अनधिकृत झोपड्यांवर महापालिकेचा हातोडा

अनधिकृत झोपड्यांवर महापालिकेचा हातोडा

Published on

उल्हासनगर, ता. १२ (वार्ताहर) : शहरात अतिक्रमण आणि कर थकबाकीदारांवर महापालिकेने धडक मोहीम सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून कॅम्प नंबर १ येथील टेलिफोन एक्स्चेंजसमोर लाखोंची थकबाकी असलेल्या जमिनीवर कारवाई करत अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त केल्या आणि संपूर्ण जागा ताब्यात घेतली. ही कारवाई महापालिकेच्या कर विभागाच्या प्रमुख नीलम कदम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कॅम्प नंबर १ येथे टेलिफोन एक्स्चेंजसमोर असलेली ही जागा खासगी मालकीची आहे. संबंधित मालकाने मालमत्ता कराची थकबाकी रक्कम न भरल्याने पालिकेने अखेर कायदेशीर कारवाईचा मार्ग स्वीकारला. कारवाईदरम्यान विभागीय अधिकारी गणेश शिंपी, सचिन वानखेडे आणि अनधिकृत बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या जमिनीच्या मालकाला सप्टेंबर महिन्यातच नोटीस पाठवली होती. त्यामध्ये ठराविक मुदतीत कर भरण्याचा इशारा दिला होता. मात्र, निर्धारित कालावधीत कुठलाही प्रतिसाद न आल्याने ७ डिसेंबरला महापालिकेने ही जमीन अधिकृतपणे ताब्यात घेतली होती. मात्र, पुन्हा त्यावर झोपड्या बांधून अतिक्रमण करण्यात आले. अखेर मंगळवारी (ता. ११) पोलिस बंदोबस्तात झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. आता महापालिका या जागेचा लिलाव करणार आहे. ज्यामुळे थकबाकी वसूल केली जाईल. या जमिनीवर अनधिकृत झोपड्या उभारणारे कोण होते आणि त्यामागे कोणते गट कार्यरत होते, याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

अतिक्रमणविरोधी कठोर भूमिका
सध्या उल्हासनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणाच्या घटना समोर येत आहेत. अनेक सार्वजनिक आणि खासगी जमिनींवर अनधिकृत झोपड्या आणि बांधकामे उभारली जात आहेत. त्यामुळे महापालिकेने अतिक्रमणांवर कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. टेलिफोन एक्स्चेंजसमोरील कारवाई ही अशाच अनेक मोहिमांची सुरुवात आहे. यापुढेही शहरभर अतिक्रमणांवर पालिका हातोडा चालणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

ही जमीन मोठ्या थकबाकीसह नोंद असल्याने महापालिकेने कायदेशीर प्रक्रिया करून ताब्यात घेतली आहे. याबाबत सप्टेंबरमध्ये संबंधितांना नोटीस पाठवली होती; मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर कारवाई करावी लागली. अनधिकृत झोपड्या हटवून जागा स्वच्छ केली असून, पुढील टप्प्यात या जागेचा लिलाव करून कर वसूल केला जाईल. भविष्यातही अशा थकबाकीदार आणि अतिक्रमणांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
- नीलम कदम, कर निर्धारक आणि संकलन अधिकारी, उल्हासनगर महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com