स्वयंपुनर्विकास मुंबईसाठी वरदान

स्वयंपुनर्विकास मुंबईसाठी वरदान

Published on

अभ्युदयनगरचा पुनर्विकास करणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
मुंबई, ता. १२ : मुंबई जिल्हा सहकारी बँकेचे स्वयंपुनर्विकास हे मुंबईकरांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरेल. अन्य बँकांनीही त्याचे अनुकरण केले पाहिजे. अभ्युदयनगरच्या पुनर्विकासातील अडचणी सरकार दूर करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिली.
मुंबई बँकेच्या अभ्युदयनगर येथील शाखेचे उद्‌घाटन मंगळवारी (ता. ११) त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी आमदार प्रसाद लाड, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, मुंबई बँकेचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव नलावडे, संचालक नंदकुमार काटकर, नितीन बनकर, संदीप घनदाट, विष्णू घुमरे, आनंदराव गोळे, मुंबई बँकेचे कार्यकारी संचालक डी. एस. कदम, मुख्य सरव्यवस्थापक संदीप सुर्वे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई बँक ही सामाजिक बांधिलकी जपणारी असल्याचे गौरवपूर्वक नमूद करून तिच्या यशाबद्दल अध्यक्ष प्रवीण दरेकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. स्वयंपुनर्विकास योजनेमार्फत मुंबई बँकेने सर्वसामान्यांना घर देण्याचे अमूल्य काम केले आहे. मुंबईतील रखडलेल्या एसआरए प्रकल्पांचीही आपण बैठक घेऊ. बाहेरगावी गेलेल्या बेघर झालेल्या मुंबईकरांना मुंबईत परत आणण्यासाठी एसआरए तसेच रखडलेल्या प्रकल्पांना चालना देणे गरजेचे आहे. अभ्युदयनगरचा पुनर्विकास करण्यासाठी जे काही लागेल ते सरकार म्हणून आम्ही करू, असे आश्वासनही शिंदे यांनी दिले. मुंबई बँकेमार्फत यासंदर्भात केलेल्या मागण्यांवर सरकार सकारात्मक निर्णय घेईल आणि मुंबईतल्या रखडलेल्या प्रकल्पांना चालना देईल, असेही ते म्हणाले.
मुंबई बँकेमार्फत प्रवीण दरेकर यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. दरेकर यांनी यासंदर्भातील ज्या मागण्यांचे निवेदन दिले त्याबाबत लवकरच बैठक घेऊ. सहकार विभागामार्फत जे जे काही लागेल ते देऊ, असे आश्वासन राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले.

ठाण्यातही स्वयंपुनर्विकास
मुंबई बँकेने गिरणी कामगार, माथाडी कामगार तसेच लाडक्या बहिणी यांना आर्थिक मदत केल्याचे अध्यक्ष प्रवीण दरेकर म्हणाले. लवकरच लाडक्या बहि‍णींना व्यवसायासाठी १० हजारांपासून ते २५ हजारांपर्यंत विनातारण कर्ज देऊ. स्वयंपुनर्विकास योजनेचे १,६०० प्रस्ताव बँकेकडे आले आहेत. ही योजना आपण ठाण्यातही राबवू शकतो. ठाणे महापालिकेला सोबत घेऊन स्वयंपुनर्विकास योजना राबवावी, अशी विनंतीही दरेकर यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली. स्वयंपुनर्विकासाबाबत काही निर्णय झाले आहेत, तर काही निर्णय होणे बाकी आहेत. प्रलंबित असलेल्या निर्णयांची त्वरेने अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित विभागाला द्या, अशी मागणीही दरेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. सहकार विभागाशी संबंधित अनेक विषय आहेत. मुंबईत प्रभागात जशी पालिकेची कार्यालये आहेत तशी सहकार विभागाची कार्यालये उघडावीत. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबत संबंधित विभागांना आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच मुंबई बँक मध्यमवर्गीयांची असून तिला सशक्त करण्यासाठी बँकेला मोठ्या प्रमाणावर ठेवी द्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com