुरी सुविधा असल्याने चांगलीच तारांबळ उडत आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य असल्याने येणाऱ्या नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. वाहन पार्किंग करण्यासाठी थेट सहाव्या मजल्यावर जावे लागते. वाहने वर घेऊन जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मार्गात विविध अडथळ्यांचा सामना करावा लागतो. तसेच ठाणे रेल्वे स्टेशनपासून हे ठिकाण लांब असल्याने जिल्हा तसेच राज्यभरातूनही येणाऱ्या लोकांना प्रवासासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
-------------------------------------------
अधिकाऱ्यांचा कारभार जुन्या कार्यालयातून
कार्यकारी अभियंता सत्यवान कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता याची पूर्तता करून घेण्याचे अधिकार माझ्याकडे नसून सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक एक संपर्क साधा, असे उत्तर दिले. विशेष म्हणजे, सत्यवान कांबळे यांच्या केबिनसुद्धा याच इमारतीत आहे; मात्र त्यांच्या घरातूनच काम करीत आहेत. तर अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे यांचीही केबिन येथे असताना त्यांचा कारभार जुन्या कार्यालयातून सुरू आहे; पण अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे धोकादायक ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये मात्र भीतीचे वातावरण आहे.
------------------------------------------
ठाणे पालिकेच्या पार्किंग प्लाझा इमारतीचे सर्व प्रकारचे लेखापरीक्षण करण्यास सांगितले आहे. लवकरच त्याची कार्यवाही करण्यात येईल.
- सिद्धार्थ तांबे, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.