उल्हासनगरात पुन्हा गँगवॉर!

उल्हासनगरात पुन्हा गँगवॉर!

Published on

उल्हासनगरात पुन्हा गँगवॉर
नेताजी चौकात दोन गटांत तुफान राडा; अंदाधुंद दगडफेक
उल्हासनगर, ता. १२ (वार्ताहर) : साईनाथ कॉलनीमधील राड्यानंतर आता पुन्हा गजबजलेल्या नेताजी चौकात बुधवारी (ता. १२) सायंकाळी दोन गटांत तुफान राडा झाला. न्यू इंग्लिश स्कूलसमोर भररस्त्यातच हाणामारी, अंदाधुंद दगडफेकीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण पसरले. अचानक सुरू झालेल्या या संघर्षामुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली.

उल्हासनगर कॅम्प नंबर ५ येथील साईनाथ कॉलनीमध्ये रविवारी (ता. ९) दुपारी दोन गटांत तुफान राडा झाला. पूर्ववैमनस्यातून पेटलेल्या या हाणामारीत तलवारी आणि चाकूंचा मुक्त वापर करीत एकमेकांवर थेट जीवघेणे हल्ले करण्यात आले. या धक्कादायक घटनेत चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना ताजी असताना आता बुधवारी उल्हासनगरात पुन्हा गँगवॉरची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, दोन गटांमध्ये काही जुन्या वादावरून हा वाद उफाळून आला. पाहता पाहता हा वाद हातघाईवर गेला आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले सुरू झाले. काही जणांनी लाठ्याकाठ्या आणि दगडांचा वापर करीत समोरच्या गटावर आक्रमण केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांची पळापळ सुरू झाली; तर काही दुकानदारांनी भीतीपोटी घाईघाईने आपले शटर खाली ओढले. या हिंसाचारामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये मोठी अस्वस्थता आहे. व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी पोलिसांकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. आम्ही सुरक्षित कसे राहणार? आमच्या व्यवसायांवर परिणाम होत आहे. पोलिसांनी त्वरित कठोर पावले उचलायला हवीत, अशी मागणी स्थानिक व्यापाऱ्यांनी केली आहे. या घटनेमुळे उल्हासनगरमध्ये पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, आता पोलिस या प्रकरणात किती जलद आणि कठोर कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह
नेताजी चौकातल राड्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला; मात्र दोन्ही गटांना पांगवण्यात काहीसा उशीर झाल्याने मोठे नुकसान झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित आरोपींचा शोध सुरू केला आहे.

कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
उल्हासनगरमध्ये अशा प्रकारचे गँगवार आणि गटांतील संघर्ष वाढत असल्याने स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. रोज कुठेतरी वाद, मारहाण, गुंडगिरी सुरू आहे. पोलिस फक्त बघ्याची भूमिका घेणार आहेत का, असा संतप्त सवाल या वेळी नागरिकांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com