आंबेत पुलावरून अवजड वाहतूक

आंबेत पुलावरून अवजड वाहतूक
Published on

आंबेत पुलावरून अवजड वाहतूक
२० टनाच्या मर्यादेकडे दुर्लक्ष; वाहतूक अधिकाऱ्यांची डोळेझाक
श्रीवर्धन, ता. १२ (बातमीदार) : रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबेत-म्हाप्रळ पूल पुन्हा कमकुवत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मागील दोन वर्षांपूर्वी शासनाने तब्बल ३५ कोटींहून अधिक रुपचे खर्च करून पुलाची दुरुस्‍ती केली होती. त्‍यानंतर या पुलावरून २० टनाहून अधिक अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली होती; मात्र या सूचनेकडे दुर्लक्ष करीत सर्रास अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. त्‍यामुळे पूल कमकुवत होण्याची भीती व्‍यक्‍त केली जात आहे. शिवाय, अपघाताचा धोकादेखील वाढला असल्याचे स्‍थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
आंबेत-म्हाप्रळ पूल हा रायगड जिल्ह्यातील महाड व म्हसळा तालुक्यापासून रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड आणि दापोली तालुक्यांना जोडणारा एकमेव सोयीचा मार्ग आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये दुरुस्तीनंतर हा पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुला झाला होता; मात्र गेल्या काही महिन्यांपासून या मार्गावर वाळूचे ट्रक, डंपर आणि इतर अवजड वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. ही वाहने पुलाच्या वजन मर्यादेपेक्षा जास्त भार घेऊन जात आहेत. यापूर्वी २०२२ मध्ये एका खांबाच्या कमकुवतपणामुळे हा पूल बराच काळ बंद करण्यात आला होता. त्यामुळे लोकांची मोठी गैरसोय झाली होती. सध्या या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याचवेळी पुलाखाली होणाऱ्या अवैध वाळू उत्खननामुळे पुलाच्या संरचनेच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत वारंवार तक्रारी केल्या असून प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे संताप व्यक्त होत आहे. अवैध वाहतुकीबाबत म्हसळा तहसीलदार सचिन खाडे यांना विचारले असता त्यांनी वाळूउपसा आमच्या हद्दीत होत नसल्याचे सांगितले.
...............
दिवसरात्र वाळूउपसा
सावित्री नदीच्या पात्रात अवैध वाळू उत्खननाने परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. वाळूमाफिया रात्रंदिवस यांत्रिक उपकरणे आणि बोटींच्या साहाय्याने वाळू उपसत आहेत. यामुळे नदीपात्र खोल झाले असून पुलाचे पाय कमकुवत होण्याचा धोका वाढला आहे.
........................
सीसीटीव्ही नावालाच
आंबेत व म्हाप्रळ चेकपोस्ट येथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, ज्यात वाळूमाफियांचा व्‍यवसाय कैद होतो; मात्र महसूल, पोलिस व जलसंधारण अधिकारी याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहेत. सीसीटीव्ही पाहिल्यास अवैध वाहतुकीचा पर्दाफाश होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
..................
अवजड वाहतुकीविरोधात आंबेत येथे चेकपोस्ट आहे. आम्ही अवजड वाहन मंडणगडकडे जाऊ देत नाही; मात्र तेथून येणाऱ्या वाहतुकीवर आमचे नियंत्रण नसते. यासंदर्भात मंडणगड पोलिस अधिकाऱ्यांकडे बोलणे सुरू आहे.
- विजय सुर्वे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, गोरेगाव
................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com